लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे राज्यभरातील पालकांकडे लक्ष लागले होते. आता आरटीईअंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू होत असून, पालकांना १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश दिले जातात. शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसल्यासच एक किलोमीटरच्या अंतरावरील स्वयंअर्थसहाय्यित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. शाळा निवडताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयंअर्थसहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे.

आणखी वाचा-महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ

एखाद्या पालकाला प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळेची निवड करावयाची असल्यास पालकाच्या प्राधान्यक्रमानुसार संबंधित शाळा निवडता येणार आहे. आरटीई प्रवेशासाठी महानगरपालिकेच्या शाळा, नगरपालिका शाळा, नगर परिषद शाळा, नगरपंचायत शाळा, कटक मंडळाच्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिकेच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा, खासगी अनुदानित शाळा आणि स्वयंअर्थसहाय्यित याच शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. अल्पसंख्याक शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार नाहीत.

आणखी वाचा-बारामतीमधून कोणी घेतले उमेदवारी अर्ज? कोणी भरला अर्ज?

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) केलेल्या बदलामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदा मोठ्या प्रमाणात जागा वाढल्या आहेत. राज्यभरातील ७५ हजार ९७४ शाळांमधील ९ लाख ७२ हजार ८२३ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतचा कालावधी मिळणार आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या बदललेल्या नियमांनुसार किती शाळांना प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज येतात याचा आढावा घेऊन सोडत काढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घेतली जाईल, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.