यंदा ५ ऑक्टोबरला दसरा हा सण साजरा केला जाणार आहे. हा सण, वाईट गोष्टींवर नेहमी चांगल्याचाच विजय याची शिकवण देतो. या दिवशी रामाने रावणाचा पराभव केला होता. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. तसेच, या दिवशी रावणासह कुंभकरण आणि मेघनाद यांच्याही पुतळ्याचे दहन केले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार रावण हा अतिशय विद्वान, पराक्रमी आणि मायावी मनुष्य होता. त्याच्याकडे असलेल्या सोन्याच्या लंकेवर त्याला खूप गर्व होता. मात्र, रावणाकडे ही सोन्याची लंका कशी आली आणि कोणाच्या श्रापामुळे ही लंका जाणून राख झाली, तुम्हाला महित आहे का? आज आपण याविषयी अतिशय रंजक कथा जाणून घेणार आहोत.
लंकेची निर्मिती कशी झाली?
हिंदू पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान शंकर माता पार्वतीसह वैकुंठाला निघाले. येथील निसर्गसौंदर्य पाहून पार्वती मंत्रमुग्ध झाली आणि तिने शंकराकडे अशाच एका ठिकाणी सुंदर महाल बनवण्याचा हट्ट केला. यानंतर शंकराने कुबेर आणि विश्वकर्मा यांना सांगून सोन्याचा महाल बनवून घेतला. सोन्याचा हा महाल पार्वतीला खूपच प्रिय होता.
Dussehra 2022: दसऱ्याला रावणाचं दहन रात्रीच का केलं जातं माहित आहे का? जाणून घ्या पौराणिक मान्यता
एकदा रावण या आलिशान महालाच्याजवळून जात असताना त्याचे लक्ष या महालाकडे गेले आणि त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने एका गरीब ब्राम्हणाचे रूप घेऊन शंकराकडे मदत मागितली. भगवान शंकराने रावणाला ओळखले होते. मात्र, त्यांना रावणाला आपल्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवायचे नव्हते. अशाप्रकारे रावणाला हा सोन्याचा महाल मिळाला.
लंका जाळून राख होण्यामागे कोणाचा श्राप होता कारणीभूत?
ही गोष्ट माता पार्वतीला कळताच ती खूपच नाराज झाली. तिला माहित होते की शंकर रावणाकडून हा महाल परत घेणार नाहीत. म्हणूनच तिने रागाच्याभरात, सोन्याची ही लंका जाळून राख होईल असा शाप दिला होता. लंकेला श्राप मिळाला होता आणि म्हणूनच यानंतर भगवान हनुमानाने आपल्या शेपटीच्या साहाय्याने या लंकेला आग लावली.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)