Gupt Navratri 2025: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते, ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडीचा सण आहे. अश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या नवरात्रीत आदिशक्तीच्या आराधनेसह गरबा, दांडियादेखील खेळला जातो. परंतु, अश्विन नवरात्रीव्यतिरिक्त एका वर्षात आणखी तीन नवरात्री साजऱ्या केल्या जातात. म्हणजे वर्षात एकूण चार नवरात्री असतात. त्यातील दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात तर इतर दोन नवरात्री गुप्त असतात. चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्री मानले जाते. या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक उत्साहाने साजऱ्या करतात. तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री मानले जाते. या दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्त्व दिले जाते.

गुरुवार, ३० जानेवारीपासून माघ महिन्याची सुरुवात झाली असून गुप्त नवरात्रीचीदेखील सुरुवात झाली आहे. ही नवरात्र ३० जानेवारीपासून ते ७ फेब्रुवारीपर्यंत असेल.

या नवरात्रीमध्ये तांत्रिक आणि साधक त्यांच्या विशेष मंत्रांचा जप करून तंत्र साधनेद्वारे सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. या काळात १० महाविद्यांची पूजा-आराधना केली जाते. तुम्हीदेखील या काळात तुमच्या कुटुंबातील सुख-समृद्धी आणि कल्याणासाठी देवी दुर्गेची पूजा-आराधना करू शकता. याकरिता देवीच्या स्तोत्रांचे, ग्रंथाचे किंवा मंत्राचे पठण करू शकता.

गुप्त नवरात्रीत करा या स्तोत्रांचे पठण

नवरात्रीत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दुर्गा सप्तशती या ग्रंथांचे पठण करणे खूप लाभदायी मानले जाते. परंतु, या ग्रंथाचा पाठ करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही खालील काही प्रभावी स्तोत्रांचे नक्की पठण करू शकता.

दुर्गा चालिसा

या चालिसेच्या पठणाने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच आयुष्यामध्ये स्थिरता निर्माण होते. मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.

दुर्गा कवच

दुर्गा कवचचे पठण केल्याने देवीचा आशीर्वाद सदैव पाठिशी राहतो. आयुष्यात सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते.

देवी सहस्त्रनाम

देवी सहस्त्रनामचे पठण केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात. दीर्घायुष्य प्राप्त होते. तसेच भक्ताला यश-प्रसिद्धी मिळते.

श्री सुक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्री सुक्ताचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. कुटुंबात सुख-समृद्धी आणि शांतता निर्माण होते आणि या सुक्ताचे पठण केल्याने आयुष्यातील द्रारिद्र्य दूर होते.