काही कंपन्यांबद्दल जास्त सांगावे लागत नाही. टाटा समूहाचेही तसेच आहे. टाटा मोटर्स ही टाटा समूहाची १९४५ साली स्थापन झालेली एक अग्रगण्य कंपनी असून एक मोठी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगभरातील १७५ देशांमध्ये वावर असणाऱ्या टाटा मोटर्सचे आजच्या घडीला ६०,००० हून अधिक कर्मचारी असून कंपनीची वार्षिक उलाढाल ४२ अब्ज डॉलर्सहून (सुमारे २८०,७२५.५ कोटी रुपये) अधिक आहे. जवळपास सर्वच श्रेणीतील चार चाकीचे उत्पादन करणाऱ्या टाटा मोटर्सची २० उत्पादन केंद्रे असून त्यापैकी सात भारतात, तर उर्वरित १३ केंद्रे यूके, थायलंड, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशिया येथे आहेत. कंपनी ५० हून अधिक देशांत आपल्या वाहनांची विक्री करते. १९६१ मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनी झालेली ही कंपनी यूकेतील जग्वार आणि लँड रोव्हर तसेच दक्षिण कोरियातील देवू ताब्यात घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी झाली. आता प्रवासी वाहनांमध्ये ‘नॅनो’पासून ‘जग्वार’पर्यंत श्रेणी असलेली टाटा मोटर्स एकमेव कंपनी असेल. दुचाकी वाहने सोडल्यास कंपनी बहुतेक सर्वच प्रकारच्या वाहनांची निर्मिती करते. आतापर्यंत आपल्या भागधारकांना भरभरून देणाऱ्या टाटा मोटर्सने गेल्या आर्थिक वर्षांत ४४,३६४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २,२८४.५३ कोटी रुपयांचा तोटा केला होता. तसेच यंदाच्या पहिल्या तिमाहीतदेखील कंपनीने ९,०९४.३४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४६७.०५ कोटी रुपयांचा तोटा केला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत कंपनीने दाखल केलेली नवीन वाहन श्रेणी, तसेच जागतिक बाजारपेठेत जग्वार आणि लँड रोव्हरची होत असलेली प्रगती आणि चीनमध्ये भक्कम होत असलेले टाटा मोटर्सचे स्थान यांचा एकत्रित परिणाम आगामी कालावधीत झालेला दिसेल. तसेच यंदाच्या आर्थिक वर्षांत टाटा सन्स आपला टाटा मोटर्सच्या भागभांडवलातील हिस्सा ३१.६ टक्क्यांवरून ३३.३ टक्क्यांपर्यंत वाढविणार आहे. कंपनीचा वाहनांचा पोर्टफोलियो आणि नेटवर्क बघता येत्या दोन वर्षांत कंपनी फायद्यात असेल याची खात्री वाटते. सध्या ४२५ रुपयांच्या आसपास असलेला हा हाय बीटा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो. टाटा मोटर्स तुमच्या पोर्टफोलियोची शान वाढवेल यात शंकाच नाही.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2017 रोजी प्रकाशित
बहुराष्ट्रीय पैस, शानदार थाट..
काही कंपन्यांबद्दल जास्त सांगावे लागत नाही.
Written by अजय वाळिंबे

First published on: 09-10-2017 at 05:31 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on tata motors limited