जागतिक आणि स्थानिक पातळीवरील आर्थिक घटकांमुळे भारतातील भांडवली बाजारात चढउतार होत असतात, ज्याबद्दल सामान्य गुंतवणूकदारांना फारशी माहिती नसते. म्हणूनच गुंतवणूक करताना कोणत्या धोरणाचा अवलंब करावा हे ठरवणे गुंतवणूकदारांना कठीण होऊन बसते. गुंतवणूकदारांना बाजारातील कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी चढउतार असणारे आणि पुरेसा परतावा देणारे गुंतवणूकविषयक धोरण हवे आहे आणि लाभांश मिळवून देणारे धोरण नेमके तेच करते. या धोरणाअंतर्गत सातत्याने उच्च लाभांश जाहीर करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली जाते.
जगभरात, उच्च लाभांश परतावा देण्यात उत्तम कामगिरी असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे उत्तम समजले जाते. कारण त्या उच्च गुणवत्ता आणि कमी चढ-उतार दर्शवतात. वास्तवात, जागतिक स्तरावर लाभांश परतावा निर्देशांकानी सर्व प्रकारच्या बाजारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. समभाग गुंतवणुकीतून मिळालेल्या एकूण परताव्यापकी जवळपास ४० टक्के परतावे हे लाभांश उत्पन्नातून दिले गेले आहेत. यातून लाभांश उत्पन्न देणाऱ्या समभागांचे महत्त्व अधोरेखित होते.
‘सीएनएक्स डिव्हिडंड अपॉच्र्युनिटीज इंडेक्स’ हा भारतातील लाभांश परतावा निर्देशांक असून त्याने बाजारपेठेत मंदी असो वा तेजी असो, नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. हा निर्देशांक २००७ पासून अस्तित्वात आहे आणि त्याच्या स्थापनेपासून जवळपास सर्वच वर्षांमध्ये म्हणजे सात पकी सहा वेळा या निर्देशांकाने निफ्टीला वार्षिक परतावा कामगिरीच्या संदर्भात आजवर मात दिली आहे.
लाभांश परतावा देणारे भाग कमी चढ-उतार दर्शवतात.
होय हे निश्चित खरे आहे. उदाहरणार्थ, ‘बीएसई;च्या बाजार भांडवलानुसार पहिल्या १०० कंपन्यांपकी नफा वितरित न केलेल्या कंपन्यांच्या तुलनेत लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘अॅन्युअलाईझ्ड स्टँडर्ड डेव्हिएशन’ अर्थात वार्षिक मानक विचलन कमी असल्याचे लक्षात आले आहे.
नियमित पद्धतीने सतत उच्च लाभांश उत्पन्न देणाऱ्या समभागांमुळे त्या कंपनीच्या पाया भक्कम आहे, याची खात्री पटते. कारण कंपन्या लाभांश तेव्हाच देऊ शकतात जेव्हा त्यांचा ताळेबंद दीर्घकाळाकरिता उत्तम असेल आणि त्यांचा पतप्रवाह सक्षम असेल. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दर्जाविषयक किमान निकष तरी पार केला जातो. लाभांश देऊ करणाऱ्या कंपन्या दर्जा आणि स्थर्य दर्शविण्यासोबत कंपनीच्या व्यवस्थापनाची विश्वासार्हता आणि उत्तरदायित्वही अधोरेखित करतात. हेही तितकेच खरे की, भांडवली वृद्धीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत लाभांशातून मिळणाऱ्या उत्पन्नात होणारे चढउतार कमी असतात. उदाहरणार्थ, दशकभर सतत लाभांश देत असलेली कंपनी एखाद्या वाईट वर्षांमध्ये लक्षणीय कमी अथवा लाभांश देणारच नाही, अशी शक्यता खूपच कमी असते.
आपले भौगोलिक स्थान, उद्योगक्षेत्र आणि उत्पादन श्रेणी यांच्या साहाय्याने चिरंतन स्वरूपाची स्थायी वाढीचा पथ प्राप्त केल्यानंतरच, सातत्यपूर्ण लाभांश देण्याच्या पात्रतेला कंपन्या येत असतात. अशा कंपन्यांची भौतिक मालमत्ता अतिशय भक्कम असते आणि त्यामुळे किंमतींवर नियंत्रण राखण्यात त्या तरबेज असतात. पर्यायाने बाजारपेठेत सक्षम स्थान प्राप्त करण्यास आणि वेगवेगळ्या आíथक वातावरणामध्ये लाभांश देऊ करण्याची क्षमता बाळगण्यास त्यांना मदत होते. तेजीच्या बाजारामध्ये तर अशा कंपन्या म्हणूनच भांडवल-वृद्धीचीही भूमिका निभावतात आणि गुंतवणूकदारांच्या एकूण फायद्यात भर घालत असतात. बाजाराची परिस्थिती स्थिर असो वा त्यात चढउतार असो ते भांडवली अधिमूल्यनात आपला वाटा राखतात. त्यामुळे उच्च लाभांश देणाऱ्या समभागांना नेहमीच चांगलाच प्रतिसाद मिळतो.
गुंतवणूकविषयक प्राथमिक आराखडा तयार करायचा झाला तर इतर अनेक निकषांचा विचार करावा लागतो. या निकषांमध्ये कंपनी आणि तिच्या उद्योग क्षेत्राबद्दलच्या प्राथमिक बाबी, कंपनीचे स्पर्धात्मक स्थान आणि व्यवस्थापनाची आतापर्यंतची कामगिरी यांचा समावेश होतो. तथापि लाभांश देणाऱ्या समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली अथवा वाईट अशी वेळ नसतेच. म्हणूनच आपल्या समभाग पोर्टफोलियोचा भाग म्हणून लाभांश परताव्याचे धोरण अवलंबण्याची शिफारस केली जाते. ज्या गुंतवणूकदारांना या ‘लाभ’ गुणाबरोबरच, निवडीच्या निर्णयविषयक तज्ज्ञता आणि वैविध्यतेचे लाभही अधिकचा हवा असेल तर त्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा मार्ग चोखाळणे कधीही हितावह ठरेल. म्युच्युअल फंडाच्या ‘डिव्हिडंड यील्ड इक्विटी’ योजना हाच कार्यभाग साधतात.
(लेखक आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी)
लाभांश परताव्याचे मापन!
लाभांशांतून मिळणारे उत्पन्न, ज्याला डिव्हिडंड यील्ड असे म्हटले जाते हे असे वित्तीय समीकरण असते, ज्यातून उत्पन्न आणि गुंतवणूक यांचे गुणोत्तर मांडले जाते. लाभांश परताव्याचे हे गुणोत्तर वितरित केल्या गेलेल्या लाभांशाला समभागाच्या बाजारातील किंमतीने भागून आणि त्याला टक्केवारीमध्ये दर्शवण्याकरिता १०० ने गुणून काढले जाते. उदा. जर एखादा कंपनी तुम्हाला प्रति समभाग पाच रूपये लाभांश देत असेल आणि त्या दिवशी त्या समभागाची बाजारातील किंमत २०० रूपये असेल तर त्या समभागाचा लाभांश परतावा २.५ टक्के (५ ला २०० ने भागून येणाऱ्या संख्येला १०० ने गुणल्यानंतर) असेल.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2014 रोजी प्रकाशित
सर्वकाळ‘लाभ’दायक
जागतिक आणि स्थानिक पातळीवरील आर्थिक घटकांमुळे भारतातील भांडवली बाजारात चढउतार होत असतात, ज्याबद्दल सामान्य गुंतवणूकदारांना फारशी माहिती नसते.

First published on: 05-05-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment to get good dividend