|| अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जून महिना सर्व जागरूक गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असतो, कारण याच महिन्यात बहुतांशी कंपन्या आपले लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर करत असतात. या काळात केवळ स्वत:च्या पोर्टफोलियोमधल्याच नव्हेत तर इतरही कंपन्यांचे निकाल अभ्यासून नवीन गुंतवणूक अथवा निर्गुतवणूक करता येते.

भारत फोर्ज या कल्याणी समूहाच्या कंपनीचे आर्थिक निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत या कालावधीत कंपनीने उलाढालीत ३८ टक्के वाढ नोंदवून ५,३१७.९७ कोटी रुपयांचा उच्चांक गाठला आहे. नक्त नफ्यातही तब्बल ४२ टक्के वाढ होऊन तो ७९०.६३ कोटींवर गेला आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीला सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळाल्या असून, बहुतांश ऑर्डर कंपनीच्या नवीन उत्पादन श्रेणीसाठी आहेत.

जगभरात दहा ठिकाणी उत्पादन केंद्र असलेली भारत फोर्ज ही खऱ्या अर्थाने भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची उत्पादने वाहन, तेल आणि वायू, ऊर्जा, बांधकाम, खाण उद्योग, रेल्वे तसेच सरंक्षण अशा महत्त्वाच्या क्षेत्रात वापरली जातात. भारताखेरीज स्वीडन, जर्मनी, फ्रान्स आणि उत्तर अमेरिका येथे कंपनीचे प्रकल्प आहेत. वाहन उद्योगाला पूरक उत्पादने निर्माण करणारी ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील मोठी कंपनी आहे. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांच्या मांदियाळीत बहुतेक सर्व मोठय़ा कंपन्यांचा समावेश होतो. यात प्रामुख्याने बीएमडब्ल्यू, ऑडी, महिंद्र, मित्सुबिशी, होंडा, टोयोटा, फोर्ड, क्रायस्लर, सुझुकी, टाटा, व्होल्वो, दाना, अशोक लेलँड, माजदा, फोर्स मोटर्स अशा अनेक कंपन्यांचा समावेश करता येईल.

कंपनी आपला विस्तारीकरणाचा कार्यक्रम राबवत असून त्या अंतर्गत कंपनीचा बारामती येथील विस्तारीकरणासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. कंपनीने नुकतीच तेवा मोटर्स या ब्रिटिश कंपनीत १० दशलक्ष युरोची गुंतवणूक करून आपणही विजेवरील वाहन बाजारपेठेत आघाडी मिळविण्यसाठी उत्सुक असल्याचे दाखवून दिले आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीला तंत्रज्ञानविषयक कल ओळखण्यासाठी आणि भारतातील परदेशातील इलेक्ट्रिक मोबिलिटीसंबंधी सोल्यूशन विकसित करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

‘मेक इन इंडिया’ योजना, नवीन आधुनिक उत्पादन श्रेणी, विस्तारीकरण आणि बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून गेली अनेक वर्षे केवळ आर्थिकच नव्हे तर शेअर बाजारातही कायम उत्तम कामगिरी करून दाखवणारी ही अनुभवी कंपनी तुमचा पोर्टफोलियो भक्कम करेल यांत शंका नाही.

सूचना :

  • प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
  • लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multinational company in india
First published on: 18-06-2018 at 01:02 IST