|| तृप्ती राणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणपणे २००५ सालची गोष्ट. विकास नुकताच एका नामांकित कंपनीत नोकरीला लागला होता. पगार चांगला मिळणार म्हणून स्वारी जाम खूश. आणि सर्वात पहिलं त्याने काय केलं? तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घरात स्वत:ची गाडी यायला हवी याची तजवीज करून आला. त्याचे इतर मित्र त्याच्याआधीच गाडीवाले झाले होते. त्यामुळे त्यालासुद्धा कधी एकदा गाडीत बसून मित्रांना दाखवतो असं झालं होतं. आई-बाबांना सरप्राईझ द्यायची इच्छा मनात बाळगून गुपचूप सगळे सोपस्कार करायचे असं ठरवून त्याने वाहन कर्जासाठी अर्ज केला. आपल्यावर कोणती जबाबदारी नाही आणि मिळकतीत व्यवस्थित बसतंय म्हणून कर्ज काढलं आणि नवी कोरी गाडी धनत्रयोदशीला दारात आणून उभी केली.

आई-बाबा आपल्या लेकाची पहिली मोठी खरेदी बघून खूश झाले. बाबांनी लगेचच चौकशी सुरू केली – ‘‘कितीला पडली? पसे कसे दिलेस? कर्ज किती, कुठून आणि किती वर्षांसाठी घेतलं?’’

विकास त्यांना थांबवत म्हणाला – ‘‘अहो बाबा सगळं सांगतो. आधी गाडीत बसा तर. चला जवळच राउंड मारू या. तेव्हा सांगतो!’’

सगळे गाडीत मस्तपकी फिरून घरी आले, तसं बाबांनी विकासला म्हटलं – ‘‘अरे विकास! गाडी मस्त आहे तुझी. तुला बरेच दिवस घ्यायची होती हे मलाही जाणवत होतं. तरी मुद्दाम मी विषय काढत नव्हतो. पण आता तू चांगलं कमवायला लागला आहेस. तेव्हा तुझ्या पशाचे निर्णय तू घ्यायला हवे हे नक्की. परंतु एक गोष्ट जी मला सांगायची आहे ती जरा लक्ष देऊन ऐकशील तर तुझाच फायदा.’’

त्यावर मान डोलवत विकास म्हणाला – ‘‘बाबा मला माहीत आहे, तुम्ही मला काय सांगणार. कशाला गाडी घेतली? खरंच तुला गरज आहे का? प्रवासासाठी इतर पर्याय आहेत ना!! पण बाबा प्रत्येक वेळी नुसती गरज पाहायची का? हौस कधी करायची? मला मान्य आहे की परिस्थिती पाहून खर्च करावा. पण आता पगार आहे की चांगला, कर्जाचा हफ्ता व्यवस्थित बसतोय. मग का नाही हौस पुरी करावी?’’ एखाद्या लहान मुलासारखा विकास बाबांबरोबर वाद घालत होता.

तेवढय़ात त्याची आई मध्ये पडत म्हणाली – ‘‘अरे विकास! जरा थांबशील का? मुद्दा तू गाडी घेण्याबद्दल नाहीये, तर कर्ज काढून गाडी घेण्याबद्दल आहे. आपली हौसमौज आपण आपल्या पशातून नक्की करावी. शेवटी आयुष्यात नुसत्या गरजा पुरवण्यापलीकडे पण काहीतरी हवं ना! पण कर्ज काढून हौस भागवणं हे तुला चुकीचं नाही का वाटत? तू थोडा पुढचा विचार केला असतास तर बरं झालं असतं.’’

विकास थोडा शांत होत म्हणाला – ‘‘पुढचा विचार कसला?

त्यावर बाबा म्हणाले – ‘‘अरे, तू कर्ज काढताना फक्त आजच्या पगारात हफ्ता बसतोय हेच पाहिलंस, पण तुझ्या आíथक नियोजनाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य आहे का? हे तपासायला तू विसरलास.’’

बाबा असं सांगेपर्यंत आई कागद आणि पेन घेऊन आली. विकाससमोर तिने आकडेमोड करायला सुरुवात केली. म्हणाली – ‘‘चल आपण एक अंदाज बांधू या की पेट्रोल आणि कर्जाचे व्याजदर पुढील सात र्वष आजच्याइतकेच राहतील.’’  (तक्ता क्र. १ पाहा)

तक्त्यात मांडलेले गणित बघून विकास लगेच बोलला – ‘‘अगं आई, पण मी गाडीने गेलो की रोजच्या प्रवासाचे पसे वाचतील, शिवाय आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा टॅक्सी करतो! तेव्हा तो पण खर्च वाचेल. आणि गाडी असल्यावर आपल्या वेळेत आपण निघू आणि त्यात कधी धावपळ करायची वेळ आली तर टॅक्सीवाल्याचे पाय नको पकडायला! काढली गाडी की निघालो.’’

त्याच्या मुद्दय़ांवर हसत बाबा म्हणाले – ‘‘अगदी बरोबर मुद्दे मांडलेस बरं का! पण थोडं गणित चुकलं तुझं. तुझा रोजचा आणि आपल्या सर्वाचा एकत्र कधीतरी होणारा प्रवास खर्च हा या खर्चापेक्षा बराच कमी आहे. कारण रोज तू एकटय़ासाठी गाडी चालवणार. महिन्यातून एकदा किंवा फार फार तर दोनदा आपण तिघं यातून प्रवास करू आणि तेव्हाच आपल्याला टॅक्सीपेक्षा ते स्वस्त पडेल. गरजेला आपलं वाहन केव्हाही फायद्याचं ठरतं हे तुझं बरोबर आहे. शिवाय आपण स्वत:च्या गाडीतून जरा व्यवस्थित जाऊ शकतो. पण आता तुला एक पर्यायी विचार सुचवतो. तू जर आज गाडी न घेता तुझ्या मासिक गाडीच्या खर्चामधून पुढची सात र्वष रोज टॅक्सीने प्रवास केलास आणि उरलेले पसे गुंतवलेस, तर तुझ्याकडे खालीलप्रमाणे पसे जमतील. (तक्ता क्र. २ पाहा)

तुला हे लक्षात आलं का की पुढच्या काही वर्षांत तुझं लग्न होईल, तेव्हा आपलं हे घर लहान पडेल. त्यावेळी एक तर आपण मोठं घर बघू किंवा तू तुझा वेगळा संसार थाटशील. मग अशा वेळी ही जमा केलेली रक्कम तुझ्या कामी नाही का येणार? शिवाय आणखी एक मुद्दा लक्षात घे. जेव्हा एखाद्या व्यवसायासाठी गाडी घेतली जाते, तेव्हा तिचा सगळा खर्च हा कर वाचवण्यासाठी उपयोगी पडतो. पण वैयत्तिक गाडीच्या हफ्त्यावर किंवा तिच्या इतर कुठल्याही खर्चावर आपल्याला कुठलीही कर सवलत मिळत नाही. आणि जर तुला ७ र्वष वाट पाहायची नसेल, तर तीन वर्षांत विनाकर्ज गाडी घेण्याकरिता किती पसे साठवायला लागतील हे ठरवून घे आणि त्यानुसार गुंतवणूक कर. तुझे खर्च कमी कर आणि किमान ८०% पगार गुंतवणूक करून बघ. साधारण ११-१२,००० रुपये जर तू गुंतविलेस, तर तीन वर्षांत १०% सरासरीने परतावा मिळून तू ४.५ लाखांची गाडी घेऊ शकशील.

त्यावर पुढे आई म्हणाली – ‘‘शिवाय मला असंही वाटतं की कमाईची सुरुवात ही कर्जफेडीने न होता गुंतवणुकीने झाली पाहिजे. एकदा हातात थोडे पसे साचले, आणि पुढे गुंतवणुकीतील परताव्यातून खर्च झाले तर बरे. आज तू एकटा आहेस, तुझे इतर फारसे खर्च नाहीत, घरातली जबाबदारी तशी अजून तुझ्या अंगावर आम्ही टाकत नाही आहोत. तेव्हा तोवर तू गुंतवणूक केली असतीस तर जास्त योग्य झालं असतं असं आम्हा दोघांनाही वाटतं. तुझा आनंद हा आमच्यासाठीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. पण गुंतवणूक आणि खर्चाच्या बाबतीत दूरदृष्टी असायलाच हवी.’’

विकासला हे सगळं म्हणणं योग्य वाटलं. पण आता करणार काय? गाडी तर घेऊन झाली होती, आणि पुढच्या महिन्यापासून हफ्ता पण सुरू होणार होता. तेव्हा बाबा म्हणाले – ‘‘आता झालं ते झालं. पण या पुढे असे निर्णय घेताना सर्व बाजूने विचार कर!’’

असे अनेक विकास आपल्याकडे आहेत. तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा प्रयत्न.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

trupti_vrane@yahoo.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to invest in a car
First published on: 23-06-2019 at 23:35 IST