फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार : समभाग गुंतवणूक
जोखीम प्रकार : समभाग गुंतवणूक; धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक : एक मुदत बंद योजना या रूपात फंडाला सुरुवात झाली. ही कालमर्यादा पूर्ण झाल्यावर हा फंड १४ जून २००७ पासून गुंतवणुकीस कायम खुला झाला. हा फंड मायक्रो कॅप व मिड कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करतो. मुंबई शेअर बाजाराचा ‘एस अँड पी बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स’हा निर्देशांक या योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे.
फंड गंगाजळी : ३१ मे २०१५ च्या फंड विवरणाप्रमाणे (Fund Factsheet) या फंडाची मालमत्ता २,०२५ कोटी रुपये आहे.
निधी व्यवस्थापक : विनीत सांबरे हे जून २०१० पासून फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. ते डीएसपी ब्लकरॉक म्युच्युअल फंडाच्या (पूर्वीचे डीएसपी मेरील िलच) पीएमएस विभागात जुल २००७ मध्ये समभाग विश्लेषक म्हणून दाखल झाले. ते ऊर्जा निर्मिती, औषध निर्मिती, रसायने या व्यवसायात असलेल्या कंपन्यांचे गुंतवणुकीच्या दृष्टीने संशोधन करीत असत. ते सनदी लेखापाल असून डीएसपी ब्लकरॉकमध्ये दाखल होण्याआधी आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, यूटीआय इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरी या कंपन्यांतून त्यांनी गुंतवणूकविषयक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जय कोठारी हे या फंडाचे सह-निधी व्यवस्थापक आहेत.
गुंतवणूक पर्याय : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड : पे आउट व रिइंव्हेंस्ट)
फंड खरेदीची पद्धत : डीएसपी ब्लकरॉक म्युच्युअल फंडाच्या विक्रेत्यामार्फत अथवा http://www.dspblackrock.com या वेबस्थळावरून थेट खरेदी.
स्मॉल कॅप व मायक्रो कॅप या प्रकारात मोडणारे समभाग दीर्घकालीन गुंतवणुकीत नेहमीच अव्वल परतावा देतात. परंतु परतावा जितका अधिक तितकी जोखीम देखील अधिक हा शेअर बाजाराचा नियम या प्रकाराच्या गुंतवणुकीलाही लागू होतो. मागील पाच वष्रे, तीन वष्रे व दोन वष्रे एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केलेल्यांना रेग्युलर ग्रोथच्या एनएव्ही नुसार अनुक्रमे ३३.४०, ५१.०४ व ६५.३७ टक्के चक्रवाढ दराने (CAGR) परतावा मिळालेला असून फंडाच्या सुरुवात म्हणजे जून २००७ पासून एसआयपी केलेल्यांना २६.०८ टक्के परतावा मिळाला आहे. या कामगिरीच्या जोरावर क्रिसिलने या फंडास ‘फोर स्टार रेटिंग’ दिले आहे. डीएसपी ब्लकरॉक मायक्रो कॅप फंड हा गुंतवणुकीत धाडसी निर्णय घेऊन जोखीम नियमनाला प्राधान्य देणारा फंड आहे. हा फंड बाजार मूल्यानुसार पहिल्या तीन हजार कंपन्या वगळून उर्वरित कंपन्यांतून संख्यात्मक व गुणात्मक निकषांवर आधारीत धाडसी गुंतवणूक करणारा फंड आहे. परताव्याच्या दरातील सातत्य हे या गुणात्मक निकषांवर आधारीत घेतलेल्या निर्णयांचे यश आहे. १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१५ या कालावधीत या फंडाने संदर्भ निर्देशांकापेक्षा २२ टक्के सरस कामगिरी केली आहे. तरीही, स्मॉल कॅप प्रकारच्या गुंतवणुकीतील धोका लक्षात घेऊन या फंडाची शुल्क रचना ठरली आहे. दोन वर्षांच्या आत निधी काढून घेतल्यास एक टक्का अधिभार द्यावा लागेल, हे ध्यानात घेऊन या फंडात दोन ते पाच वर्ष या कालावधीसाठीच गुंतवणूक करावी. यापेक्षा कमी कालावधीसाठी गुंताविलेला निधी अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही. एकूण म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत स्मॉल कॅप मायक्रो कॅप प्रकारच्या फंडांचे प्रमाण पाच ते दहा टक्क्य़ांपेक्षा अधिक असू नये हे लक्षात घेऊन आपल्या नियोजनानुसार या फंडांत एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करावी.
mutualfund.arthvruttant@gmail.com
मायक्रो कॅप प्रकारच्या कंपन्यांचा भांडवली पाया लहान असल्याने तेजीच्या काळात या कंपन्यांच्या परताव्याचा दर लार्ज कॅप व मिड कॅपच्या तुलनेत अव्वल असतो. आम्ही ‘बॉटम्स अप अॅप्रोच’ या पद्धतीने गुंतवणूक करतो. गुंतवणूक करण्यापूर्वी किमान दहा वर्षांचा ताळेबंद व नफा-तोटा पत्रक तपासूनच गुंतवणुकीचा निर्णय घेतला जातो.
विनीत सांबरे
निधी व्यस्थापक, डीएसपी ब्लकरॉक मायक्रो कॅप फंड
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2015 रोजी प्रकाशित
डीएसपी ब्लॅकरॉक मायक्रो कॅप फंड
स्मॉल कॅप व मायक्रो कॅप या प्रकारात मोडणारे समभाग दीर्घकालीन गुंतवणुकीत नेहमीच अव्वल परतावा देतात.
First published on: 13-07-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dsp blackrock micro cap fund