फंडाचा ‘फंडा’.. : ओल्ड इज गोल्ड !

समतोल (बॅलन्स्ड रिस्क प्रोफाईल) किंवा त्यापेक्षा अधिक जोखीम स्वीकृतीची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही शिफारस आहे.

अतुल कोतकर
मल्टीकॅप फंडांच्या गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वात ‘सेबी’द्वारे बदल केला गेल्यानंतर फंड घराण्यांनी आपापल्या मल्टीकॅप फंडांना नव्याने उदयास आलेल्या फ्लेक्सीकॅप फंड गटात परावर्तीत केले. डीएसपी फंड घराण्याचा २७ एप्रिल १९९७ पासून अस्तित्वात आलेला डीएसपी इक्विटी फंड देखील, जानेवारी २०२१ पासून डीएसपी फ्लेक्सीकॅप फंड म्हणून परावर्तीत झाला. फ्लेक्सीकॅप गटाच्या गुंतवणूक रचनेनुसार बाजार भांडवलानुसार सर्व प्रकारच्या कंपन्यांत गुंतवणुकीची लवचीकता, विशिष्ट उद्योग क्षेत्राचे गुंतवणुकीत प्रमाण राखण्याचे स्वातंत्र्य यामुळे संपत्ती निर्मितीचा दीर्घ इतिहास असलेल्या डीएसपी फ्लेक्सीकॅप फंडाची ही शिफारस. समतोल (बॅलन्स्ड रिस्क प्रोफाईल) किंवा त्यापेक्षा अधिक जोखीम स्वीकृतीची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही शिफारस आहे.

अतुल भोळे हे मे २०१६ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. मागील पाच वर्षांत फंडाच्या निधी व्यवस्थापकांत दोन वेळा बदल झाले. अपूर्व शहा यांनी जुलै २०१५ मध्ये डीएसपी फंड घराण्यापासून फारकत घेतल्यानंतर काही काळासाठी फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे संयुक्तपणे विनीत सांबरे आणि हरीश जव्हेरी यांच्याकडे होती. साधारण नऊ महिन्यांनी या फंडाला अतुल भोळे यांच्या रूपात स्थायी निधी व्यवस्थापक मिळाला. फंडाच्या गुंतवणुकीची धाटणी मल्टीकॅप प्रकारची असून निधी व्यवस्थापित करण्यासाठी एक व्यापक गुंतवणूक परीघ आखलेला आहे. या परिघातील ६२ ते ६७ कंपन्यांना गुंतवणुकीत स्थान देण्याचे निधी व्यवस्थापकांचे धोरण आहे. निधी व्यवस्थापक बाजार मूल्याबाबत अज्ञेयवादी असले तरी सरासरी  ६५ टक्के गुंतवणूक लार्जकॅप केंद्रित आहे. अतुल भोळे गुंतवणुकीसाठी मूलभूत मूल्यांकनाबरोबर गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणारे निधी व्यवस्थापक आहेत. वृद्धीक्षम कंपन्यांच्या मूल्यांकनाकडे प्रसंगी दुर्लक्ष करून वृद्धीभिमुख दृष्टिकोनातून त्यांनी कंपन्यांना स्थान दिल्याचे प्रसंग मागील दोन वर्षांत आढळले आहेत. निधी व्यवस्थापकांच्या गुंतवणूक शैलीतील गुंतवणुकीसाठी एक मानदंड अज्ञेयवादी दृष्टिकोन स्वीकारणे हा होय. त्यांच्या निकषाची पूर्तता न करणाऱ्या आणि प्रसंगी निर्देशांकात प्रभाव असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या कंपनीस गुंतवणुकीत स्थान दिलेले नाही.

विद्यमान निधी व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखालील कामगिरी नक्कीच दखल घ्यावी अशी आहे. जुलै २०१६ ते जून २०२१ अशा मागील पाच वर्षांतील २० पैकी १२ तिमाहीत फंडाची कामगिरी मानदंडसापेक्ष अव्वल राहिली आहे. या २० तिमाहीत एका वर्षांच्या चलत सरासरीत, ९० टक्के वेळा संदर्भ मानदंडापेक्षा, चार टक्के किंवा त्यापेक्षा अधिक परतावा मिळविला आहे. भोळे यांच्या गुणवत्तापूर्ण वृद्धीभिमुख कंपन्यांत गुंतवणुकीच्या आग्रही भूमिकेमुळे २०१८ मध्ये फंड स्पर्धेत मागे पडला. फंडाने २०१९ मध्ये जोरदार मुसंडी मारत अग्रक्रमी पुनरागमन केले.

दीर्घकालीन गुंतवणुकीत सोने असावे की समभाग? याबाबत अनेकदा मतभिन्नता असते. नुकत्याच पंचविशीत पदार्पण केलेल्या डीएसपी फ्लेक्सीकॅप फंडात १९९७ साली ज्यांनी १ लाखाची गुंतवणूक केली असेल त्यांचे १४.३३ टक्के वार्षिक वृद्धीदराने ६,७४,३७० रुपये एवढे बाजारमूल्य झाले असते. तर सोन्यात केलेल्या गुंतवणुकीचे १२.४४ टक्के वार्षिक वृद्धीदराने ५,३१,६५५ रुपये झाले असते. वारेन बफे यांनी वयाच्या १० व्या वर्षी केलेल्या गुंतवणुकीचे दशलक्षी मूल्य होण्यासाठी २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी जावा लागला होता. म्हणूनच ‘ओल्ड इज गोल्ड’ या पंक्तीला अनुसरून मार्गक्रमण करत असलेल्या आणि जोखीम समायोजित परताव्याच्या क्रमवारीत अग्रस्थानी राहिलेल्या या फंडाची दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही शिफारस आहे.

डीएसपी फ्लेक्सीकॅप फंड

*  फंड गट फ्लेक्सी कॅप

*  फंडाची सुरुवात २९ एप्रिल १९९७

*  फंड मालमत्ता ६,७४४ कोटी  (३१ ऑगस्ट २०२१ रोजी)

*  मानदंड निफ्टी ५०० टीआरआय

atulkotkar@yahoo.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dsp flexi cap fund performance dsp flexi cap fund review zws

ताज्या बातम्या