Aries To Pisces Monthly Horoscope In Marathi : नवीन महिना सुरु झाला की, आपण नवनवीन संकल्प बनवण्यास सुरुवात करतो. मग हा संकल्प करिअर, कौटुंबिक जीवन, आर्थिक असो किंवा सामाजिक गोष्टीबद्दल सुद्धा असू शकतो. पण, यादरम्यान आपल्याला अनेक गोष्टींबाबत सतर्क राहावे लागते. तर अनेक जण सतर्क राहण्यासाठी ज्योतिषशास्त्राची मदत घेतात. तर आता मे महिन्याचे उरलेले १५ दिवस तुमच्या राशीसाठी कसे जाणार? तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क रहावे लागणार? कोणत्या राशींसाठी मे महिना खास असणार आहे? याविषयी ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांचे मार्गदर्शन जाणून घेऊया…
मे २०२५ चे मासिक राशिभविष्य (May 2025 Monthly Horoscope)
मेष राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य (Aries May Horoscope 2025)
१४ मे रोजी गुरू ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. हा राशिबदल तुमच्यासाठी हितकारक ठरेल. जवळचे, लांबचे प्रवास योग येतील. महिन्याच्या अखेरीस २९ मे रोजी राहू कुंभ. तर केतू सिंह राशीत प्रवेश करील. बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. परदेशासंबंधित कामांचा वेग वाढेल. परदेशी शिक्षणासाठी मार्ग मोकळा होईल. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास कराल. विवाह जुळेल. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांची साथ द्यावी म्हणजे नाते अधिक दृढ होईल. गुंतवणूकदारांना विशेष लाभ होतील. पण, गुंतवणुकीतील तुमची पकड घट्ट असायला हवी. उष्णतेमुळे डोळ्यांचे त्रास होतील.
वृषभ राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य (Taurus May 2025 Horoscope)
कोणत्याही कामाची आधीपासून केलेली तयारी वेळेवर उपयोगी पडते याचा अनुभव या महिन्यात घ्याल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मेहनत आणि सातत्य यांची सांगड घातल्याने विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी खूप फायदा होईल. परदेशातील शिक्षणासंबंधित परीक्षा यशस्वीरीत्या पार पडतील. १४ मे रोजी गुरू द्वितीय स्थानातील मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. आपल्यासाठी गुरूचा हा राशिबदल हितावहच असेल. नोकरी-व्यवसायात नवे करार कराल. २९ मे रोजी राहू व केतू वक्र गतीने दशमातील कुंभ आणि चतुर्थातील सिंह राशीत प्रवेश करतील. विवाह योग सुरू आहेत. घरच्या जबाबदाऱ्या वाढतील. खांदे आणि मणका यांची विशेष काळजी घ्यावी.
मिथुन राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य (Gemini May Horoscope 2025)
काम केल्याचे समाधान देणारा हा महिना असेल. मुख्य म्हणजे १४ मे रोजी गुरू व्यय स्थानातील वृषभ राशीतून आपल्या मिथुन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे गुरुबल सुधारेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना गुरूची साथ मिळेल. विद्यार्थिवर्गाच्या महत्त्वाच्या परीक्षा उत्तमरीत्या पार पडतील. नोकरी-व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेचा आणि विचारांचा प्रभाव पाडाल. जिद्द अन् हिमतीने आगेकूच कराल. सहकारी वर्गाला योग्य मार्गदर्शन दिल्याने कामाला गती येईल. विवाहोत्सुकांना जोडीदार संशोधनाचा लाभ होईल. २९ मे रोजी राहू कुंभ राशीत व केतू सिंह राशीत वक्र गतीने प्रवेश करतील. परदेशातील किंवा त्या संबंधित कामात यश मिळेल. उष्णतेमुळे घसा सुजणे, वा लाल होणे, असा त्रास होण्याची संभावना आहे.
कर्क राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य (Cancer May Horoscope 2025)
संमिश्र अनुभव देणारा आणि आपल्याच माणसांची नव्याने ओळख करून देणारा, असा हा महिना असेल. विद्यार्थिवर्गाने अभ्यासासह कलागुणांना आणि छंदाला वाव द्यावा. परदेशातील शिक्षणासंबंधित बाबींना चालना मिळेल. बुद्ध पौर्णिमेला एखाद्या सत्कर्मामुळे मनाला शांती मिळेल. १४ मे रोजी गुरू व्यय स्थानातील स्थानातील मिथुन राशीत प्रवेश केला आहे. गुरुबल कमजोर होईल. २९ मे रोजी राहू अष्टमात कुंभ राशीत आणि केतू द्वितीयात सिंह राशीत प्रवेश करेल. नोकरी-व्यवसायातील प्रश्न अनुत्तरित राहतील. विवाहित दाम्पत्यांमध्ये गैरसमज झाल्यास मोकळेपणाने चर्चा करून, तो दूर करावा. घराचे व्यवहार लांबणीवर पडतील. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी. त्वचाविकार उदभवतील. श्वसनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको.
सिंह राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य ( Leo May Horoscope 2025)
गुरू आणि राहू-केतू यांचे राशिबदल या महिन्यात होणार असल्याने हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरेल. १४ मे रोजी गुरूने लाभ स्थानातील मिथुन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे गुरुबल उत्तम होईल. कामांना गती येईल. २९ मे रोजी राहू सप्तमातील कुंभ राशीत व केतू आपल्या सिंह राशीत वक्र गतीने प्रवेश करतील. स्वभावात काहीसा अलिप्तपणा येईल. विद्यार्थिवर्गाला स्पर्धात्मक परीक्षेत राहू यश देईल. तोडीस तोड सामना करण्याचे धाडस मिळेल. नोकरी-व्यवसायात आपला मुद्दा ठामपणे मांडाल. सभेमध्ये श्रोत्यांवर प्रभाव पाडाल. विवाहोत्सुकांचे विवाह योग येतील. संतती प्राप्तीसाठीच्या प्रयत्नांना ग्रहमान साह्य करेल. वाहनसौख्य चांगले मिळेल. गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घ्यावी. अभ्यासपूर्वक गुंतवणूक लाभकारक ठरेल. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल.
कन्या राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य (Virgo May Horoscope 2025)
या महिन्यात गुरूचा राशिबदल खूप महत्त्वाचा आहे. १४ मे रोजी गुरू दशम स्थानातील मिथुन राशीत प्रवेश केला आहे. गुरुबल थोडे कमी होईल. विद्यार्थी आपल्या नव्या प्रकल्पावर मनापासून मेहनत घेतील. नोकरी-व्यवसायात स्वतःची छाप उमटवाल. आपल्या प्रभावी भाषणाचा परिणाम दिसून येईल. विवाहोत्सुकांनी जोडीदार संशोधनाचे प्रयत्न सुरू ठेवावेत. विवाहित दाम्पत्यांनी आपल्यातील गैरसमज दूर करावेत. वाहनखरेदी व वाहनसुख चांगले मिळेल. घराचे काम पूर्ण होईल. गुंतवणूकदारांना अपेक्षित लाभ मिळाला नाही तरी मोठे नुकसान होणार नाही. राहू कुंभेत व केतू सिंहेत वक्र गतीने प्रवेश करणार आहे.
तूळ राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य (Libra May Horoscope 2025)
आवडते छंद आणि समाजसेवा यांमध्ये आनंद शोधणारा असा हा महिना असेल. विद्यार्थिवर्ग उच्च शिक्षणाची जोरदार तयारी करील. परदेशातील परीक्षा, स्पर्धात्मक परीक्षा यात बुडून जाल. १४ मे रोजी गुरूने भाग्य स्थानातील मिथुन राशीत प्रवेश केला आहे. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. नोकरी-व्यवसायात कार्यकारिणीमध्ये काही हितकर बदल होतील. विवाहोत्सुकांचे योग सुरू झाले आहेत. जोडीदार संशोधन जोमाने सुरू करा. विवाहितांना एकमेकांची चांगली साथ लाभेल. संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न आकार घेतील. कायदेशीर बाबींना वेग येईल. रखडलेल्या गोष्टी मार्गी लागतील. २९ मे रोजी वक्र गतीने राहू षष्ठातील मीनेत, तर केतू लाभातील सिंहेत प्रवेश करेल. त्यामुळे धैर्य वाढेल आणि अपेक्षा कमी होतील.
वृश्चिक राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य ( Scorpio May 2025 Rashi Bhavishya)
खडतर मार्गावरून पुढे जाणे आणि विरोधकांचा सामना करणे हे करायला भाग पाडणारा असा हा महिना असेल. विद्यार्थिवर्गाला एकाग्रता साधणे कठीण जाईल. १४ मे रोजी गुरू अष्टमातील मिथुन राशीत प्रवेश केला आहे. गुरुबल अतिशय कमजोर होईल. नोकरी-व्यवसायात स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप परिश्रम घ्याल. घराचे काम धीम्या गतीने पुढे सरकेल. २९ मे रोजी वक्र गतीने राहू चतुर्थातील कुंभ राशीत व केतू दशमातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा, तर विवाहित मंडळींनी वाद टाळावा. गैरसमज दूर करण्यासाठी विश्वासू मध्यस्थी कामी येईल. उष्माघात आणि स्थायू खेचला जाणे, असे त्रास उद्भवतील. या महिन्यात वैद्यकीय सल्ला व उपचार आवश्यक असणार आहेत.
धनु राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य (Sagittarius May 2025 Rashi Bhavishya)
मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवाल. त्यामुळेच आपल्याला प्रगतिपथावर पुढे जाता येईल. विद्यार्थिवर्गाकडून परदेशातील शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले जातील. उच्च शिक्षणातील संधीचे सोने कराल. १४ मे रोजी गुरू सप्तमातील मिथुन राशीत प्रवेश केला आहे. अतिशय चांगले गुरुबल आपणास प्राप्त होईल. विवाहोत्सुकांचे विवाहयोग बलवान होतील. मनाजोगता जोडीदार मिळण्यास ग्रहांची साथ लाभेल. विवाहितांचे प्रश्न सुटतील. घराचे काम धीम्या गतीने मार्गी लागेल. गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक केल्याने त्याचा उत्तम परतावा त्यांना मिळेल. २९ मे रोजी वक्र गतीने राहू तृतीय स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू भाग्य स्थानातील सिंह राशीत प्रवेश करेल.
मकर राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य ( Capricorn May 2025 Rashi Bhavishya)
लोकांच्या समूहात राहूनही एकांत अनुभवाल. हा एकटेपणा नसून आनंददायी एकांत असेल. घेतलेल्या कष्टाचे समाधान वाटेल. विद्यार्थी उच्च शिक्षणाबाबत अधिक जागरूक असतील. त्याबाबतच्या हालचाली जलद गतीने होतील. १४ मे रोजी गुरूने षष्ठातील मिथुन राशीत प्रवेश केला आहे. गुरुबल थोडे कमी होईल; पण साह्यकारकच असेल. विवाहितांना जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. कौटुंबिक समारंभात हिरिरीने सहभागी व्हाल. २९ मे रोजी वक्र गतीने राहू द्वितीयात कुंभ राशीत प्रवेश करील, तर केतू अष्टमातील सिंह राशीत प्रवेश करील. धनसंपत्तीचा जपून विनियोग करावा. गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. अनावधानाने झालेली चूकदेखील महागात पडेल. खांदे, छाती व डोके यांचे आरोग्य सांभाळावे.
कुंभ राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य (Aquarius May 2025 Rashi Bhavishya)
वेळेचे भान ठेवल्याने आणि कामांचे नियोजन केल्याने या महिन्यात भरपूर लाभ होईल. विद्यार्थिवर्गाला शैक्षणिक यश प्राप्त करण्यासाठी मोठी झेप घ्यावी लागेल. १४ मे रोजी गुरू पंचमातील मिथुन राशीत प्रवेश केला आहे. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. विवाहोत्सुकांचे विवाहयोग सुरू होतील. प्रयत्न सुरू करावेत. विवाहित मंडळींना एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येईल. संतती प्राप्तीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रयत्न यशस्वी होतील. घर, जागा, वडिलोपार्जित इस्टेट यांचे रखडलेले काम हळूहळू मार्गी लागेल. गुंतवणूकदार बाजारभावाचा बारकाईने अभ्यास करतील. भविष्याचा विचार करूनच गुंतवणूक करतील. २९मे रोजी वक्र गतीने राहू आपल्या कुंभ राशीत व केतू सप्तमातील सिंह राशीत प्रवेश करील. उन्हाळी सर्दीचा त्रास सहन करावा लागेल.
मीन राशीचे मे महिन्याचे राशिभविष्य (Pisces2025 Rashi Bhavishya)
वेगवेगळ्या प्रकारची कामे, जबाबदाऱ्या यांमुळे डोके भंडावून जाईल. कामाची वर्गवारी आणि वेळेचे नियोजन केल्यास गोष्टी सुलभ होतील. विद्यार्थी उच्च शिक्षणासंबंधित प्रवेश परीक्षांची तयारी करतील. १४ मे रोजी गुरूने चतुर्थ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे गुरुबल कमजोर होईल. लहान-मोठ्या गोष्टींसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरी-व्यवसायात नव्या संधी दिसत असूनही त्या स्वीकारता येणार नाहीत. २९ मे रोजी राहू व केतू वक्र गतीने अनुक्रमे व्यय स्थानातील कुंभ राशीत व षष्ठ स्थानातील सिंह राशीत प्रवेश करतील. आवक-जावक यांचा मेळ घालताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांचा सहवास सुखकर वाटेल. गुंतवणूकदारांनी भलते धाडस दाखवू नये. उष्णता व हवेतील प्रदूषणामुळे घसा खवखवणे, घसा लाल होणे अशा तक्रारी सतावतील.
तर १२ राशींचा असा मे महिना असणार आहे…