आजपानच्या हिताचीने १ ऑक्टोबर २०१५ पासून आपला एअर कंडिशनिंगचा व्यवसाय वेगळा केल्यानंतर त्यातील ६० टक्के हिस्सा बलाढय़ बहुराष्ट्रीय कंपनी जॉन्सन कंट्रोलने घेतला. त्यानंतर या नवीन संयुक्त प्रकल्पाचे नाव जॉन्सन कंट्रोल्स हिताची एअर कंडिशनिंग तर भारतीय कंपनीचे नाव जॉन्सन कंट्रोल्स हिताची एअर कंडिशनिंग इंडिया लिमिटेड असे बदलण्यात आले. जपानमध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीची जगभरात २० उत्पादन केंद्रे असून, त्यापैकी एक भारतात आहे. भारतात लालभाई समूहाची ही कंपनी पूर्वी अॅम्ट्रेक्स हिताची नावाने ओळखली जात असे. ही कंपनी आता मात्र जॉन्सन कंट्रोल्सच्या ताब्यात आहे. हिताची कंपनीचे तंत्रज्ञान आणि जॉन्सन कंट्रोलचे नेटवर्क यांचा निश्चित फायदा या संयुक्त भागीदारीला होईल. भारतात एअर कंडिशनिंग क्षेत्रात फारशा कंपन्या नाहीत. त्यामुळेच प्रगत तंत्रज्ञान आणि उत्तम प्रवर्तक असलेल्या जॉन्सन कंट्रोल्स हिताची सारख्या कंपन्यांना भारतासारख्या प्रगतिशील देशात मोठा वाव आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखविल्याने कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ होत असून आगामी कालावधीत अजूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत कंपनीने ८६२.८० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६१.६३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. सध्या रिटेल क्षेत्रात आघाडी घेतलेली ही कंपनी कमर्शियल एअर कंडिशनर, कॉम्प्रेसर्स तसेच चिलर्सचे देखील उत्पादन करते. कंपनीचे डेट इक्विटी गुणोत्तर अत्यल्प असून भवितव्य उत्तम आहे. त्यामुळेच पुस्तकी मूल्याच्या ११ पटीहून जास्त बाजारभाव असलेल्या जॉन्सन कंट्रोल्स हिताचीचा शेअर महाग वाटत असला तरीही तो एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2017 रोजी प्रकाशित
उत्तम भवितव्य, रास्त मूल्यांकन..
बलाढय़ बहुराष्ट्रीय कंपनी जॉन्सन कंट्रोलने घेतला.
Written by अजय वाळिंबे

First published on: 11-09-2017 at 03:28 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Johnson controls hitachi air conditioning india ltd