News Flash

वृक्ष-फुलं-पक्षी- प्राण्यांच्या देशा…

‘फ्लॉस रेगिनी’ म्हणजे राणीचे फूल!

दर एक मे रोजी उत्साहाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणताना आपल्याला आपल्या राज्याचा वृक्ष म्हणजेच राज्यवृक्ष, तसंच राज्यपक्षी, राज्यप्राणी, राज्यफुलपाखरू माहीत असायला हवेत.

लहानपणी भूगोल हा रटाळच असतो अशी धारणा बाळगून शिकल्यावर, शालेय जीवनातलं भूगोलाचं पुस्तक, शाळा सुटली पाटी फुटली उक्तीप्रमाणे आपल्यापासून दूर जातं ते कायमचं. शालेय जीवनात असल्या ‘बोअरिंग गोष्टी’ पुढे जनरल नॉलेजच्या पेपरला दत्त म्हणून समोर येतात आणि आपल्या मेंदूला कामाला लावतात. हे जनरल नॉलेजचे पेपरवाले काय काय विचारत बसतात.  विविध स्पर्धा, वेगवेगळे देश, त्यांचे झेंडे, त्यांची प्रतीकं वगरे वगरे. असला डोकेबाज अभ्यास करताना जाणवतं की बहुतांश देशांना, त्यातल्या प्रांतांना, राज्यांना स्वत:ची मानचिन्हं आणि प्रतीकं असतात. ही मानचिन्हं तिथल्या संपदेशी, निसर्गाशी जोडलेली असतात. नुकताच एक मे, अर्थात महाराष्ट्र दिन साजरा झाला. १ मे १९६० साली स्थापन झालेल्या महाराष्ट्राची जैविक संपदा वाखाणण्याजोगीच आहे. आज आसमंतातल्या गप्पांमध्ये महाराष्ट्राची चिन्हं अर्थात स्टेट सिम्बॉल्स बघताना नक्की जाणवेल की महाराष्ट्र नसíगक संपदेने किती समृद्ध आहे.

वसंतात बेभानपणे फुलणाऱ्या ठळक झाडांमध्ये निसर्ग बहुतांश लाल पिवळा रंग भरभरून उधळत असताना कुठेतरी हळूच नाजूक गुलाबी, जांभळा रंग दिसायला सुरुवात होते. ‘प्राइड ऑफ इंडिया’, क्वीन ऑफ फ्लॉवर अशी विविध इंग्रजी नावं मिरवणारां हा सुंदर जांभळा मोहोर आपल्या राज्याचं फुलं म्हणून ओळखला जातो. मराठीत जारूळ, तामण म्हणून ओळखलं जाणारं हे झाड महाराष्ट्राचं राज्य फूल, अर्थात स्टेट फ्लॉवर म्हणून सन्मानित झालंय. सरत्या चत्रातला पळसाचा सरता पुष्पोत्सव भर उन्हाळ्यात तामणाला जणू खो देतो नि हे मध्यम आकाराचं हिरवं डेरेदार झाड जांभळट गुलाबी फुलांनी बहरून जातं. शंभर टक्के भारतीय असलेलं झाड महाराष्ट्रात बहुतेक सर्व भागांत आढळतं. ‘ल्यॅगरस्ट्रोमिया रेगिनी’ असं वनस्पतीशास्त्रीय नाव धारण केलेलं, मेंदीच्या लिथ्रेसी कुटुंबातलं हे झाड. त्याचं नाव एका स्विडिश निसर्ग अभ्यासकाच्या नावाचं स्मरण देतं. प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ लिनियस जेव्हा झाडांचं वर्गीकरण करत होता तेव्हा त्याच्या म्यॅग्नस वान लॅगरस्ट्रोमन या स्विडिश निसर्ग अभ्यासक मित्राने, या झाडाचे नमुने नेऊन दिले म्हणून आपल्या मित्राच्या सन्मानार्थ त्याने या झाडाच्या प्रजातीचं नाव मित्राच्या नावावरून ठेवलं. या झाडाच्या नावाची उकल खुप सुंदर आहे. ‘फ्लॉस रेगिनी’ म्हणजे राणीचे फूल! साधारण पन्नास फुटांची उंची गाठणारं हे देखणं झाड लांबुळक्या पानांनी समृद्ध असतं. वरून हिरवीगार नि खालच्या बाजूने फिक्कट हिरवी पानं आणि गुलाबी जांभळी फुलं हे या झाडाचं वैशिष्टय़ म्हणता येऊ शकतं. या झाडाची साल साधारण पिवळट भुरकट रंगाची आणि गुळगुळीत असते. या सालीचे अगदी नियमित पेरूच्या झाडासारखे पापुद्रे गळून पडतात. वसंतात नाजूक कोवळी पानफूट सुरू होतानाच फुलांनाही बहर यायला सुरुवात होते. निष्पर्ण फांद्यांच्या टोकाला साधारण तीस सेंमी लांब फुलाचे घोस यायला सुरुवात होते. या जांभळट गुलाबी फुलांचं वैशिष्टय़ म्हणजे ही खालून वर उमलत जातात. ही पूर्ण उमललेली पाच-सहा सेंमी फुलं जणू गुलाबी झालरींचा गुच्छच वाटतो. साधारण सहा-सात झालरींच्या गुलाबी जांभळ्या पाकळ्या व त्यात उजळ पिवळ्या रंगाचे नाजूक पुंकेसर हे तामणीचं वैशिष्टय़ म्हणता येऊ शकतं. उन्हाळ्याच्या शेवटी या झाडाची फळं अर्थात बोंड धरायला सुरुवात होते. साधारण तीन सेंमी आकाराची होणारी ही फळं टोकाकडे टोकदार आणि वर कडक आवरण असलेली ठळकपणे दिसून येतात. ही बोंड सुकून साधारण काळसर तपकिरी होतात. यात सुकलेल्या अगदी पातळ चपटय़ा असतात. यांना म्हातारीच्या बियांसारखे कापूस पंख असतात जे या बीजांना दूरवर वाऱ्यावर वाहून घेऊन जातात.

तामण झाडाचं लालूस चमकदार छटेचं लाकूड उत्तम आणि मजबूत सदरात मोडतं. अनेक मोठय़ा बांधकामांसाठी यांचा वापर केला जातो. या झाडाचे अनेकविध उपयोग आहेत. याच्या सालींचा उपयोग आयुर्वेदात ताप उतरवण्यासाठी केला जातोच, पण याची पानंदेखील उपयोगी समजली जातात. पानात असलेल्या कोरोसॉलिक आम्लामुळे त्यांचा वापर पूर्वेकडच्या अशियाई देशांमध्ये चहामध्ये केला जातो. फिलिपाइन्स या देशात तर चक्क याचा उल्लेख सरकारी झाड असं केला जातो. आपल्याकडे या झाडाचा उपयोग हल्ली सुशोभीकरणाचा वृक्ष म्हणूनच केला जातो. हे झाड अगदी सहज कुठेही रुजतं आणि फुलतं. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात हे झाड फुलतं. विविध भागांतल्या हवा, पाणी व जमिनीच्या फरकांमुळे याच्या फुलांच्या रंगछटांमध्ये वैविध्य जाणवतं. कणखर, राकट दगडांचा देश असलेल्या महाराष्ट्राचं राज्यीय फुलं इतकं सुंदर, इतकं देखणं असणं याहून दुसरी रसिक गोष्ट काय असू शकते?

जारुळासारख्याच शेकडो स्थनिक झाडाझाडोऱ्याने भरलेल्या जंगलात नांदणारा महाराष्ट्राचा राज्यीय प्राणी म्हणजे शेकरू! खार म्हटली की पिटुकली, गोंडस झुपकेदार शेपूट उडवत तुरुतुरु पळणारा प्राणी आपल्या नजरेसमोर येतो. पण शेकरू मात्र खारीच्या या वर्णनाच्या अगदी उलट आहे असं म्हणता येईल. शेपटीसकट साधारण तीन ते साडेतीन फूट लांबीची ही खार महाराष्ट्राचा राज्य  प्राणी आहे. पश्चिम घाटांची रांग, सदाबहार किंवा ओल्या पानझडी अरण्यात, पूर्व हिमालयाच्या तळटेकडय़ा, तसेच मध्य भारताच्या काही भागांतच ही खार दिसून येते. ज्या अरण्यांमध्ये मुबलक फळझाडे असतात अशा ठिकाणी हिचं वास्तव्य असतं. ‘इंडियन जायंट स्क्विरल’ म्हणून ओळखलं जाणारं शेकरू अगदी उंचच उंच झाडांच्या शेंडय़ांवर राहणं पसंत करतं. शक्यतो झाडावरून जमिनीवर येण्याचं हे टाळतं. या टाळाटाळीसाठी एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे उडय़ा मारत जाण्याच्या यांच्या सवयीने लोक शेकरालाच ‘उडती खार’ समजतात. पण उडत्या खारींप्रमाणे यांच्या पायाला पडदे नसतात. शेकराच्या या उडय़ा अगदी पंधरा-वीस फूट लांब असतात. शेकरू उडी मारतं आणि आपण समजतो की शेकरू उडतंय. या लांबलांब उडय़ा मारताना शेकराला त्याच्या लांब पायांचा आणि तोल सांभाळायला दीड-दोन फूट लांब झुपकेदार शेपूट उपयोगी ठरते. राखाडी, काळसर रंगाचं शरीर  असलेलं शेकरू तसं पाहायला गेलं तर मस्त गब्दुल असतं. पोटाकडे फिक्कट रंग आणि त्याच रंगाची शेपटी असलेलं, सकाळ-संध्याकाळच्या सुमारास अगदी उत्साहाने उडय़ा मारणारं शेकरू, दुपारी मस्तपकी विश्रांती घेतं. विश्रांती म्हणजे, पोटोबा फांदीवर टेकवायचा आणि हातपाय व शेपूट फांदीवरून खाली सल सोडून चक्क झोपायचं! आहे ना मजेशीर सवय? दुनियेत दुपारी झोपा काढणाऱ्या जिवांची अजिबात कमी नाहीये, उगाचच त्या पुणेकरांना नाव ठेवतात लोक!

शेकरांची गंमत म्हणजे एकच घर बांधून स्वस्थ न बसता जवळपासच्या झाडांवर ते सहा-सात घरटी बांधून ठेवतात. आलटूनपालटून त्यातले एकेक घरटे दुपारच्या आणि रात्री झोपण्यासाठी, पिल्लांना मोठं करण्यासाठी वापरतात. कधी कधी मांजरासारखंच ते आपल्या पिल्लांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हलवतात. ही घरटी आकाराने मोठी असली तरीही उंच अशा झाडावर अगदी बारीक फांद्यांवर बांधलेली असतात म्हणूनच सुरक्षित असतात. फळझाडे असलेल्या जंगलांमध्ये यांचं वास्तव्य असतं. रानआंबे, जांभळं आणि तसलीच इतर रानफळं हे शेकराचं मुख्य खाणं आहे. आपल्याला जरासुद्धा धोका आहे असं वाटल्यास ती चटकन गर्द पानांमागे लपून बसतात किंवा लांब उडय़ा मारत निघून जातात. पुण्याजवळचे भिमाशंकर अभयारण्य या शेकरांसाठी प्रसिद्ध आहे.

शेकरासारखंच, गर्द झाडांमध्ये अगदी मुरून राहणारं हरियल ऊर्फ यलो फूटेड ग्रीन पिजन राज्यपक्षी म्हणून ओळखलं जातं. बोलीभाषेत हिरवं कबुतर असा सर्रास उल्लेखला जाणारा हा कोलंबिडी कुटुंब सदस्य गर्द हिरवाईत नांदणारा. कायम थव्यांमध्ये राहणारा हरियल उंबरांच्या झाडांवर बसून उंबरांवर ताव मारताना दिसून येतो. ही हरियल मंडळी रामाच्या पारी उन्हं वाढायच्या आधी गर्द जंगलातल्या झाडांच्या शेंडय़ांवर बसून उन्हं शेकतात. सोनेरी पिवळ्या उन्हात शेकत बसलेली, पिवळट रंगातल्या हिरवट झाकेची, पिवळ्या पायाची हरियल फार सावध असतात. शक्यतो जोडीने राहणारे हे पक्षी त्यांच्या टपोऱ्या लाल डोळ्यांमुळे लक्षवेधी दिसतात. गर्द रानव्यात, सहज चकवा देणारे हे पक्षी शोधून पाहणं म्हणजे निव्वळ अहाहा! ही शेकरं असो किंवा हरियल, यांना फलाहार प्रिय असल्याचं दिसून येतं. अंजन कांचन करवंदांच्या देशा असं वर्णन झालेल्या महाराष्ट्राचं राज्य झाड एक फळझाडच आहे. म्यॅग्निफेरा इंडिका, अर्थात आंब्याचं झाड! याच्याबद्दल काय बोलावं? मागे आपण या राजाबद्दल गप्पा मारून झाल्या आहेतच.

गेल्या वर्षी महाराष्ट्राने देशात एकाबाबतीत अव्वल नंबर पटकावला. राज्यीय पक्षी, प्राणी, फुलं आणि झाडापाठो पाठ महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मरमॉन फुलपाखराची अधिकृत घोषणा केली गेली. महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य झालं ज्याचं स्वतचं राज्य फुलपाखरू आहे.

भारतात जवळजवळ दीड हजार जातींची फुलपाखरं आढळतात. महाराष्ट्राबद्दलच बोलायचं झालं तर जवळजवळ २२५ प्रकारची फुलपाखरं आढळतात. भारतात आढळणाऱ्या फुलपाखरांपकी १५ टक्के फुलपाखरं महाराष्ट्रात आढळतात. देशात आढळणारं सदर्न बर्डिवग या सर्वात मोठय़ा फुलपाखरानंतर दुसऱ्या क्रमांकाचं मोठं फुलपाखरू म्हणून ओळखलं जाणारं ब्लू मरमॉन हे फुलपाखरू ‘स्वालोटेल’ प्रकारात गणलं जातं. फुलपाखरांबद्दल जास्त महिती नसणाऱ्या व्यक्तीला ‘स्वालोटेल म्हणजे काय?’ असा प्रश्न सहज पडू शकतो. ‘स्वालोटेल’ प्रकारात गणल्या जाणाऱ्या फुलपाखरांच्या पाठीमागच्या पंखांना शेपटीसारखा अवयव असतो म्हणूनच यांचं ‘स्वालोटेल’ असं नामकरण झालंय. बहुतांश पॅपिलिऑस फुलपाखरं या गटात मोडतात.

ब्लू मरमॉन फुलपाखराचं शास्त्रीय नाव आहे पॅपिलिओ पॉलिमेस्टोर. साधारण सव्वाशे ते दीडशे मिमी पंखविस्तार असलेलं हे फुलपाखरू भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये तर आढळतंच शिवाय पश्चिम घाटाच्या जंगलांमध्ये आढळतं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसणारं हे फुलपाखरू त्याच्या पाठीवर असणाऱ्या फिक्कट चमकदार निळ्या रंगामुळे चटकन नजरेत भरतं. ब्लू मरमॉन फुलपाखरात नर व मादी सहज वेगवेगळे ओळखू येतात. नर फुलपाखराच्या वरच्या दोन पंखांवरचा गर्द वेल्वेटी रंग ठळक असतो. याच्या वरच्या पंखांचा आकारही मादीपेक्षा वेगळा दिसून येतो. यांच्या वरच्या पंखांवर दोन लाल ठिपकेही दिसून येतात. (क्वचितच असे ठिपके नसतातही.) या ब्लू मरमॉनचे मागचे दोन पंख जरासे लहान असतात. याच पंखांवरचा फिक्कट रंग याच्याकडे लगेच नजर आकर्षून घेतो. अर्थात प्रदेशानुसार याच्या रंगांच्या छटांमध्ये थोडाबहुत फरक पडतो.

ब्लू मरमॉन फुलपाखरू अतिशय चपळ व एका जागी शांत न बसणारं म्हणून ओळखलं जातं. याचं उडणं इतकं अतक्र्य पद्धतीचं असतं की याचे फोटो काढणं म्हणजे जणू कसोटीच. ब्लू मरमॉन फुलपाखरांना उन्हात उडायला आवडतं. गर्द जंगलं, मानवनिर्मित उद्यानं अशा ठिकाणी यांचा नियमित वावर दिसून येतो. वर्षभर सहज दिसणारी ब्लू मरमॉन फुलपाखरं पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसतात. यांना लिंबूवर्गातील झाडं अंडी घालण्यासाठी आवडतात असं निरीक्षणातून समोर आलं आहे. ब्लू मरमॉनचं अंड गोलसर असतं. सुरुवातीस याचा रंग हिरवट असतो व हळूहळू तो पिवळसर केशरी होत जातो. मादी साधारण सुटं एकेकच अंडं पानाच्या वर चिकटवते. या अंडय़ाच्या वर अगदी सूक्ष्म छिद्र असतं ज्यातून आत विकसित होणाऱ्या सुरवंटाला हवा मिळत राहते. या अंडय़ांमध्ये अन्नरस भरलेला असतो. ही अंडी पारदर्शक असतात आणि आतल्या सुरवंटाची वाढ सुरू झाली की त्यांचा रंग बदलून ती फिक्कट होत जातात. पूर्ण वाढ झालेल्या अंडय़ातून बाहेर येणारं सुरवंट सतत खादाडपणे पानं फस्त करत राहतात. या सुरवंटांना ना ऐकायला येत असतं ना दिसत असतं. पण झाडावर निर्माण होणारी सगळी कंपन त्यांना जाणवत असतात. ब्लू मरमॉनची सुरवंटं पहिली तर जणू लहान पक्ष्याची विष्ठा पानावर पडलीय अशीच दिसतात. कालांतराने हा पूर्ण वाढ झालेला सुरवंट खाणं थांबवुन स्वतला कोशात घालून घेऊन कुठे सुरक्षित जागी चिकटवून घेतो. साधारण १५ दिवसांत या कोशातून पूर्ण वाढीचे फुलपाखरू बाहेर येतं. हे बाहेर आलेले फुलपाखरू फक्त द्रवरूप आहार घेतं. म्हणजे फुलांमधला मधुरस, अति पक्व फळांमधला रस, वनस्पतींचा रस, प्राण्यांचे मलमूत्र, चिखलपाणी अशा ठिकाणी ही फुलपाखरं बसुन आपल्या सोंडेने दव पित असताना दिसतात.  ब्लू मरमॉनचा आपल्याला होणारा उपयोग म्हणजे वेलचीच्या फलनात यांच्याकडून मदत होते.

शेकरू, हरियल किंवा फुलपाखरं ही समृद्ध वनस्पती संपत्तीचं प्रतीक समजलं जातात. यांच आणि यांच्याशी जीवसाखळीत जोडलेल्या इतर सर्व जिवांचं संरक्षण आणि त्यांच्या अधिवासाचं संवर्धन होणं जरूरी आहे. अमूल्य पश्चिम घाटाचा हिस्सा असलेल्या समृद्ध महाराष्ट्राचा आसमंत जपणं आपल्याच हातात आहे. ही प्रतीकं त्या प्रदेशातल्या संपन्न जीवसाखळीची ‘जिवंत इंडिकेटर्स’ असतात. यांच्यासाठी ही वनसंपदा जपणं म्हणजे स्वतच्या घराची जपणूक करण्यासारखंच आहे. ‘थिंक ग्लोबली, अ‍ॅॅक्ट लोकली’ म्हणताना माझ्या आसमंतासाठी ही जपणूक मी करत असेन तरच माझ्या ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याला अर्थ आहे.

(छायाचित्र सौजन्य : शर्वरी प्रभू सावंत, मकरंद केतकर, अनिरुद्ध देशिंगकर)
रूपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2016 1:04 am

Web Title: nature
टॅग : Nature
Next Stories
1 सोनमोहोर आणि बहावा
2 निंबोणीच्या झाडामागे…
3 ताजीतवानी चाहूल
Just Now!
X