Places To Avoid Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे नाव घेतलं तरी आजही लोकांच्या मनात आदर जागतो. ते केवळ एक तत्त्वज्ञानी किंवा राजकारणी नव्हते, तर आयुष्य कसं जगायचं, यशाकडे कसं जायचं आणि अपयश कसं टाळायचं हे शिकवणारे अद्वितीय मार्गदर्शक होते. त्यांच्या नीतीसूत्रांमध्ये जीवनाचे अनेक गूढ अर्थ दडलेले आहेत. ती नीतीसूत्रे आजही तितकीच परिणामकारक आहेत, जितकी ती हजारो वर्षांपूर्वी होती.
चाणक्यांनी त्यांच्या नीतीमध्ये सांगितलं आहे की, माणसानं काही ठिकाणांपासून दूर राहावं. कारण- अशा जागा नशिबात अडथळे, दुःख व अपमान घेऊन येतात. त्या ठिकाणी गेल्यावर माणूस कितीही बुद्धिमान, श्रीमंत किंवा चांगला असला तरी त्याच्या जीवनात अडचणी वाढतात. चला पाहू या चाणक्य नीतिनुसार ती ५ ठिकाणं कोणती, जिथे गेलात तर सुखाऐवजी संकटं मिळतील…
१. जिथे मान-सन्मान नाही
माणसाचं सर्वांत मोठं धन म्हणजे त्याचा स्वाभिमान. चाणक्य सांगतात, “जिथे तुमच्या अस्तित्वाची किंमत नाही, तिथे राहणं म्हणजे आत्म्याचा अपमान आहे.” जर एखाद्या ठिकाणी लोक तुम्हाला अपमानित करत असतील, तुमचं मत नाकारत असतील किंवा तुम्हाला कमी लेखत असतील, तर तिथे राहणं व्यर्थ आहे. अशा ठिकाणांहून दूर जाणं म्हणजे स्वतःचा सन्मान वाचवणं.
२. जिथे रोजगाराच्या संधी नाहीत
चाणक्यांच्या मते, “उपजीविकेशिवाय माणूस निष्प्रभ होतो.” कितीही सुंदर शहर असो; पण जर तिथे कामाच्या संधी नाहीत, तर तिथलं सौंदर्य उपयुक्त नाही. पैशाशिवाय जगणं म्हणजे आयुष्यभराचा संघर्ष. म्हणूनच ते सांगतात की, रोजगार नसलेल्या ठिकाणी राहणं म्हणजे अंधारात जगणं.
३. जिथे आपले लोक नाहीत
आयुष्यात कितीही यशस्वी झालो, तरी भावनिक आधाराची गरज नेहमीच असते. चाणक्य सांगतात “जिथे मित्र, नातेवाईक किंवा आधार देणारे लोक नाहीत, तिथे माणूस एकाकी पडतो.” कठीण प्रसंगात मदतीचा हात नसल्यास जीवन त्रासदायक बनतं. त्यामुळे जिथे आपलेच लोक नसतील, तिथे थांबणं म्हणजे स्वतःचं नुकसान.
४. जिथे शिक्षणाचं वातावरण नाही
ज्ञानाशिवाय प्रगती अशक्य आहे. चाणक्य म्हणतात “अज्ञान म्हणजे अंधार.” जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल, जिथे शिक्षणाला किंमत नाही, जिथे लोक ज्ञानापासून दूर आहेत, तर तिथे तुमची वाढ थांबते. त्यामुळे अशा ठिकाणांपासून दूर राहणं म्हणजे स्वतःला उजेडाच्या मार्गावर नेणं.
५. जिथे वाईट लोकांची संगत आहे
वाईट संगत म्हणजे आयुष्याचं पतन. चाणक्य म्हणतात “वाईट लोकांच्या सहवासात चांगला मनुष्यही हळूहळू नष्ट होतो.” जर तुमच्या आजूबाजूला खोटारडे, लोभी, मत्सरी किंवा फसवणूक करणारे लोक असतील, तर तिथे राहणं म्हणजे तुमचा स्वभाव आणि भाग्य खराब करणं.
चाणक्यांचा इशारा आजही तितकाच खरा आहे!
आजच्या आधुनिक जगातसुद्धा आर्य चाणक्यांचे हे नियम लागू पडतात. मान-सन्मान, रोजगार, शिक्षण, चांगली संगत व आपले लोक हीच खरी संपत्ती आहे. जर या गोष्टींचा अभाव असेल, तर सुखाचं भासणारं जीवनही रिकामं आणि दुःखद वाटू लागतं.
म्हणून लक्षात ठेवा- चाणक्य सांगतात तसं, योग्य ठिकाण निवडणं म्हणजे अर्धं यश मिळवणं. चुकीच्या जागेवर राहणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला संकटात टाकणं!
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)
