ऐतिहासिक उच्चांकाच्या समीप जाण्याच्या अपेक्षेत असणारा भांडवली बाजाराची २० हजाराची वेस ओलांडतानाही दमछाक होत असल्याचे आपण पाहिले. बाजारातील नकारात्मक कल असाच कायम असेल काय?
– भांडवली बाजारातील सध्याचा हा ‘बेअर फेज’ आहे. जागतिक शेअर बाजारांसह भारतातील घडामोडीही त्याला कारणीभूत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत आहे. येथील विदेशी गुंतवणूकदारही आपला निधी काढून घेत आहेत. हे सारे पाहता येत्या काही कालावधीसाठी तरी विशेषत: भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण परतणे दुरापास्त दिसते.
म्हणजे यंदाच्या दिवाळीलाही सेन्सेक्सच्या २१ हजारावरील नव्या शिखराचा बार फुटणारच नाही काय?
– आमचा अंदाज आहे येणारी सहा ते आठ महिने तरी शेअर बाजाराला उठाव येणे कठीण आहे. दीर्घ कालावधीसाठी आशा धरण्यास हरकत नाही. पण या कालावधीबाबत नेमके आताच सांगता येणार नाही.
पण भांडवली बाजाराच्या उभारीसाठी विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. सेबी आणि अर्थमंत्र्यांच्या हालचालींवरून तरी तसेच दिसते..
– हे सारे खरे आहे. मात्र हे प्रयत्न अर्थव्यवस्थेचा आरसा असणाऱ्या शेअर बाजाराला कितपत उंचावणारे ठरतील याबाबत शंकाच आहे. खरी गरज आहे ती सरकारने आर्थिक सुधारणांची धोरणे त्वरेने राबविण्याची. केवळ राजकीय घोषणाबाजीची ही वेळ नव्हे. आर्थिक सुधारणांच्या दिशेने धडक पावले आता उचलली जावीत.
मग नेमके काय आवश्यक आहे?
– सरकारने सूचित केल्याप्रमाणे संरक्षणासारख्या विविध क्षेत्रातील विदेशी गुतवणूक मर्यादा वाढविणे गरजेचे आहे. विमा तसेच निवृत्ती वेतन विधेयकही ताबडतोबीने मार्गी लागावे. कोळसा आणि वायूच्या किमतींबाबतचा प्रलंबित निर्णयही व्हावा. भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये अधिक विश्वास येण्याकरिता प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या ओघापेक्षाही सरकारने धोरणविषयक झपाटा दाखवून त्यांची अंमलबजावणी होणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
चांगल्या मान्सूनमुळे महागाईदरात उसंत आणि संभाव्य व्याजदर कपातीच्या परिणामी मागणीत वाढ, हे दृष्टीपथात असणे भांडवली बाजाराच्या वृद्धीला कारक ठरणार नाहीत काय?
– मान्सूनची सुरुवात तर चांगली झाली आहे. पावसाचा बहर असाच कायम राहिला तर निश्चितच त्याचा हातभार कृषीक्षेत्रासह उद्योगधंद्यांनाही लागेल. शिवाय अर्थव्यवस्थेच्या विकासातही भर पडण्यास त्याची मदत होईल. एकूणच महागाई कमी होण्यासही ते कारणीभूत असेल. घसरता औद्योगिक उत्पादन दर आणि कमी होत जाणारी महागाई पाहता व्याजदर कपातीची आशा बळावली आहे. यामुळे व्याजदराशी निगडित क्षेत्रावर सकारात्मक पडसाद भांडवली बाजारातही उमटतील.
सध्याच्या स्थितीत कोणत्या क्षेत्राकडे, समभागांकडे गुंतवणूक वळविण्याचा सल्ला आपण द्याल?
– गुंतवणुकीची हीच खरी वेळ आहे, असे मी मानतो. मात्र ती सरसकट न करता थोडी थोडी करावी. बाजार घसरता असतो तेव्हाच शेअरमध्ये पसा ओतावा. आयातीवर अवलंबून असलेली क्षेत्रे अथवा कंपन्यांमध्ये नरमाई आल्याचे आपण अनुभवले. आता मात्र औषधनिर्माण, बँक व वित्त आदी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही. नेमके समभागच सांगायचे झाल्यास ल्युपिन फार्मा, इंडसइंड बँक शिवाय युनायटेड स्पिरिट अशी नावे घ्यावी लागतील.
किशोर बंग
संचालक,निर्मल बंग सिक्युरिटिज