एखाद्या निर्धोक गुंतवणुकीच्या शोधात गुंतवणूकदार असतील तर त्यांना एक दीर्घकालीन उत्तम गुंतवणूक म्हणून ‘एसकेएफ’ची निवड योग्य ठरेल.

एसकेएफ इंडिया ही बहुराष्ट्रीय कंपनी एसकेएफ स्वीडन या बलाढय़ जागतिक कंपनीची उपकंपनी असून भारतात ती १९२३ पासून कार्यरत आहे. भारतामध्ये सुरुवातीला केवळ पुण्याहून उत्पादन घेणाऱ्या या कंपनीने नंतर आपली क्षमता वाढवण्यासाठी तसेच इतर नवीन उत्पादने बाजारात आणण्यासाठी कंपनीने कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हरिद्वार आणि गुरगाव येथे कारखाने उभारले. कंपनीची मुख्य उत्पादने म्हणजे बेअरिंग्स, सिल्स, मेकट्रॉनिक्स, लुब्रिकेशन सोल्युशन्स इ. वाहन उद्योग, वस्त्रोद्योग आणि पूरक मशीन, इलेक्ट्रिकल तसेच इतर औद्योगिक व्यवसायात वापरली जातात. भारतभरात सुमारे १२ कार्यालये आणि २६०० हून अधिक कर्मचारी असलेली एसकेएफ ही केवळ देशातच नव्हे तर जगभरात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर बेअरिंगमधील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. गेल्या वर्षांत कंपनीने आपले आर्थिक वर्ष बदलल्याने कंपनीचे आर्थिक वर्ष १५ महिन्यांच्या कालावधीसाठी होते. कंपनीने त्या वेळी २९९८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २५७.३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता.

कुठलेही कर्ज नसलेली आणि उत्तम प्रवर्तक असलेल्या या बहुराष्ट्रीय कंपनीचा शेअर सध्या १२५० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. कंपनीची यंदाच्या आर्थिक वर्षांतील कामगिरी गत वर्षीच्या तुलनेत तितकीशी आकर्षक वाटत नसली तरीही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेमधील एसकेएफचा सहभाग आणि उत्कृष्ट गुणवत्तेतील सातत्य यामुळे आगामी काळात कंपनी पुन्हा उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे.

untitled-25

untitled-26