गौरव मुठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या युगात अर्थचक्र खूपच गतिमान झाले आहे. जसजसे अर्थचक्र गतिमान होत चालले आहे, त्यानुसार अर्थपरिसंस्थेमध्ये नवनवीन गरजांची भर पडत आहे. मात्र या गरजा काय आहेत? त्या कशा प्रकारे पूर्ण करता येतात किंवा रोजच्या व्यवहारात बँकांना आणि ग्राहकांना कोणत्या ‘बँकिंग’ अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यापासून वाचण्याचा मार्ग कोणता? या सर्व प्रश्नांवर माधव प्रभुणे यांचे ‘पथदर्शक बँकिंग’ पुस्तक खरोखरच दिशादर्शक ठरते. देशात बँकिंग सेवा बहुतांश लोकांपर्यंत पोहोचली आहे. मात्र आजही निमशहरी किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेला तारण्याचे आणि तिला सर्वसमावेशी रूप देण्याचे श्रेय सहकारी बँकांनाच जाते. सहकारी बँकिंगमध्ये कार्यरत एका अनुभवी कार्यकर्त्यांचे त्याच दिशेने हे पथदर्शक कार्यही म्हणूनच विशेष दखलपात्र ठरते.

‘जे जे आपणासी ठावे! ते ते इतरांसी शिकवावे!!

शहाणे करून सोडावे! सकळ जना!!’

या उक्तीप्रमाणे लेखकाने राष्ट्रीयीकृत ते विविध नागरी सहकारी बँकांमध्ये केलेल्या कामाचा आणि पाच दशकांहून अधिक काळ व्यावसायिक पातळीवर केलेले कामांना लेख स्वरूपात ग्रंथित केले आहे. पुस्तकात सर्व लेखांची विषयानुरूप मांडणी आणि बँकिंग क्षेत्रातील सर्व संकल्पनांची सविस्तर ‘केस स्टडी’सह प्रभुणे यांनी चर्चा केली आहे. ठेव व्यवस्थापन, गुंतवणूक व्यवस्थापन, कर्ज व्यवस्थापन, वसुली व्यवस्थापन, ताळेबंद व नफा-तोटा व्यवस्थापन आणि बँकिंगमधील तंत्रज्ञान व माहिती, ग्राहक सेवा आणि त्यांच्यासंबंधित तक्रारींचे निवारण अशी विविधांगी माहिती त्यांनी प्रकरणवार विस्ताराने दिली आहे. स्वामी विवेकानंदांच्या आर्थिक विचारांचा मागोवा त्यांनी पहिल्या प्रकरणात घेतला आहे, तर दुसऱ्या प्रकरणात महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० मध्ये ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे झालेल्या बदलांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

सध्याची सहकारी क्षेत्रातील काही संस्थांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेची नागरी सहकारी बँकांसाठी मार्गदर्शकाची भूमिका राहावी, जेणेकरून नागरी सहकारी बँकांची स्थिती सुधारून भविष्यात त्यांना आणखी बळ मिळेल, असे लेखक सुचवतात. याचबरोबर वैयक्तिक ठेवीदारांनी त्यांच्या ठेवी एकाच बँकेमध्ये न ठेवता इतर बँकांमध्ये विभागून ठेवल्यास प्रत्येक ठेवीमागे पाच लाख रुपयांपर्यंत विमा सरंक्षण मिळेल असा मोलाचा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.  

बँकिंग क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. लेखकाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) बँकिंग संस्थांमध्ये वापर वाढत असल्याने त्याचे फायदे आणि तोटे विशद केले आहेत. शेवटच्या प्रकरणात बँकिंग व्यवसाय आणि शिष्टाचार याबाबत माहिती देत उत्कृष्ट ग्राहकसेवा हीच बँकिंग प्रणालीचा कणा असल्याचे ते मांडणी करतात. बँकांनी ग्राहकांशी व्यवहार सहज, सरळ आणि सुलभ करून संस्थेसह ग्राहकांप्रतिही आपले दायित्व उत्तम रीतीने पूर्ण केले पाहिजे, याबाबत प्रभुणे यांनी आग्रही मत मांडले आहे. बँकिंगविषयक सर्व विषयांचा अंतर्भाव पुस्तकात असल्याने सामान्य लोकांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाला, त्याचप्रमाणे पदव्युत्तर आणि वित्तीय क्षेत्रातील प्राध्यापकांना हे पुस्तक मार्गदर्शन करणारे ठरेल.

विशेष म्हणजे सामान्यांसाठी बँकिंगविषयक संकल्पना अतिशय किचकट आणि क्लिष्ट असतात. मात्र ‘पथदर्शक बँकिंग’मध्ये ती सुबोध भाषेत आणि व्यंगचित्रांची जोड देऊन सोपी केली गेली आहेत. त्या चित्रांना अनुभवसिद्ध मांडणीची जोड पाहता ती खऱ्या अर्थाने ती ‘अभ्यासचित्रे’च म्हणता येतील. इतके त्यांनी या महत्त्वाच्या गंभीर विषयाचे सुलभीकरण केले आहे.

पथदर्शक बँकिंग

लेखक : माधव प्रभुणे

प्रकाशक : हिरा प्रकाशन, मुंबई 

पृष्ठ : २४४, मूल्य : ३५० रुपये संपर्क ई-मेल:madhav_prabhune@rediffmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book introduction a guide to banking processes zws
First published on: 18-10-2021 at 01:02 IST