Dussehra 2025 Gold Buying Shubh Muhurat : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी अश्विन महिन्याच्या दशमी तिथीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, त्यामुळे अनेकजण या शुभदिनी नवीन वस्तू खरेदी करतात, तसेच नव्या कामाची सुरुवातदेखील करतात. शिवाय या दिवशी सोनं खरेदी करणंदेखील खूप शुभ मानले जाते.

दसऱ्याची तिथी

ज्योतिष दिनदर्शिकेनुसार, दशमी तिथी १ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:२० वाजता सुरू होत आहे आणि २ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:१० वाजता संपेल. अशाप्रकारे, दसरा उत्सव गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.

राहू काळ: दुपारी १ वाजून ३० मिनिटांपासून दुपारी ३ वाजेपर्यंत असेल.

दसऱ्याला नवीन वस्तू खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त

२ ऑक्टोबर रोजी सोने किंवा कोणत्याची वस्तूची खरेदी करण्यासाठी सकाळी ०६ वाजून ३० मिनिटांपासून सकाळी ८ वाजेपर्यंत पहिला शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत दुसरा शुभ मुहूर्त आहे. तसेच संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत तिसरा शुभ मुहूर्त आहे.

दसऱ्याला सोने का खरेदी करावे?

दसऱ्याला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असं म्हणतात, या दिवशी सोने खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जाते. तसेच संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात धन, संपत्ती, सुख-समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार दसऱ्यालाला अनेक शुभ योग निर्माण होतात. या दिवशी ग्रह शुभ स्थितीत असतात, त्यामुळे या दिवशी सोने खरेदी आवर्जून करावे. शिवाय दसऱ्याच्या आधी महानवमीलादेखील तुम्ही सोनं खरेदी करू शकता. परंतु, आता सोन्याचे वाढते दर बघता प्रत्येकजण सोनं खरेदी करू शकत नाही. अशावेळी तुम्ही स्वस्तात मस्त अशा दुसऱ्या गोष्टीही खरेदी करू शकता.