Shankha Blowing Benefits: हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला जितके महत्वपूर्ण मानले जाते तितकेच प्रत्येक पूजेत घंटा, शंख, डमरु यांसारख्या वाद्यांचीदेखील पूजा आवर्जून केली जाते. आपल्याकडे पूर्वीपासून अनेक घरांमधील मंदिरात शंखाची पूजा करतात. तसेच कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी शंखनाद केला जातो. पण, प्रत्येक पूजेत शंखनादाला इतके महत्व का आहे? हे तुम्हाला ठाऊक आहे का?
काही पौराणिक कथांनुसार, समुद्र मंथनावेळी निघालेल्या 14 रत्नांमध्ये शंखाचादेखील समावेश आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक पूजेत मानाचे स्थान प्राप्त होत आहे. शिवाय काही ग्रथांनुसार अनेक देवी-देवता आपल्या हातात शंख धारण करतात. शंखाची उत्पती समुद्रातून झाल्यामुळे देवी लक्ष्मी आणि श्री विष्णूंनादेखील शंख आणि शंखनाद अतिशय प्रिय असल्याचे वर्णन पौराणिक कथांमध्ये केलेले आहे. इतकंच नव्हे तर केवळ हिंदू धर्मातच नाही तर जैन, बौद्ध या धर्मांमध्येदेखील शंखाला शुभ मानले जाते.
शंखनाद करण्याचे धार्मिक फायदे
पुरातन काळापासून प्रत्येक पूजेत शंखनाद करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवाताली शंखनाद केल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात, ज्यामुळे सुरू केलेले शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत होते.
शंखाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते असे मानले जाते. शिवाय दररोज शंखनाद करणाऱ्या व्यक्तीच्या मनात सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होते.
कथेनुसार, ज्यावेळी समुद्र मंथनातून शंख समुद्रातून बाहेर आला, त्यावेळी देवी लक्ष्मींचीदेखील उत्पत्ती झाली. त्यामुळे शंखाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. मान्यतेनुसार, ज्या घरामध्ये शंख असतो तिथे सदैव देवी लक्ष्मी निरंतर वास करते.
असे मानले जाते की ज्या घरात दररोज शंखनाद केला जातो, तिथे देवी लक्ष्मीचा सदैव वास असतो; शिवाय त्या ठिकाणचा वास्तुदोषदेखील दूर होण्यास मदत होते.
शंखनाद करण्याचे वैज्ञानिक फायदे
हेही वाचा: चांदीचे दागिने वापरण्याचे जबरदस्त फायदे ठाऊक आहेत का? जाणून घ्या शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण
शंख नादावर केलेल्या अनेक संशोधनातून असा निष्कर्ष निघाला आहे की, शंख नादातून निघणाऱ्या लहरी जीवाणू नष्ट करण्यासाठी एक उत्कृष्ट औषध आहेत.
शंख दररोज वाजवल्याने आणि ऐकल्याने आरोग्यासंबंधित अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे हृदयरोग, दमा, खोकला यांसारखे अनेक आजारदेखील दूर होण्यास मदत होऊ शकते.
शंख वाजवल्याने आपले फुप्फुस मजबूत होण्यास मदत होते. तसेच श्वसनासंबंधित समस्यादेखील यामुळे दूर होऊ शकतात.
शंख वाजवल्याने चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग दूर होण्यास मदत होते.
शंख वाजवल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच यामुळे मानसिक ताण, रक्तदाब, मधुमेह, पचनाशी संबंधित आजार कमी होऊ शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)