शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी कुठल्या कंपन्या निवडाव्यात यापेक्षा कुठल्या टाळाव्यात हेही आपणासाठी तितकेच महत्त्वाचे. वाचक सहभाग अपेक्षित असलेल्या या पाक्षिक स्तंभातून, वाचकांकडून येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देताना हेच आपण सोदाहरण शिकणार आहोत..
तुमच्या शिफारशीनुरूप बॉश कंपनीचे शेअर्स सरासरी २५,००० रुपये या भावाने विकत घेतले आहेत. सध्याचा भाव माझ्या खरेदी किमतीपेक्षा कमी झाल्याने ही गुंतवणूक माझी चिंता वाढवीत आहे. मला नक्की काय करावे हे समजत नसल्याने तुम्ही मार्गदर्शन करावे.
– एस. एस. क्षीरसागर
बॉश इंडिया ही कंपनी रॉबर्ट बॉश यांनी स्थापन केलेल्या बॉश समूहाची भारतातील उपकंपनी आहे. प्रामुख्याने वाहन उद्य्ोगासाठी स्पार्क प्लग, फ्यूएल पंप, वायपर्स, एअर फिल्टर या प्रकारची पूरक उत्पादने ही कंपनी तयार करते. ओईएम (मूळ उत्पादकांचे पुरवठादार) व रिप्लेसमेंट (दुरुस्ती) दोन्ही प्रकारच्या बाजारपेठेत ही कंपनी आपले नुसते वर्चस्व राखून नाही तर या कंपनीची एकाधिकारशाही आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. भारतात जानेवारी डिसेंबर २०१६ दरम्यान प्रवासी वाहने, दुचाक्या तीन चाकी वाहने व्यापारी वाहने मिळून २.९६ कोटी वाहनांची निर्मिती झाली. वाहन उत्पादनातील ही वाढ वार्षिक ४ टक्क्याहून अधिक आहे. या उत्पादनातील प्रत्येक प्रकारच्या वाहनाने किमान चार सुटे भाग बॉशने तयार केलेले आहेत. जगातील वाहन उत्पादन घटत असताना ज्या देशात वाहन उत्पादनात वृद्धी होत आहे अशा देशांपैकी भारत हा एक देश आहे. मागील वर्षभरात व्यापारी वाहनांचे उत्पादन ७.२४ टक्क्याने वाढले. बहुउपयोगी वाहनांचे उत्पादन ७.८७ टक्क्याने, व्यापारी वाहनांचे उत्पादन ५.५६ टक्के तर तीनचाकी वाहनांचे उत्पादन ३.१० तर दुचाकी उत्पादन ११.७६ टक्क्याने वाढले. याच काळात वाहानांच्या निर्यातीत १.३८ टक्के वाढ झाली.
मागील वर्षी वाहन उद्योगातील एक घोटाळा उघड झाला, या घोटाळ्यात या वाहन उत्पादकाने माहितीपत्रकात जाहीर केल्यापेक्षा अधिक कार्बन उत्सर्जन झाल्याचे दिसून आल्याने कंपनीची बदनामी झाली. या कंपनीच्या वाहनांत उत्सर्जन नियंत्रित करणारे सुटे भाग बॉशने उत्पादित केलेले होते. साहजिकच जगभरातल्या बाजारपेठांतून बॉशच्या समभागांची घसरण झाली. याला भारतही अपवाद नव्हता. या कारणाने भारतातल्या बॉशच्या मूल्यांकन झालेली घट तुमच्या चिंतेचा विषय बनली आहे. परंतु अर्थसंकल्पावेळी केलेल्या अरुण जेटलीच्या भाषणातील शब्दांची तुम्हाला आठवण करून देतो. जेटली म्हणाले, ‘या देशात मागील पाच वर्षांत सव्वा कोटीहून अधिक कार विकल्या गेल्या तरीही कर भरणाऱ्याची संख्या खूपच कमी आहे. हे असे असले तरी भारतात प्रति हजार लोकसंख्येच्या तुलनेत खाजगी प्रवासी वाहनांची संख्या आजही खूपच कमी आहे. कमी होणारे व्याजदर, शेतीचे उत्पन्न वाढविण्याचे सरकारचे प्रयत्न व त्याच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात केलेली तरतूद लक्षात घेता भारतात वाहन उद्योगाला उज्ज्वल भवितव्य आहे. तुमच्या गुंतवणुकीबाबतची चिंता सोडा आणि वाहन उद्योगातील एका मोठय़ा कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी तुम्ही साधली. ती घाई करून दवडू नका.
सर, तुम्ही सुचविल्यानुसार मी टाटा कॉफीचे १५०० शेअर्स सरासरी ९९.५५ रुपये दराने विकत घेतले आहेत. सध्या या शेअरचा भाव वाढून १२१ झाला आहे. मी नफा वसुली करावी किंवा कसे हे मला नक्की काय करावे हे समाजत नसल्याने तुम्ही मार्गदर्शन करावे.
– आशीष बिलोरिया
टाटा समूहाच्या चहा-कॉफी व्यवसायात असणाऱ्या टाटा टी, टाटा कॉफी व टाटा ग्लोबल ब्रेवरेजेज या तीन कंपन्या आहेत. यापैकी टाटा कॉफीची स्पेशालिटी कॉफी, कमॉडिटी कॉफी व इन्स्टन्ट कॉफी अशी तीन उत्पादने आहेत. कॉफीच्या बिया, त्यावर प्रक्रिया व स्वत:ची ‘एट ओ क्लॉक’ ही नाममुद्रा असणारी ही कंपनी आहे. टाटा कॉफी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कॉफी निर्यातदार आहे. कंपनीने आपली उत्पादने त्या त्या देशातील ग्राहकांच्या चवीचा अभ्यास करून त्यांना आवडतील अशा प्रकारे प्रक्रिया करण्यावर भर दिला आहे.
दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी ज्या गोष्टी एखाद्या कंपनीत असाव्या लागतात. उदाहरणार्थ दर्जेदार व्यवस्थापन, कंपनी नफ्यात असणे, उत्पादनांच्या बाजारपेठेत मोठी विक्री असणे, उत्पादनाचे भाव ग्राहकांवर लादण्याइतपत कंपनीची ताकद असावी, नियमित लाभांश व प्रसंगी बक्षीस समभाग देण्याचे कंपनीचे धोरण असावे. या सर्व निकषांची ही कंपनी पूर्तता करीत असल्याने ही कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहे.
राजेश तांबे arthmanas@expressindia.com
(लेखक शेअर गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक आहेत.)