Name astrology A to Z:  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नावाचे खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर हे त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व सांगत असते. व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्या व्यक्तीचे गुण, स्वभाव आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगते, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्या चारित्र्याच्या अनेक गुणांचे वर्णन करते. कोणत्याही व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्याच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड करू शकते. एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपण त्याचे भविष्य, त्याचा स्वभाव आणि करिअर यासंबंधी अनेक गोष्टी जाणून घेऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला A पासून Z पर्यंतच्या अक्षरापासून नाव सुरू होत असलेल्या नावाचे लोक कसे असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, याविषयी सांगणार आहोत. 

नावाच्या पहिल्याच अक्षरात दडलाय तुमचा स्वभाव

A – ज्योतिषशास्त्रानुसार, A अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक खूप आत्मविश्वासू व धैर्यवान असतात आणि ते कोणावरही अवलंबून राहत नाहीत. असे म्हणतात की, या लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. ते नेहमी आनंदी असतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

B- ज्योतिषशास्त्रानुसार, B अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती अतिशय संवेदनशील स्वभावाच्या असतात. त्या कोणातही सहजगत्या मिसळत नाहीत. थोडे लाजाळू स्वभावाचे असतात.

C- ज्या लोकांचे नाव C अक्षराने सुरू होते ते लोक स्वभावाने खूप भावूक असतात. हे लोक सामाजिक कार्यात रस घेतात आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो, ते मनमिळाऊ स्वभावाचे असतात, ज्यामुळे ते सहजपणे कुठेही मित्र बनवतात. या लोकांना अतिशय पद्धतशीरपणे जगणे आवडते.

D- D या अक्षरापासून सुरू असलेल्या नावाचे लोक अतिशय मेहनती आणि उदार मनाचे असतात. हे लोक अनेक गोष्टी मनात ठेवतात. त्यांना समजून घेणे खूप अवघड असते.

E- अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती फटकळ स्वभावाच्या असतात; पण त्यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतात. त्यांचे मन चंचल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत ते फार यशस्वी होत नाहीत. 

F- अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक आपल्या कामाप्रति नेहमी प्रमाणिक असतात. गर्दीतही ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. ते श्रीमंत होण्यासाठी कठोर मेहनत करतात आणि यशस्वीही होतात.

G- अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक स्वभावाने साधे, सौम्य, आकर्षक आणि हुशार असतात. प्रेमाच्या बाबतीत या अक्षराचे लोक प्रामाणिक आणि शुद्ध विचाराचे असतात. हे लोक भावनिक असल्याने काही वेळा त्यांना नुकसानही सहन करावे लागते. 

H- अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक खूप संकोची आणि संवेदनशील असतात. या व्यक्ती स्वत:च्या गोष्टी कोणाला सांगत नाहीत. दुख:ही सांगत नाहीत. या व्यक्ती रहस्यमयी असतात.

I- ज्या लोकांचे नाव इंग्रजीतील I अक्षराने सुरू होते, ते संवेदनशील स्वभावाचे असतात. छोट्या छोट्या गोष्टींमुळे ते भावूक होतात. ते आपले प्रत्येक काम मनापासून करतात आणि दृढ हेतूने पूर्ण करतात. 

J- नावाच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक असते, ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात. या नावाचे लोक खूप कोमल स्वभावाचे असतात. पैशाच्या बाबतीत ते लकी असतात.

K- अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती स्वभावाने आळशी आणि हट्टी असल्याचे मानले जाते. हे लोक त्यांचे जीवन त्यांच्या अटींवर जगतात; परंतु ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात. त्यांचा स्वभाव थोडा लाजाळू असतो.

L- अक्षरापासून ज्यांचे नाव सुरू होते अशा व्यक्ती सरळ स्वभावाच्या असतात. या व्यक्तींना जास्त राग येत नाही. या व्यक्तींचा स्वभाव गोड असतो. अशा व्यक्ती सगळ्यांशी मिळून-मिसळून वागतात. 

M- या लोकांचा स्वभाव थोडा जिद्दी, हट्टी असतो. अशा स्वभावामुळे ते कधी कधी अडचणीत येत असतात.

N- अक्षरापासून नाव असणारे लोक बिनधास्त असतात. बोलायला ते खूप मोकळे असतात. ते खूप जिद्दी आणि कष्टाळू असतात.

O- अक्षरापासून नाव असणारे लोक खुल्या विचारांचे असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाची काळजी घेतात आणि त्यांना सर्वांना सोबत घेऊन जायला आवडते.

P- अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती आध्यात्मिक असतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. कोणत्याही गोष्टीत ते सहजासहजी हार मानत नाहीत.

Q- अक्षरापासून नाव असणारे लोक स्वभावाने खरे आणि प्रामाणिक असतात. ते कधीही हिमतीच्या बाबतीत हरत नाहीत. गरज पडेल तेव्हा ते असेही काम करतात, ज्या कामाची त्यांच्याकडून अपेक्षा नसते.

R- ज्या लोकांचे नाव या अक्षराने सुरू होते त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप प्रभावी असते. ते नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. ते काही बाबतीत खूप भावनिक असतात, त्यांना खूप लवकर रागही येतो.

S- अक्षरापासून ज्यांचे नाव सुरू होते, त्या लोकांच्या मेहनती वृत्तीमुळे ते कोणत्याही क्षेत्रात मेहनतीसाठी तयार असतात. ते आपल्या करिअरसाठी खूप कष्ट घेतात आणि त्यामुळेच त्यांना यश मिळते. 

T- अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती उत्साही, तसेच आनंदी स्वभावाच्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांना लक्झरी लाईफ जगायला खूप आवडते आणि त्यांना महागड्या गोष्टींचे खूप आकर्षण असते.

U- अक्षरापासून नाव असणारे लोक खूप हुशार असतात. ते कधीच मागे वळून पाहत नाहीत. ते नेहमी स्वतःच्या आनंदापूर्वी इतरांच्या आनंदाची काळजी घेतात. नातेसंबंध ते योग्य प्रकारे जपतात.

V- अक्षरापासून नाव असणारे लोक प्रेमळ आणि प्रामाणिक असतात. ते त्यांच्या आयुष्यात कुटुंबाला आणि त्यांच्या कामाला खूप जास्त महत्त्व देतात.

W- हे लोक दिसायला अतिशय आकर्षक व सुंदर असतात. या व्यक्ती बोलण्यात हुशार व चाणाक्ष असतात. त्या समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतात. पैशाच्या बाबतीत यश मिळवतात.

X- या अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक प्रेमळ स्वभावाचे असतात. त्यामुळे ते आपल्या लाइफ पार्टनरला नेहमी आनंदी ठेवतात. आनंदी राहणे, आपले जीवन आनंदाने जगणे हा या लोकांचा स्वभाव असतो. 

Y- अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोकांचा स्वभाव सरळ असतो. तसेच त्यांना शांत राहायला आवडते. कठीण प्रसंगांचाही हे मोठ्या धैर्याने सामना करतात.

Z- या अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक इतरांमध्ये फार लवकर मिसळतात. त्यांना जीवनाचा आनंद घ्यायला खूप आवडते. आपल्या जोडीदाराला ते भरभरून प्रेम देतात. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)