भारतीय विमाक्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या एलआयसी या कंपनीची जानेवारी २०१४ पासून नवीन अवतारात आलेली ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ या प्रकारातील नफ्यासह असलेली ही पॉलिसी. पूर्वीच्या पॉलिसीप्रमाणेच या नवीन पॉलिसीमध्येही पॉलिसीची टर्म संपल्यावरही विमाछत्र चालूच राहते. अगदी वयाच्या ९९ वर्षांपर्यंत.
पॉलिसीचे लाभ :
विमाधारक पॉलिसीची टर्म तरून गेला तर त्याला मूळ विमाछत्राची रक्कम आणि त्याचबरोबर त्याच्या खात्यात जमा झालेला बोनस इतकी रक्कम प्राप्त होते. पॉलिसीच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर विमाछत्र आणि त्या काळामध्ये त्याच्या खात्यात जमा असलेला बोनस इतकी रक्कम वारसाला दिली जाते. त्यामध्ये अनेक वेगवेगळे पर्याय आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत ही रक्कम त्याने जमा केलेल्या एकूण प्रीमियमच्या १०५ टक्क्यांपेक्षा कमी नसते.
पॉलिसीमध्ये अनेक प्रकारचे रायडर्सही आहेत. अपघाती मृत्यूच्या संभावनेमध्ये विमाछत्राच्या दुप्पट रक्कम दिली जाते. अपघातामध्ये अपंगत्व आले तर त्यानंतरचे प्रीमियमचे हप्ते माफ केले जातात. त्याचबरोबर पुढील १० वष्रे त्याला विमाछत्र/१२० इतकी रक्कम दिली जाते. विमाछत्र १० लाख रुपये असेल तर वार्षकि रक्कम होते रु. ८,३३३. त्या काळामध्ये पॉलिसी चालूच राहते आणि टर्म संपल्यावर मॅच्युरिटीची रक्कमही दिली जाते.
उदाहरण :
विमाधारकाचे वय : ३३ वष्रे
विमाछत्र : रु. २२,५०,०००
(अपघाती मृत्यू, अतिरिक्त रु. २२,५०,०००)
टर्म : २५ वष्रे
वार्षकि प्रीमियम : रु. १,०५,०३९ (पहिल्या वर्षांसाठी)
आणि : रु. १,०३,४६५ (उर्वरित २४ वर्षांसाठी)
प्रीमियम भरायची टर्म : २५ वष्रे
पॉलिसीचे लाभ :
या पॉलिसीमध्ये बोनसची तरतूद आहे. विमा इच्छुकाला दिलेल्या लेखाचित्रानुसार दर वर्षांच्या बोनसची रक्कम आहे रु. ४८ प्रति हजार. या पॉलिसीमध्ये दरवर्षी बोनस जमा होत असल्याने विमा इच्छुकाच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये त्याच्या वारसाला मिळणारी रक्कम दरवर्षी वाढत जाते. अपघाती मृत्यूच्या संभावनेमध्ये वारसाला रु. २२,५०,००० इतकी अतिरिक्त रक्कम प्राप्त होते. ही दरवर्षी वाढत जाणारी रक्कम त्याच्या वयाच्या ५८ व्या वर्षी रु. ६८,६२,५०० होते आणि अपघाती मृत्यूसंदर्भातील रक्कम होते रु. ९१,१२,५००. पॉलिसीची टर्म पूर्ण झाली की विमा इच्छुकाला रु. ७७,९१,७५० प्राप्त होतात आणि त्यानंतर काहीही प्रीमियम न भरता त्याच्या वयाच्या ९९ व्या वर्षांपर्यंत त्याला पूर्वीचेच विमाछत्र लाभते. त्याने वयाची शंभरी पूर्ण केली तर कंपनी त्याला मूळ विमाछत्राचे रु. २२,५०,००० परत देते. थोडक्यात, विमा इच्छुकाला वार्षकि बोनसमुळे वाढत जाणारे विमाछत्र मिळतेच; परंतु तो जर पॉलिसीची टर्म तरून गेला तर शंभरीपर्यंत एकूण रु. १,००,४१,७५० ची प्राप्ती होते.
विश्लेषण :
नवीन अवतारामधील ही जीवन आनंद याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात बाजारात आल्याने तिच्या बाबतीत बोनसचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ नाही. पूर्वीच्या जीवन आनंदच्या गेल्या ९ वर्षांच्या बोनसच्या इतिहासावर नजर टाकली तर वार्षकि सरासरीची बोनसची रक्कम होते सुमारे रु. ४६ प्रति हजार. म्हणजे विमाछत्राच्या रकमेच्या ४.६ टक्के. या पाश्र्वभूमीवर नवीन पॉलिसीच्या लेखाचित्रामध्ये वार्षकि बोनसची रक्कम रु. ४८  प्रति हजार (विमाछत्राच्या ४.८ टक्के) ही कोणत्या आधारावर दर्शविली आहे त्याचा उल्लेख नाही. एक वेळ रु. ४८ प्रति हजार ही बोनसची रक्कम ग्राह्य धरली तर पॉलिसीचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विमा इच्छुकाच्या खात्यात जमा होणारी बोनसची रक्कम होते रु. १,०८,०००. म्हणजे त्याच्या मृत्यूच्या संभावनेत त्याच्या वारसाला मिळणारी एकूण रक्कम होते रु. २३,५८,००० (रु. २२,५०,००० विमाछत्र + रु. १,०८,००० बोनस). परंतु लेखाचित्रामध्ये मात्र रु. २९,२०,५०० रक्कम दाखविली आहे. ही जास्तीची रु. ५,६२,५०० ची रक्कम कोणत्या आधारे दाखविलेली आहे त्याचा स्पष्ट उल्लेख लेखाचित्रामध्ये कोठेही नाही. खाली एक छोटीशी टीप मात्र दिली आहे. ‘कॅलक्युलेशन्स इन्क्लुडस् बोनस अॅन्ड फायनल ऑडिशनल बोनस अॅव्हेलेबल टू द प्लान अॅज ऑफ टुडे’. या टिपेनुसार ही जास्तीची रक्कम रु. ५,६२,५०० (विमाछत्राच्या २५ टक्के) पहिल्याच वर्षी दिलेला ‘फायनल अॅडिशनल बोनस’ म्हणून समजायचा का? जुन्या जीवन आनंद पॉलिसीच्या बाबत कंपनीच्या संकेतस्थळावर अशा प्रकारची नोंद दिसत नाही.
विमा इच्छुक पॉलिसीच्या २५ वर्षांच्या टर्ममध्ये एकूण रु. २५,८८,१७५ चा कंपनीकडे भरणा करतो. वार्षकि सरासरीची रक्कम होते रु. १,०३,५२७ आणि विक्रेत्याने दिलेल्या लेखाचित्रानुसार पॉलिसीची टर्म संपल्यावर म्हणजे त्याच्या वयाच्या ५९ व्या वर्षी कंपनी त्याला रु. ७७,९१,७५० देणार. ही रक्कम ग्राह्य़ धरली तर विमा इच्छुकाने जमा केलेल्या प्रीमियमच्या रकमेवर परताव्याचा दर पडतो ७.७ टक्के. विमा इच्छुकाने जमा केलेल्या प्रीमियममधून विक्रेत्याचे आणि इतरांचे कमिशन, मॉरटॅलिटी आणि इतर शुल्क वजा जाता उर्वरित रकमेची गुंतवणूक केली जाते आणि पारंपरिक विमा पॉलिसीच्या पशांच्या गुंतवणुकीबाबत इर्डाच्या नियमावलीनुसार त्या रकमेपकी ८५ टक्के रक्कम डेटमध्ये (सुमारे ८ टक्के परतावा) आणि जास्तीत जास्त १५ टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक केल्यावर विमा इच्छुकाच्या एकूण जमा केलेल्या रकमेवर ७.७ टक्के परताव्याचा दर (आणि तोही प्राप्तीकरमुक्त) म्हणजे जरा अतीच वाटते. किंबहुना अशक्य वाटते असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. या रु. ७७,९१,७५० च्या रकमेबाबत कंपनी कोणत्याही प्रकारची हमी देत नाही. त्याशिवाय विमा इच्छुकाचा वयाच्या ५९ व्या वर्षांपासून ते ९९ व्या वर्षांपर्यंत केव्हाही मृत्यू झाला तर कंपनी त्याच्या वारसाला रु. २२,५०,००० देणार. (अपघाती मृत्यूमध्ये रु. ४५,००,००० रु.) आणि त्याने वयाची शंभरी पार केली तर त्याला रु. २२,५०,००० देणार. हे सर्व पाहिल्यावर विक्रेत्याने विमा इच्छुकाची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे लेखाचित्र दिले आहे का अशा शंकेला वाव आहे. त्यासाठी सबळ कारणही आहे. या कंपनीच्या जीवन सरल पॉलिसीची विक्री करताना (३१ िडसेबर २०१३ पूर्वी) विक्रेते वार्षकि १० टक्के परताव्याचे (आणि तेही चक्रवाढ व्याजाने) आमिष दाखवतच होते. तर्कसंगत विचार केला तर ‘पॉलिसीच्या टर्ममध्ये माझा मृत्यू झाला तर कंपनी माझ्या वारसाला विमाछत्राचे पसे आणि बोनस देणार. मी टर्म तरून गेलो तर मला ७.७ टक्क्यांच्या परताव्याने (आणि तेही प्राप्तीकरमुक्त) पसे देणार आणि त्यानंतर केव्हाही माझा मृत्यू झाला तर माझ्या वारसाला विमाछत्राची रक्कम देणार. नाही तर माझ्या शंभरीला मला रु. २२,५०,००० देणार.’
पर्याय :
विमा इच्छुकाकडे दरवर्षी रु. १,०३,४२७ इतकी रक्कम उपलब्ध आहे. त्याने ९५ टक्क्यांपेक्षा अधिक ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ असलेल्या विमा कंपनीची २५ वर्षांच्या टर्मची १ कोटी रुपयांच्या विमाछत्राची प्युअर टर्म पॉलिसी घेतली तर त्याच्या वार्षकि प्रीमियमची रक्कम होते रु. १३,९५५. वार्षकि बचत रु. ८९,५७२. त्याने दरवर्षी रु. ८९,५७० गुंतवणुकीच्या अशा पर्यायामध्ये गुंतविले – की ज्यामध्ये प्राप्तीकरमध्ये सूट आणि ठोस परतावा आहे – तर त्याच्या वयाच्या ५९ व्या वर्षी प्राप्तीकरमुक्त अशी खात्रीलायक गंगाजळी होते रु. ८१,१४,७००. आणि ती रक्कम त्याने प्राप्तीकर वजा जाता निव्वळ ६ टक्के परताव्याच्या पर्यायामध्ये गुंतविली तर त्याला वार्षकि रु. ४,८०,८८२ ची (मासिक सुमारे रु. ४०,०००) निवृत्ती वेतन चालू होते.  
याच विमा इच्छुकाने जर पूर्व नियोजित जोखीम घेऊन म्युच्युअल फंडाच्या प्राप्तीकर बचत योजनांमध्ये मासिक  रु. ७,५०० ची एसआयपी केली तर त्याच्या वयाच्या ५९ व्या वर्षी प्राप्तीकर मुक्त अशी रु. १,४२,३२,००० ची गंगाजळी तयार होण्याची शक्यता आहे.
(लेखामधील माहिती प्रत्यक्ष लेखाचित्रामधून घेतली आहे. लेखाचा उद्देश विमा इच्छुकांना संतर्क करण्याचा आहे.)