Deep Amavasya Importance: भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दिवे लावण्याशिवाय होत नाही. खरं तर, दिव्यांना अग्निदेवतेचे प्रतीक मानले जाते. आपण करीत असलेली पूजा, जप-तप यांचे ते साक्षीदार असतात. त्यामुळेच शुभ कार्याच्या सुरुवातीला दीप प्रज्वलित करून कामाला सुरुवात केली जाते. आषाढ महिन्याच्या दीप अमावास्येचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या अमावास्येला दर्श अमावास्यादेखील म्हटले जाते. आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस असून, या दिवसानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करून, आपल्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी आणि कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते. तसेच या दिवशी घरातील मुलांनाही ओवाळले जाते. यंदा आषाढ अमावास्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत हा शुभ योग आहे. त्यामुळे हा दिवस अधिकच खास असणार आहे.
आषाढ अमावास्या तिथी २०२५
२३ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री २ वाजून २८ मिनिटांपासून
२४ जुलै २०२५ रोजी रात्री १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत असेल.
गुरुपुष्यामृत योग
हिंदू धर्मात गुरुपुष्यामृत योगाला खूप शुभ मानले जाते. खरं तर, ज्यावेळी पुष्य नक्षत्र गुरुवारी येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग निर्माण होतो. त्या दिवशी दागिने, वस्तू, वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी केलेल्या नव्या कामाची सुरुवातही खूप लाभदायी मानली जाते.
या योगाची सुरुवात २४ जुलै रोजी ४ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होणार असून, तो दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असेल. या शुभ मुहूर्तावर तुम्ही मुलांना ओवाळू शकता.
दीप अमावास्येचे महत्व
पुराणानुसार, प्रत्येक अमावास्येचे वेगवेगळे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावास्येला दीप पूजन करण्याचे महत्त्व सांगितले जाते. अनेक लोक या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवतात आणि त्यांच्या नावाने दानसुद्धा करतात. या दीप पूजनात घरातील दिव्यांबरोबरच कणकेचे दिवे बनवण्याचे महत्त्व सांगितले जाते. या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते.
दीप अमावास्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात. काही ठिकाणी महिला आषाढ अमावास्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणाही घालतात. या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचे रोप लावले जाते. तसेच गंगास्नान आणि देणगी देण्यालाही फार महत्त्व असते. या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात.
कशी करावी पूजा?
या दिवशी सकाळीच घरातील, दिवे, समई, निरांजने दिवे घासून-पुसून स्वच्छ केले जातात. दिवे चकचकीत करून, पाटावर मांडून, त्यांची पूजा केली जाते. पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून, सर्व दिव्यांमध्ये तेलवात लावून, ती प्रज्वलित करून ही दीप पूजा केली जाते. काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते. अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून, त्यांचा नैवेद्यही दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते.
दीप अमावास्येला मुलांना का ओवाळले जाते?
या दिवशी अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचे मानले जाते म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून, घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो, तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते.