अनेकांच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात, ज्यांच्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र, त्याच व्यक्ती अनेकदा मागून तुमचा विश्वासघात करतात. तुमच्याबद्दल अनेक वाईट गोष्टी लोकांमध्ये पसरवतात. तुमचे यश पाहून त्यांना खूप त्रास होत असतो. त्यामुळे चेहऱ्यावर जरी ते खूप आनंदी दाखवत असले तरी तुमच्या मागून ते तुमचे वाईट चिंततात. याच संदर्भात महान राजकारणी, मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध विद्वान आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. मौर्य साम्राज्याचे समकालीन आचार्य चाणक्य हे नीतीशास्त्र लिहिण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांची धोरणे आजही प्रासंगिक आहेत. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात आयुष्यात तीन व्यक्तींवर कधीच विश्वास ठेऊ नका असा सल्ला दिला आहे. त्यामुळे तुम्हालाही आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनायचे असेल, तर तुम्ही चुकूनही खालील तीन व्यक्तींवर विश्वास ठेवू नका; कारण या लोकांवर विश्वास ठेवणे म्हणजे एकप्रकारे स्वत:ची फसवणूक करून घेण्यासारखे आहे. या तीन व्यक्ती कोणत्या जाणून घेऊ…

‘या’ तीन लोकांवर कधीच विश्वास ठेऊ नका

१) खोटारडा मित्र

आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणाशीही मैत्री करताना ती नेहमी विचारपूर्वक केली पाहिजे. संकट काळात उपयोगी पडत नसलेल्या तसेच तुम्हाला मदतीची गरज असताना कारणं देणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहिले पाहिजे. याशिवाय खोटे बोलणाऱ्या आणि दु:खात साथ न देणाऱ्या मित्रांवरही चुकूनही विश्वास ठेवू नका, कारण आयुष्यात असेच मित्र तुमची फसवणूक करतात, तुमचा विश्वासघात करतात.

२) कपटी नोकर किंवा कर्मचारी

आचार्य चाणक्यच्या मते, कपटी नोकर किंवा कर्मचाऱ्याला कधीही मालकाचे भले व्हावे असे वाटत नसते. असे लोक खूप विश्वासघातकी असतात. ते नेहमी स्वतःच्या भल्याचाच विचार करतात. यामुळे अनेकदा मालकाला अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे तुमच्या घरातही किंवा कामावरही असा लबाडी करणारा किंवा फसवणूक करणारा नोकर किंवा कर्मचारी असेल तर काळजी घ्या. अशा लोकांवर विश्वास ठेवणे चांगले नाही.

हेही वाचा – Chanakya Niti : लग्नासाठी मुलगी बघताय? मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३) दुष्ट पत्नी

आचार्य चाणक्य यांच्या मते, आज्ञा पाळणाऱ्या मुलीशी विवाह केल्यास मृत्यूनंतरही स्वर्गासारखे सुख प्राप्त होऊ शकते. पण, दुसरीकडे आज्ञाधारक आणि सुसंस्कृत पत्नी मिळाली नाही तर माणसाला जिवंतपणीच नरक यातना सहन कराव्या लागतात. अशी स्त्री कधीही आपल्या पतीच्या किंवा कुटुंबाच्या कल्याणाचा विचार करत नाही. चुकूनही दुष्ट पत्नीवर विश्वास ठेवू नये. दुष्ट पत्नीवर विश्वास ठेवण्याची चूक केली तर त्याचा फटका तुम्हाला नक्कीच सहन करावा लागू शकतो. म्हणून खोटे मित्र, कपटी नोकर आणि दुष्ट पत्नी यांपासून दूर राहा.