गाढव, रानडुक्कर, कुत्रे यासारख्या प्राणि वाचक शब्दांनी दुसऱ्यांना दूषणं देण्याची सोय बऱ्याच भाषांनी करून ठेवली आहे. वास्तविक आपण ज्या प्राण्यांना बिनडोक, रेम्याडोक्याचं, चिखलात लोळणारं, लाळ घोटणारं समजत असतो, त्यांच्या वैशिष्टय़ांची आपल्याला फारशी माहितीच नसते.

आपल्या देशातल्या बहुतांश भाषांमध्ये, प्राणिवाचक शब्दांनी एकमेकांचा उद्धार करण्याची मौखिक पद्धत आहे. माकड, गाढव, डुक्कर, कुत्रा अशा प्राण्यांचा उद्धार आपल्या बोलीभाषेतून सहज करत असतोच. या उद्धारात मनुष्य श्रेष्ठ आणि उल्लेखलेला प्राणी कनिष्ठ अशीच भावना बहुतांश परावíतत होत असते. वास्तविक आपण ज्या अर्थाने तो प्राणी उल्लेखलेला असतो, त्या अर्थाचा गुण त्या प्राण्यात क्वचितच दिसतो. उदाहरणार्थ, ‘बिनडोक गाढव आहेस’ या विधानातलं, ‘बिनडोक गाढव’ हे सर्वार्थाने चूकच असतं. आज आसमंतातल्या गप्पांमध्ये अशाच काही बदनाम झालेल्या प्राण्यांचं मूळ शोधायचा प्रयत्न असणार आहे.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

आपल्याला माहीत असलेली गाढवं ‘एकौस’ कुटुंबाची सदस्य समजली जातात. घोडे, झेब्रेसुद्धा या कुटुंबाचे सदस्य असतात. म्हणतात ना, जसं माणसाच्या पूर्वजांचं मूळ आफ्रिकेत सापडलं, तसंच गाढवाचं मूळसुद्धा आफ्रिकन गाढवाशी जोडलेलं आहे. आपल्याला दिसणारी गाढवं त्यांचेच वंशज आहेत. गंमत म्हणजे ही वंशज गाढवं जगभर पसरली आहेत नि मूळ ‘आफ्रिकन जंगली गाढवं’ मात्र आफ्रिकेत फार थोडय़ाच ठिकाणी अस्तित्वात राहिली आहेत. ही गाढवं जगभर गेली कशी, हा प्रश्न आहेच. रोमन लोकांनी ‘ओझ्याचं गाढव’ बनवून जग पादाक्रांत करायला त्यांना वापरलं. मध्यपूर्वेकडून गाढवं भारत व चीनमध्ये आली. जगभर वेगवेगळ्या जातींशी संकर झाल्याने गाढवांचा रंग नि आकार वेगवेगळे झाले आहेत, पण सर्वत्र जास्तीत जास्त आढळणारा रंग म्हणजे मातकट राखाडी रंग. भारताच्या वाळवंटी भागात अजूनही जंगली गाढवं राहातात जी अतिशय चपळ, वेगवान असतातच पण दिसायला तुकतुकीत नि देखणी असतात. या जंगली गाढवांचं खास राखीव असं अभयारण्यही कच्छमध्ये आहे.

गाढवांबद्दल आपण इतके गरसमज बाळगून असतो की बास रे बास! सगळ्यात मोठा गरसमज म्हणजे गाढवं तद्दन बावळट नि मूर्ख असतात. म्हणूनच की काय, कुणाला हिणवायला आपण गाढव म्हणतो. खरं तर गाढव हा अतिशय बुद्धिमान आणि चतुर प्राणी आहे. जगभर कुठल्याही परिस्थितीमध्ये जगण्यासाठी स्वत:ला अ‍ॅडजस्ट करून घेणारी गाढवं काहीही खाऊ शकतात. कारण मुळात वाळवंटात राहून मिळेल ते खाण्याची आणि पचवण्याची सवय त्यांना निसर्गाने लावून दिलेली आहे. गाढवांची बुद्धी अतिशय चांगली असते. इतकी चांगली की ती आपल्या राहण्याचा भाग नि आपल्या साथीदारांना वर्षांनुर्वष विसरत नाही. मठ्ठ समजला जाणारा हा प्राणी अतिशय चौकस असतो नि जिथे जाईल, तिथली माहिती करून घेण्यात रस दाखवतो. या माहिती गोळा करण्याला आपण उगाचच ‘उकिरडे फुंकणं’ म्हणतो. बऱ्याचदा आपण एखाद्या न ऐकणाऱ्या मुलाला ‘हट्टी गाढव’ आहेस असं म्हणून जातो. गाढवांचा हा हट्टीपणा नक्की काय असतो हे आपल्याला माहीतच नसतं. हा हट्टीपणा दुसरं तिसरं काही नसतं ती फक्त स्वत:साठी केलेली सुरक्षेची कृती असते. प्रत्येक कृती करताना गाढव स्वत:च्या सुरक्षेचा विचार करतं. अमुक एका ठिकाणी जाणं जर गाढवाला सुरक्षित नाही वाटलं तर त्या ठिकाणी ते अजिबात जातच नाही. याच कारणासाठी जेव्हा गाढवांच्या टोळीतला एखादा सदस्य घाबरतो, तेव्हा बाकीच्या टोळीकडून काम करून घेणं कठीण होतं. आपल्या लहान मुलांना शिकवतो, तसंच कृती करून गाढवांना शिकवणं सोप्पं आहे. जोपर्यंत गाढवांना एखादी कृती केलेली दिसत नाही व ती स्वत:साठी सुरक्षित आहे हे जाणवत नाही, तोपर्यंत गाढव कुठलीही गोष्ट करत नाही.

विशेष म्हणजे गाढव समूहप्रिय नि समूहाचे नियम मानणारा प्राणी आहे. आश्चर्य म्हणजे, गाढवाचा बुद्धय़ांक घोडय़ांपेक्षा जास्त असून गाढवं स्वत:चा नेता निवडतात. त्यांच्यातील जे सगळ्यात जास्त ताकदवान गाढव असतं ते समूहाचा म्होरक्या बनतं. अगदी वाळवंटातसुद्धा त्यांचा  एक लिडर असतोच जो समूहाला शत्रूंपासून वाचवतो. ही गाढवं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून, अंगावर अंग घासून एकमेकांवरचा विश्वास, कळपाचा स्नेह व्यक्त करतात. गाढवं कायम समूहात राहाणं पसंत करतं. कारण त्याला एकटं रहाणं अजिबात आवडत नाही. याचमुळे जर कुठे एकटं गाढव असेल तर ते अगदी बकऱ्या, शेळ्यांच्या कळपातही राहाणं पसंत करतं. आपल्या हास्याचा विषय असलेला हा प्राणी मुळातच प्रेमळ नि मायाळू स्वभावाचा असतो. आपण मात्र त्यांच्या प्रेम व्यक्त करण्याला गधडप्रेम वगरे म्हणून उपहासाने हसतो.

वाळवंटी प्रदेशातून आलेल्या या प्राण्याला पाऊस आवडत नाही. कारण यांच्या अंगावरचे केस हे ‘वॉटरप्रूफ’ नसल्याने त्यांना पाण्याचा त्रास होतो. इंग्रजीत गाढवांच्या कळपाला ‘हर्ड’ असं म्हणतात. नराला ‘जॅक’ व मादीला ‘जेन्नी’ तर नर पिल्लाला ‘कोल्ट’ व मादी पिल्लाला ‘फिल्ली’ म्हणतात. गाढवीण साधारण चौदा महिने गरोदर राहून एक-दोन पिल्लांना जन्म देते आणि लगेच आठ-दहा दिवसांत पुढच्या मिलनासाठी तयार होते. गाढवाच्या दुधात प्रचंड रोगप्रतिकारशक्ती असते. मला अजूनही आठवतंय की माझ्या आत्याने लहानपणी सर्दीपडसं होऊ नये म्हणून मला गाढविणीचं दूध पाजलं होतं.

गाढवांबद्दल महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ती सतत कान हलवत असतात. हे कान हलवणं बिनकामाचं नसून एकमेकांशी संपर्क साधण्याची डोळ्यांना दिसणारी पद्धत असते. याच जोडीला शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी कान हलवले जातात. स्वसंरक्षणार्थ गाढवं लाथा तर मारतातच, पण चावतातदेखील. तसं बघायला गेलं तर गाढव साधारण पन्नास वर्षांपर्यंत जगतं. बहुतांश देशांमध्ये यांचा उपयोग ओझी वाहायला केला जातो. पण काही देशांमध्ये शेतीसाठी गाढवं वापरतात. ब्रिटिशांनी भारतात डोंगर भागात केलेले रस्ते म्हणजे गाढवांच्या पूर्वजांनी केलेल्यां ‘सव्‍‌र्हेचं’ फळ आहे. कारण डोंगर चढताना गाढव शक्यतो अतिशय सुरक्षित नि कमी श्रमाचे रस्तेच निवडतं. एकेकाळी या कामासाठी गाढवं सरकारी नोकर म्हणून काम करायची हे ऐकून आश्चर्य वाटेल. इतर प्राण्यांसारखी, गाढवाची विष्ठा खत म्हणून किंवा जळण म्हणून उपयोगी येत नाही. कारण या खाण्यातला बहुतांश भाग गाढवं पचवून टाकतात. त्यामुळे उरलेल्याचा काहीच उपयोग नसतो. जगभर  गाढवांवर इतके प्रयोग केले गेले आहेत की बास रे बास. यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांबरोबर संकर करून अनेक नवीन जीव जन्माला घातले गेलेत. झेब्रा आणि गाढविणीच्या संकरातून जन्मणारे जीव ‘झेडॉंन्क’ किवा ‘झॉन्की’ म्हणून आफ्रिकेत वापरतात. गाढव आणि घोडीण यांच्या संकरातून ‘म्युल’ म्हणजेच ‘खेचर’ जन्माला येतं. ते जगभर वापरलं जातं. घोडा आणि गाढवीण यांच्या संकरातून ‘हिन्नी’ नामक जीव जन्माला येतो. किती मोठी माहिती जोडली गेलीय या गाढवाबरोबर. आता कुणाला गाढव म्हणताना हे सगळं जरूर आठवा.

गाढवापाठोपाठ तिरस्कारदर्शक उपाध्या चिकटलेला प्राणी म्हणजे डुक्कर. गटारातलं डुक्कर, रेम्याडोक्याचं डुक्कर, रानडुक्कर वगरे शब्द आपण सर्रास वापरतो. मात्र या धटिंगण प्राण्याबद्दल आपल्याला माहिती कमीच असते.

ज्यांच्या पायांना दोन सारख्या भागांनी बनवलेले खूर आहेत अशा प्राण्यांच्या ‘आर्टयिोडक्टायला’ गटात म्हणजेच गाई, म्हशी, रानरेडे, शेळ्या, मेंढय़ा, रानमेंढय़ा, हरणे, जिराफ, उंट, पाणघोडे या सगळ्या खूरवाल्यांच्या गटातला सर्वात जुना प्राणी म्हणजे रानडुक्कर ऊर्फ इंडियन वाईल्ड बोर. ही रानडुकरं आपल्या देशात सगळ्या जंगलात आढळतात. साधारण तीन फुटांपर्यंत वाढणाऱ्या नि सव्वादोनशे किलो वजनाच्या सुळेवाल्या नराला एकुलगा म्हणतात. हे नर एकटेच राहातात. बाकी माद्या आणि पिल्लांचा लहान आकाराचा कळप असतो. रानडुकरं आणि आपल्या शहरी डुकरांमध्ये दोन मुख्य फरक असतात. पहिला म्हणजे, यांचे सुळे! रानडुकरांमध्ये फक्त नराला बाहेर डोकावणारे मोठे सुळे असतात नि माद्यांना सुळेच नसतात. तर इकडे, शहरी डुकरांमध्ये दोन्ही नर-मादीला असे सुळे नसतात. दुसरा मुख्य फरक म्हणजे वजनाचा. आपली शहरी डुकरं लठ्ठ नि लोदड असतात. कारण त्यांच्या शरीराच्या मागचा भाग वजनदार असतो. रानडुकरांमध्ये डोक्याकडच्या भागात वजन जास्त असते. रानडुकराचं डोकं मोठ्ठं नि वजनदार असतं. म्हणूनच की काय, याची धडक वजनदार नि जोरदार असते.

ही रानडुकरं अतिशय धीट नि ताकदवान असतात. यांच्यावर हल्ला केला किंवा यांना घाबरवलं तर वेगाने धावत येऊन जोरदार धडक मारणे हीच यांच्या बचावाची नि आक्रमणाची पद्धत आहे. यांच्या या जोरदार धडकीला जंगलातले दादा प्राणीसुद्धा घाबरतात आणि नराच्या वाटेला शक्यतो जात नाही. पिल्लं आणि माद्यांना जंगलात भरपूर शत्रू असतात. या पिल्लांच्या रक्षणासाठी माद्या जिवावर उदार होताना आम्ही ताडोबाच्या जंगलात पाहिलंय. यांच्या विणीच्या काळात नरांचे आपापसातले झगडे फारच त्रासदायक असतात ज्यात आपल्या सुळ्यांचा वापर नर व्यवस्थित करतात. मीलनानंतर मादी साधारण चार महिने गरोदर राहून पाच-सहा पिल्लांना जन्म देते. ही लहान पिल्लं सतत आईच्या बरोबरच राहातात. रानडुकरांचं आयुष्य साधारण २०-२१ र्वष असतं. यांच्या गटातल्या इतर खूर असलेल्या प्राण्यांसारखे ही रानडुकरं नुसतं गवत खात नाहीत!  झाडांची मुळं, कंद, झाडाखाली पडलेली फळं, कोवळे कोंब खातातच, पण कधी कधी चक्क किडे, लहान साप, प्राण्यांचं मांसही खातात. या जनावराची गंमत म्हणजे, याचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं पण डोळे आणि कान मात्र उत्तम नसतात. म्हणूनच, खाण्याच्या गोष्टी शोधण्यासाठी हे नाकाचाच उपयोग करतात. हुंगून शोधलेलं खाणं खोदण्यासाठी रानडुकरं आपल्या पुढच्या पायाचा आणि सुळ्यांचा उपयोग करतात.

आपण एखाद्याला रागाने म्हणतो की, ‘अगदी गटारात लोळणारं डुक्कर आहेस’.. या गटारात लोळण्याचं मूळ कशात आहे माहीत आहे? रानडुकरांना पाणी आणि चिखल अतिशय प्रिय आहे. चिखलात लोळून तो पार सुकवून फिरणं ही यांची आवडती सवय आहे. अर्थात, या चिखलामुळे त्यांच्या अंगावर किडे होत नाहीत. शिवाय उन्हाचाही त्रास कमी होतो. हीच सवय आपल्या शहरात दिसणाऱ्या डुकरांमध्ये उतरली आहे. कारण ही रानडुकरं त्यांचे पूर्वजच आहेत. या रानडुकरांच्या अंगावर अतिशय चरबरीत केस असतात. अनेकदा जंगलवारीत सुकलेल्या चिखलात उमटलेल्या रेषा पाहून तिथे डुकरं लोळून गेल्याचं अनुभवी निसर्गवाचक ओळखतो. असं म्हणतात की, रानडुकराचं मांस अतिशय रुचकर लागतं. म्हणूनच तो शिकाऱ्यांचा आवडता प्राणी असावा. यांची वीण भरपूर असल्याने कितीही शिकार झाली तरीही रानडुकरं नामशेष झालेली नाहीत. याचा अर्थ असा नाही की यांची शिकार करायला परवानगी आहे. कायद्याने रानडुक्कर मारणं हा गुन्हा आहे. मागे जंगलात पाहिलेली गम्मत सांगते. डुकरीण पिलांना तिच्या मागे येण्यासाठी कुठला आवाज काढून बोलवत नाही. ती फक्त तिची शेपूट झेंडय़ाप्रमाणे उंच करून जाते आणि मग तिच्यामागे तिचं लटांबर शेपटय़ा वर करून जात राहतं. शेवटचं पिल्लू मात्र शेपूट खालीच ठेवतं.. आहे ना मजेशीर?

डुकरापाठोपाठ विनाकारण बदनाम केला गेलेला प्राणी म्हणजे कुत्रा! असंख्य शिव्यांचा धनी बनलेला हा जीव वास्तविकतेत अतिशय प्रेमळ, विश्वासू आणि विसंबायला सार्थ असतो. आपले पाळीव कुत्रे कॅनिडी कुटुंबाचे असतात. या कुटुंबामध्येच लांडगे, कोल्हे आणि जंगली कुत्रेही असतात. या कॅनिडी कुटुंबाचं वैशिष्टय़ं म्हणजे या सगळ्यांची तोंडं निमुळती, शेपटय़ा झुपकेदार आणि कान गोलाकार, ताठ असतात. लक्षात राहण्यासारखं म्हणजे यांचं शरीर अगदी स्लीक फिट असतं. रानकुत्र्यांना इंग्लिशमध्ये ढोल म्हणतात. आपल्याकडे यांना जंगली कुत्रे असं म्हणतातच, पण कोळसून असंही म्हणतात. हे कुत्रे मध्य युरोपपासून थेट पूर्व अशियन देशांमध्ये आढळतात. वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये यांचा रंग थोडाबहुत वेगवेगळा असतो. आपल्याकडे यांचा रंग लालसर असतो आणि शेपटी झुपकेदार काळसर रंगाची असते. या रानकुत्र्यांच्या पायाकडचा, पोटाकडचा भाग आणि छाती भुरकट-पांढऱ्या रंगाची असते. दीड ते दोन फूट उंच व साधारण तीन फूट असलेल्या या कुत्र्यांच्या कळपाला इंग्लिशमध्ये ‘पॅक’ आणि मराठीत ‘कळप’ म्हणतात. एका कळपात साधारण दहा सदस्य असतात. ज्यात एखादीच मादी आणि उरलेले नर असतात. जंगलातला सगळ्यात टेरर शिकारी म्हणून या रानकुत्र्यांकडे खुश्शाल बोट दाखवायला हरकत नाही. यांची शिकार करण्याची पद्धत अगदी वैशिष्टय़पूर्ण असते. ज्या प्राण्याची शिकार करायची असं हे कुत्रे ठरवतात, त्याचा पाठलाग सगळा कळप करायला लागतो. सतत भक्ष्याचा पाठलाग करून त्याला दमवून त्याचे जिवंतपणी लचके तोडायला हे सुरुवात करतात. हे कुत्रे दोन-दोन करून भक्ष्याच्या मागे धावतात, ते दमल्यावर त्यांची जागा दुसरे कुत्रे घेतात जे मागून थोडे हळू धावत असतात. पुन्हा ते दमल्यावर त्यांची जाग तिसरे घेतात. ही अशी बदलाबदली साधारण दर अर्धा किलोमीटरला होते. भक्ष्य दमल्यावर यांच्यातला एक कुत्रा त्याच्या नाकावर उडी मारतो आणि बाकीचे त्याच्यावर तुटून पडतात. वाघ आणि बिबळ्याप्रमाणेच हे कुत्रे भक्ष्याचं नरडं नाही तर डोळे फोडतात आणि जिवंतपणीच त्याला फाडायला सुरुवात करतात. ऐकायला खूप क्रूर वाटतं, पण हे अगदी खरंय. यांचा स्वत:चा स्टॅमिना जबरदस्त असतोच, पण कळपात एकत्र असलं की अगदी सांबर, चितळं, गवे, डुकरं यांसारख्या आकाराने मोठय़ा प्राण्यांची शिकारही हे करू शकतात. असे क्रूरपणे वागणारे रानकुत्रे आपल्या कळपातल्या सदस्यांची खूप काळजी घेतात. म्हणजे, आजारी कुत्र्यांना, पिल्लं सांभाळणाऱ्या आयांना ते शिकारीतला वाटा व्यवस्थित आणून देतात. कळपातला सगळ्यात ताकदवान नर मुखिया म्हणून काम बघतो. कुठे जायचं, कुणाची शिकार करायची, कुणी शिकारीला जायचं, वगरे हाच ठरवतो. हे सगळं ते एकमेकांशी कसं कम्युनिकेट करतात? आपल्या कुत्र्यांसारखे हे रानकुत्रे भुंकूच शकत नाहीत. भुंकण्याला पर्याय म्हणून ते शिट्टीसारखा आवाज काढतात. शिकार करताना, एकमेकांशी संभाषण करताना ते या शिट्टीचा वापर करतात. शिकारीला निघण्यापूर्वी हा सगळा कळप एकमेकांच्या अंगाला अंग घासून ‘शिकारीला तय्यार’ असा संदेश देतात.

पूर्वी अगदी रशियापासून थेट चीनपर्यंत आढळणाऱ्या या रानकुत्र्यांची संख्या हल्ली कमी व्हायला लागली आहे. दिवसेंदिवस कमी होणाऱ्या जंगलांमुळे यांची राहण्याची ठिकाणं कमी होत चालली आहेत. एका कळपात मादी साधारण पिल्लं घालायच्या हंगामात साधारण सहा/ सात पिल्लांना जन्म देते. ही पिल्लं आईच्या पोटात दोन महिने म्हणजेच बासष्ट दिवस असतात. भारतात जास्तीत जास्त पिल्लं ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांत जन्माला येतात. नराचं वजन साधारण अठरा तर मादीचं वजन सोळा किलोपर्यंत असतं. अंदाजे पंधरा वर्षांपर्यंत या कुत्र्यांचं आयुर्मान समजलं जातं. यांना माणसाळवता येत नसल्याने अजिबात पाळू शकत नाही. याच जंगलीपणामुळे जंगलात यांना सगळे घाबरून असतात. इतके की वाघही यांच्या नादी लागत नाही. निसर्गाने यांना हुंगण्याची, ऐकण्याची जबरदस्त शक्ती दिली आहे. उत्तम धावपटू असलेले हे कुत्रे चक्क सहा-सात फूट लांब उडय़ाही मारतात. उत्तम पोहोण्याच्या कलेमुळे ते आपल्या शिकारीला पाण्यातही पकडतात. अशा शिकाऱ्यांची पिल्लं दोन महिने आईचं दूध पितात. मग हळूहळू त्यांचे पालक त्यांना बाहेरचं खाणं द्यायला सुरुवात करतात. साधारण सत्तर ते ऐंशी दिवस ही पिल्लं आईबरोबर राहतात. सहा महिन्यांची झाल्यावर ती आपल्या कळपाबरोबर शिकारीला जायला सुरुवात करतात. ही पिल्लं लहान असताना कुठे राहतात माहीत आहे? रानकुत्रे जमिनीखाली चक्क बिळासारख्या गुहा खोदतात. जंगलात, जमिनीखाली अनेक आया आपल्या पिल्लांना घेऊन राहतात. अगदी वसाहती असतात यांच्या आणि हे आपल्याला माहीतच नसतं. जंगलात या शिकाऱ्यांना कुणीच धोकादायक शत्रू नाही, पण यांची संख्या भरमसाट न वाढण्याचं कारण एक तर जंगलं कमी होत चालली आहेत हे तर आहेच, पण अजून एक मुख्य कारण म्हणजे यांना अनेक साथीच्या रोगांची लागण होते आणि त्यात हे पटापट मरून जातात. ज्या जंगलात, या कुटुंबातल्या लांडगे, कोल्हे, पाळीव कुत्रे या इतर सदस्यांचा वावर असतो तिथे त्यांच्याकडून येणारे रोगही या कुत्र्यांकडे येतात. असे हे खतरनाक रानकुत्रे जंगलातले उत्तम शिकारी तर आहेतच, पण जंगलातला महत्त्वाचा दुवाही आहेत.

जंगलात फक्त वाघ, बिबळे आणि सिंहच नावाजलेले शिकारी नसतात; त्यांच्याहूनही सरस आणि पटाईत शिकारी तिथे सुखेनव नांदत असतात, ज्यांची माहिती आपल्याला नसते. आपल्या बोलीभाषेने या प्राण्यांना चुकीच्या पद्धतीने, दूषणं म्हणून सामावून घेतलंय. गरज आहे ही दूषणं बदलून त्यांना जंगलाची विशेषणं म्हणून ओळखलं जाण्याची. दैनंदिन जीवनाशी जोडल्या गेलेल्या अनेक प्राण्यांचं मूळ हे कुठे तरी जंगलातच रुजलेलं असतं. बोलीभाषेत वापरला गेलेला प्राणीवाचक शब्द आपलं त्या प्राण्याबद्दलचं कुतूहल जागृत करीत असेल तर उत्तमच. त्या कुतूहलाला बोटाशी धरून निसर्गवाचनाची धूळाक्षरं गिरवायला सुरुवात करायला लागायचं. चुकतमाकत, शिकतविसरत निसर्ग शोधायला सुरुवात केल्यावर त्यात हरवून जाण्यासाठी असंख्य गोष्टी खुणावतात. अशा वेळी, ‘कुत्ते, म तेरा खून पी जाऊंगा’, ‘बिनडोक गाढव, रेम्याडोक्याचं डुक कर’ वगरेसारख्या वाक्यांमधला फोलपणा यथार्थ जाणवतो.
(छायाचित्र सौजन्य – विकीपिडीया कॉमन्स)
रुपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com