17th July Ashadhi Ekadashi Rashi Bhavishya: १७ जुलै २०२४ ला वारकरी सांप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. मंगळवारी रात्रीच सुरु झालेली आषाढी एकादशी उदयातिथीनुसार आज साजरी होईल. रात्री ९ वाजून २ मिनिटांपर्यंत एकादशी तिथी कायम असणार आहे. आजचा संपूर्ण दिवस पार करून १८ जुलैच्या पहाटेपर्यंत अनुराधा नक्षत्र जागृत असणार आहे. सूर्य कर्क राशीत तर चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करत आहेत. दुपारी १२ वाजून २७ मिनिटांपासून ते २ वाजून १० मिनिटांपर्यंतच्या अवधीत राहू काळ असणार आहे मात्र एकूण ग्रहमान पाहता उर्वरित तिथी ही शुभ आहे. आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनी कोणत्या राशीच्या व्यक्तींचं पारडं जड होणार हे पाहूया..

१७ जुलै पंचांग, आषाढी एकादशी विशेष राशी भविष्य

मेष:-महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याची नाहक चिंता कराल. मित्र परिवाराची उणीव जाणवेल. मनावर कसलाही ताण घेऊ नका. स्व‍च्छंदी विचार करावेत.

वृषभ:-नवनवीन गोष्टी वाचनात येतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. जोडीदाराविषयी मनात संभ्रम निर्माण होईल. अपचनाचे विकार जाणवू शकतात. विवेकाने परिस्थिती हाताळावी.

मिथुन:-पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. योग अथवा व्यायाम करण्यात आळस करू नका. नवीन विचार प्रेरणा देणारा असेल. प्रेमातील व्यक्तीसाठी उत्तम दिवस. आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल.

कर्क:-घरात कटू शब्द वापरू नका. शक्यतो घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. काही कामे लांबणीवर टाकली जाऊ शकतात. दिवस मध्यम फलदायी राहील. नसते साहस करायला जाऊ नका.

सिंह:-परिवारातील सदस्यांच्या गरजा समजून घ्या. संमिश्र घटना जाणवतील. नोकरदार वर्गाला कामाचा ताण जाणवेल. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. ध्यानधारणा करावी.

कन्या:-तरुणांनी बेफिकिरीने वागू नये. सामाजिक बांधीलकी जपावी. काही वेळेस सबुरीने वागणे फायद्याचे ठरेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. लाभाच्या संधीकडे लक्ष ठेवावे.

तूळ:-कौटुंबिक वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराकडून अपेक्षा राहतील. इतरांवर विसंबून राहू नका. कामाविषयी एक विशिष्ट धोरण ठरवा. भावंडांशी वादाचे प्रसंग टाळा.

वृश्चिक:-मनात एक अनामिक भीती राहील. परंतु फार काळजी करण्याचे कारण नाही. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाराने वागाल. एकांत हवाहवासा वाटेल.

धनू:-महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावाल. विरोधक नरमाईने घेतील. मनातील काळजी दूर सारावी लागेल. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत: प्रयत्नशील राहावे. मुलांच्या वागण्याची चिंता वाटेल.

मकर:-विचारतील कर्मठपणा बाजूला सारावा लागेल. घरात उगाचच चिडचिड करू नका. कोणाचीही नाराजी पत्करू नका. तुमच्या कामाची पावती मिळण्यास थोडा काळ लागेल. चिकाटी सोडून चालणार नाही.

कुंभ:-कामात स्थिरता ठेवावी. अधिक उत्साहाने कामे हाताळाल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. समोरील कामे प्राधान्याने करावीत. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

हे ही वाचा<< August Lucky Zodiac : ऑगस्ट महिन्यात ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार! मंगळ गोचरमुळे मिळेल छप्परफाड पैसा

मीन:-खाण्या-पिण्याच्या सवयी बाबत आग्रही राहाल. आवडते छंद जोपासावेत. नकारात्मक विचार टाळावेत. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. वरिष्ठांचे कामात सहकार्य मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर