‘लोकसत्ता’ दरवर्षी वाचकांची आवड लक्षात घेऊन नवीन सदरांनी नवीन वर्षांचे स्वागत करत असतो. अर्थसाक्षरतेचे उद्दिष्ट घेऊन मागील वर्षी ‘नियोजन भान’ हे सदर सुरू झाले. सदर सुरू झाले त्या पहिल्या लेखात वाचकांना अर्थसाक्षर होण्याचा नवीन वर्षांचा संकल्प करण्याचे आवाहन केले होते. वर्षभरात वाचकांची अर्थसाक्षरतेची पायरी उंचावली असेल तर ही गोष्ट नक्कीच समाधान देणारी असेल. वाचकांच्या सहभागाने हे सदर सुरू करायचे निश्चित झाले तेव्हा हे सदर किती यशस्वी होईल याबद्दल थोडी शंका होती. प्रामुख्याने ही शंका ज्या वाचक कुटुंबाचे नियोजन प्रसिद्ध होईल ते कुटुंब आपले उत्पन्न, खर्च, बचत उघड करण्यास कितपत राजी होईल काय, असे प्रश्न होते. पण या शंका फोल ठरवत पहिला लेख प्रसिद्ध झाल्यापासून वाचकांच्या भरभरून मेल आल्या. नियोजन लिहीत असताना शक्यतो ज्या कुटुंबाचे नियोजन प्रसिद्ध झाले ते त्यांच्या नियोजनातील त्रुटी दाखवताना दुखावले  जाणार नाहीत याची काळजी घेतली. काही वाचकांच्या बाबतीत अनुकंपा वाटावी इतपत अर्थसाक्षरतेची पातळी खालावलेली अनुभवास आली. प्रत्येक लेख त्या त्या कुटुंबातील व्यक्तींना प्रसिद्ध होण्यापूर्वी वाचावयास दिला होता. याला वेळेवर वाचू न शकलेली दोन कुटुंबे अपवाद ठरली. दोन कुटुंबांतील त्यांच्या नियोजनातील चुका फारच गंभीर असल्याने हे लेख वाचल्यानंतर ते प्रसिद्ध होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या विनंतीचा मान राखत हे लेख प्रसिद्ध झाले नाहीत.
अगदी दुसऱ्या लेखापासून वाचकांच्या शंका व आíथक विषयांतील वेगवेगळ्या संज्ञांचे अर्थ विचारणाऱ्या मेलचा भडिमार सुरू होता. प्रातिनिधिक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रत्येक तिमाहीत एक लेख हा नियोजनाव्यतिरिक्त परंतु शंका व आíथक विषयांतील वेगवेगळ्या संज्ञांचे अर्थ स्पष्ट करणारा लिहिण्याचे निश्चित केले. गेल्या वर्षांत त्याप्रमाणे पहिलाच लेख ‘टर्म प्लान’ किंवा ‘मुदतीचा विमा’ या विषयावर प्रसिद्ध होऊनदेखील अजूनही एखादी मेल याबाबतीत शंका विचारणारी असतेच. तिसरा लेख अर्थसंकल्पातील बदलांचा आढावा घेणारा, तर चौथा मुदतीच्या विम्याबाबतीत अनेकांच्या शंकेचे निरसन करणारा होता. याच मालिकेतील आरोग्य विमा, अपघाती मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई देणारा विमा, आरोग्य विम्याचे ‘टॉप-अप’ या विषयावरील माहिती व त्यांचा वापर कसा करावा याचे विवेचन करणारे लेख निश्चित केले आहेत, जे मागील वर्षी लिहिता आले नाहीत, असे लेख या वर्षी प्रस्तावित आहेत.
वाचकांनी त्यांच्या काही नियोजनाबाबतच्या शंका विचारल्या. या शंकांचे तात्पुरते निरसनही झाले. काही लेख अनेकांच्या डोळ्यांवरची निरक्षरतेची झापडे दूर सारणारे होते, असे स्वत:हून सांगणारेही काही वाचक भेटले. अनेक वाचक असेही होते ज्यांच्या नियोजनाचे लेख प्रसिद्ध झाले असते तर अनेकांच्या फायद्याचे ठरले असते. या वाचकांची प्रसिद्धीपासून दूर राहण्याची इच्छा असल्याने हे लेख प्रसिद्ध झाले नाहीत. नवीन वर्षांत ज्यांच्या नियोजनात काही विशेष आहे असे लेख बिनचेहऱ्याने (फोटोशिवाय) का होईना, प्रसिद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या निमित्ताने अनेक वाचकांशी संवाद घडला. यापकी अनेक जण अधिकाराने, वयाने मोठे होते. समाजातील त्यांचे स्थान खूपच वरचे होते. तरीही आपल्या शंका अगदी लहान मुलाच्या निरागसतेने त्यांनी विचारल्या. शक्य तितक्या शंकांचे निरसन केले.
या प्रवासात अनेक वाचक असे भेटले की ज्यांना आपण फसविले गेलो आहोत याची जाणीव नव्हती. उदाहरणच देऊन सांगायचे तर वयाच्या पन्नासाव्या वर्षी १५ वष्रे हप्ता भरावा लागणार असलेल्या विम्याच्या योजनेची खरेदी करणे हे होय. सेवानिवृतीचे वय ६० असताना सेवानिवृत्तीनंतर पाच वष्रे हप्ता भरावा लागणार असलेली योजना का खरेदी करावी, हा प्रश्न या योजनेची खरेदी करणाऱ्याच्या मनात आला नाही. निवृत्तीसमयी विम्याची आवश्यकता किती? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अर्थसाक्षरतेची आवश्यकता अधोरेखित करणारी ठरली. या फसवणुकीच्या घटना का घडतात, याचे उत्तर भारतीय उद्योग महासंघाच्या गुंतवणूक व म्युच्युअल फंड परिषदेत सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी बीजभाषणात दिले. सेबीने जानेवारी २०१४ पासून ‘गुंतवणूक सल्लागार’ म्हणून नोंदणी सुरू केली. या गटात जे कोणी नोंदणी करू इच्छितात अशा व्यक्ती किंवा संस्थांना अशिलाकडून शुल्क आकारून सल्ला देणारे व उत्पादने विकून मोबदल्यापोटी मानधन स्वीकारणारे यापकी एकाचा पर्याय स्वीकारून असे दोन गट केले आहेत. मे महिन्यात ही परिषद झाली. तत्कालीन आकडेवारीनुसार, शुल्क आकारून सल्ला देणाऱ्या गटात नोंदणी केलेल्या सल्लागारांची संख्या केवळ १६० होती, तर उत्पादने विकून मोबदल्यापोटी मानधन स्वीकारणारे काही हजारांच्या घरात होते. दोन गटांतील या आकडेवारीमधील तफावत बरेच काही सांगून जाते. सेबीचे धोरण हे आवश्यकता नसताना विकल्या जाणाऱ्या (मिस सेिलग) उत्पादने यांसारख्या अनुचित प्रथांना प्रतिबंध घालणारे असले तरी गुंतवणूकदारांची मानसिकता आज यासाठी तयार झाली नाही. याची कारणे विषद करणारा व वाचकांचे प्रबोधन करणारा लेखही या वर्षांत वाचकांना वाचायला मिळेल.
वाचकांना पडलेला शेवटचा प्रश्न – आपले नियोजन विक्रेत्याच्या सल्ल्याने करावे की नियोजकाच्या? जर नियोजनकाराच्या सल्ल्याने केले तर नियोजक निवडीचे काय निकष असावेत? नियोजनकाराचे सेवा शुल्क कसे ठरते? या यक्षप्रश्नांची उत्तरे येत्या वर्षभरात देण्याचा प्रयत्न राहील.
वर्षभराच्या प्रवासाकडे मागे वळून ज्या कुटुंबाचे नियोजन प्रसिद्ध झाले त्यांच्या गरजेनुसार गुंतवणूक साधनांची निवड केली होती. ही साधने सुचविताना त्या कुटुंबातील व्यक्तीची अर्थसाक्षरतेची पाश्र्वभूमीही विचारात घेतली गेली. याबाबतीत तीन गोष्टींचा उल्लेख आत्मस्तुतीचा दोष पत्करून करावा लागेल. पहिली, देशात राजकीय वाऱ्यांची बदलणारी दिशा ओळखून इंडेक्स फंडात गुंतवणूक करण्याचा दिलेला सल्ला. दुसरी, जवळ जवळ प्रत्येकालाच शॉर्ट टर्म फंडांचा खुबीने वापर करण्याचा दिलेला सल्ला होता. यासाठी निवडलेल्या फंडाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सामान्य गुंतवणूकदार अचंबित होणे एक वेळ समजू शकतो. परंतु तथाकथित गुंतवणूक सल्लागार व विक्रेते यांना ‘पाइनब्रिज शॉर्ट टर्म फंडा’बद्दल फारसे ठाऊक नसताना जे कोणी वाचक हा फंड खरेदी करू इच्छित होते त्यांना परावृत्त करण्याचे काम केले. म्युच्युअल फंडाचे श्रेणी व मानांकन ठरविणाऱ्या ज्या तीन संस्था आहेत त्या तीनही संस्थांनी या फंडाला जुल महिन्यापासून आपल्या शिफारसी करत असलेल्या फंडांच्या यादीत स्थान दिलेले आहे. तसेच जी बँक पहिल्या क्रमांकांची म्युच्युअल फंड वितरक आहे त्या बँकेच्या Recomended List of Funds मध्ये या योजनेचा समावेश आहे ही गोष्ट या वितरकांना अन्य उत्पादनांचे असलेले ज्ञान दर्शविते.
या एका वर्षांच्या प्रवासानंतर वाचकांनी आपली अर्थसाक्षरतेची पुढील पायरी गाठणे अपेक्षित होते. आपण वरच्या वर्गात गेलो की आपल्याला वरच्या वर्गात ढकलले गेले या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी खालील सोपे प्रश्न स्वत:ला विचारावे. यापकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देता आली यावर आपली अर्थसाक्षरतेची पायरी ठरविता येईल.
० माझ्या सर्व विमा योजनांचे एकत्रित विमा छत्र किती आहे?
० माझ्या एसआयपी सुरू असलेल्या म्युच्युअल फंडांच्या योजनांची नावे मला माहीत आहेत काय?
० मला माझ्या नोकरीच्या ठिकाणाहून आरोग्य विम्याचे किती कवच मिळाले आहे?
० मी कोणत्या कंपनीचा आरोग्य विमा विकत घेतला आहे व या विम्याचे छत्र किती?
या पाचपकी दोन प्रश्नांची उत्तरे अचूक देता आली तरीही मी वरच्या वर्गात गेलो, असे म्हणता येईल.