फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार    :    समभाग गुंतवणूक  
जोखीम प्रकार     :    समभाग गुंतणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)  
गुंतवणूक    :    समभाग गुंतवणूक ८०% पेक्षा कमी नसेल व जास्तीत जास्त २०% गुंतवणूक रोखे प्रकारची असेल.  
फंडाच्या परताव्याच्या     :    एस अँड पी बीएसई  २०० निर्देशांक तुलनेसाठी निर्देशांक             
निधी व्यवस्थापक     :    गुंतवणूक व्यवस्थापनाचा २० वर्षांचा अनुभव असलेले आणि                 एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी व कार्यकारी संचालक प्रशांत जैन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. जैन हे आयआयटी कानपूरचे बी. टेक आणि वित्तीय व्यवस्थापानात त्यांनी आयआयएम बंगळूरु येथून पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.
गुंतवणूक पर्याय: वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (पे आउट व रिइन्व्हेंस्ट)
फंड खरेदीची पद्धती: फंड घराण्याच्या http://www.hdfcfund.com या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अथवा विक्रेत्या मार्फत.
7
अनेकदा निधी व्यवस्थापकांना एखादा फंड त्याच्या उत्तम कामगिरीमुळे ओळख मिळवून देतो. देशातील अव्वल (किंबहुना सर्वोत्तम) निधी व्यवस्थापकांमध्ये प्रशांत जैन यांचा समावेश होण्यास कारणीभूत ठरलेला आजचा एचडीएफसी टॉप २०० हा फंड होय. ऑगस्ट १९९६ पासून सुरू झालेल्या या फंडाच्या मालमत्तेने ३१ मार्च २०१५च्या गुंतवणूक तपशिलानुसार ३३ हजार कोटीचा टप्पा पार केला आहे. आज अनेक फंड घराण्यांची एकूण मालमत्ता या एकटय़ा फंडाच्या मालमत्तेहून कमीच आहे. आज देशातील सर्वाधिक मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या फंड घराण्याचा मान एचडीएफसी म्युच्युअल फंडाला मिळण्यात या फंडाचा मोठा वाटा आहे.  फंडाच्या गुंतवणुकांमध्ये प्रामुख्याने सुदृढ ताळेबंद व अव्वल व्यवसाय पद्धती असलेल्या कंपन्यांचा समावेश आहे. फंडाच्या पहिल्या दहा गुंतवणुकांत स्टेट बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, मारुती, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टाटा मोटर्स, भारत पेट्रोलियम, रिलायन्स इंडस्ट्रीज आदींचा समावेश होतो. या सर्व कंपन्या आपापल्या क्षेत्रात त्यांच्या व्यवसायाचे नेतृत्व करतात. इतके असूनही मागील दोन वर्षांपासून या फंडाची कामगिरी या फंडाच्या लौकिकास साजेशी झालेली नाही. म्हणून या फंडाच्या कामगिरीबद्दल अनेकांकडून चिंता व्यक्त होत आहे. आपल्या गुंतवणूक धोरणाशी सुसंगतता राखत प्रत्यक्ष गुंतवणूक करणारा हा फंड आहे. एस अँड पी बीएसई २०० या निर्देशांकात एखाद्या कंपनीच्या प्रभावाप्रमाणे (वेटेज) प्रत्यक्ष गुंतवणुकीत साधम्र्य आढळते. किंबहुना याच शिस्तीमुळे तेजीच्या कालावधीत इतरांच्या तुलनेत या फंडाची कामगिरी रोडावली आहे. मागील वर्षभरात अनेक मिडकॅप धाटणीच्या कंपन्यांच्या समभागांच्या भावात मोठी वृद्धी झाल्यामुळे अनेक फंडांची कामगिरी या फंडाहून अव्वल ठरली आहे. परंतु नवीन सुरु झालेले वर्ष हे मागील वर्षांप्रमाणे एकतर्फी कामगिरी असणारे नसेल. चकाकते ते सर्वच सोने नसते या उक्तीप्रमाणे ज्या फंडाची कामगिरी आज उठून दिसते आहे त्या सर्वच फंडांचा कस मागील महिन्याभरात लागावयास सुरवात झाली आहे. अशा परिस्थितीत वाऱ्याच्या दिशेनुसार आपली गुंतवणूक ध्येये बदललेले फंड कितपत यशस्वी होतील याचे उत्तर येत्या महिन्याभरातच दिसेल. या फंडाने एसआयपी गुंतवणूकदारांना मागील पाच वर्षांत १८ टक्के दराने व दहा वर्षांत १७.५ टक्के दराने वार्षिक सरासरी परतावा दिला आहे. आपल्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक असलेला हा फंड बदलत्या परिस्थितीत आपल्या लौकीकास साजेशी कामगिरी नक्की करून दाखवेल या बाबतीत तीळमात्रही शंका वाटत नाही. जे गुंतवणूकदार दीर्घकालीन एसआयपीच्या माध्यमातून संपत्तीची निर्मिती करू इच्छितात अशा गुंतवणूकदारांसाठी या फंडाची कामगिरी सुखावणारी असेल असे वरील परताव्याच्या दरांनी दाखवून दिले आहे व या पुढेही दाखवतील. म्हणूनच हा फंड आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गाभा (Core Holding) असायला हवा हेच या निमित्ताने सांगणे आहे.
mutualfund.arthvruttant@gmail.com