Silver Jewellery Benefits: भारतीय संस्कृतीत पूर्वीपासूनच सोन्यासोबत चांदीचे दागिनेदेखील मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पूर्वी स्त्रिया पायात नेहमी पैंजण, जोडवी घालायच्या तसेच तरुण मुलीदेखील चांदीचे विविध दागिने वापरायच्या. परंतु, हल्लीच्या बदलत्या फॅशनमुळे सण-समारंभ सोडल्यास कोणीही आवर्जून हे दागिने वापरत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, चांदीचे दागिने वापरण्याचे वैज्ञानिक फायदे आहेतच, पण यासोबत याचे अनेक शास्त्रीय फायदेदेखील आहेत.

हिंदू धर्मात सोन्याइतकंच चांदीच्या दागिन्यांनादेखील खूप शुभ मानले जाते. शिवाय चांदी साक्षात देवी लक्ष्मीलादेखील खूप प्रिय आहे, ज्यामुळे चांदीचे दागिने वापरल्याने देवी लक्ष्मीचादेखील आशीर्वाद प्राप्त होतो, असे म्हटले जाते.

चांदीचे दागिने वापरण्याचे शास्त्रीय फायदे

ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की, प्रत्येक धातूवर कुठल्यातरी विशिष्ट ग्रहाचे प्रभुत्व असते; त्यानुसार चांदीवर चंद्र आणि शुक्र या दोन ग्रहांचे प्रभुत्व असते. त्यामुळे चांदीच्या नियमित वापराने कुंडलीतील चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत होतो.

ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होतो, तेव्हा त्याच्या प्रभावाने व्यक्तीच्या आयुष्यातील मानसिक तणाव, अशांती, नकारात्मकता, वाईट विचार दूर होण्यास मदत होते. तसेच जेव्हा कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, पैसा येण्यास सुरुवात होते असे मानले जाते.

चांदीचे दागिने घालण्याचे वैज्ञानिक फायदे

भारतीय संस्कृतीत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय कारणासोबतच वैज्ञानिक कारणदेखील नक्कीच असते. शास्त्रीय कारणांसोबत चांदीचे दागिने घालण्याचे वैज्ञानिक कारणदेखील खूप महत्त्वाचे आहे.

उष्णतेचा त्रास कमी होतो

चांदी थंड असते, त्यामुळे चांदीचे दागिने घातल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. ज्या व्यक्तींना उष्णतेचा खूप त्रास होतो, त्यांच्यासाठी चांदी खूप फायदेशीर ठरू शकते, शिवाय यामुळे आपले संपूर्ण आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होऊ शकते.

त्वचा चमकदार होते

चांदीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यादेखील कमी होतात. तसेच चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मदेखील असतात, जे त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करू शकतात.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून आपल्याला दूर ठेऊ शकतात.

हेही वाचा: Chanakya Niti : जीवनात गाठायची असेल उंची तर चाणक्य यांनी सांगितलेली ‘ही’ गोष्ट नेहमी लक्षात ठेवा

राग नियंत्रणात राहतो

चांदीचे दागिने वापरल्याने व्यक्तीचे मन शांत राहते; ज्यामुळे तणाव, चिंता आणि रागही नियंत्रणात राहतो. तसेच यामुळे झोपही चांगली लागू शकते.

चांदीचे दागिने केवळ महिलांसाठीच नाही, तर पुरुषांसाठीदेखील तितकेच फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं, यात तुम्ही चांदीची चैन, अंगठी, ब्रेसलेट, कडा यांचा वापर करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)