ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांनी एका राशीमधून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याला फार महत्व असतं. ग्रहांच्या या राशि परिवर्तनाचा सर्वच राशींवर चांगला अथवा वाईट परिणाम होतो. येणाऱ्या महिन्यात अनेक ग्रह वेगवगेळ्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळ, गुरु आणि बुध ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करताना दिसतील. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहाला नवग्रहांचा सेनापती मानलं जातं. तर बुध ग्रह हा बुद्धी, तर्क, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीसंदर्भातील गोष्टींवर परिणाम करणार असतो. तर वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे गुरु हा सर्वात महत्वाच्या ग्रहाकांपैकी एक मानला जातो. हा ग्रह ज्ञान, शिक्षण, मुलंबाळं, बंधू, शिक्षक, धार्मिक कार्य, पवित्र ठिकाणं, पैसा, दान, पुण्य आणि भरभराटीसंदर्भातील गोष्टींशी निगडीत असतो.
ज्योतिष शास्त्रानुसार येणाऱ्या चार महिन्यांहून अधिक काळ हा काही राशींसाठी फार फायद्याचा ठरणार आहे. या राशीच्या लोकांवर गुरु, मंगळ आणि बुध ग्रहाची विशेष कृपा राहील असं सांगितलं जात आहे. गुरु, मंगळ आणि बुध या ग्रहांची स्थिती राशीसाठी सकारात्मक असल्यास भाग्य बदलण्यासाठी मदत होतो असं म्हटलं जातं. या पुढील चार महिन्यांमध्ये कोणत्या राशींच्या लोकांची भरभराट होणार असल्याचं सांगितलं जातंय जाणून घेऊयात…
मिथुन रास : या राशीच्या लोकांना पुढील चार महिने चांगलं यश मिळेल. अनेक अडकलेली काम पुन्हा सुरु करण्यासाठी हा योग्य काळ आहे. चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेटीगाठी होतील. प्रवास करण्याची संधी या कालावधीमध्ये मिळेल. व्यापारामध्ये चांगला फायदा होईल. या राशीचे लोक जे काम हाती घेतील त्यामध्ये यश येईल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील.
सिंह रास : आर्थिक स्थिती बळकट होईल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा कालावधी आशिर्वादाप्रमाणे असेल. वैवाहिक जीवनामध्ये सुख लाभेल. पद आणि प्रतिष्ठेमध्ये वृद्धी होण्याची चिन्हं दिसत आहेत. नवीन वाहन किंवा घर खरेदीचा उत्तम योग जुळून येत आहे. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ फायद्याचा ठरेल. या कालावधीमध्ये एकंदरीत जीवनमान हे सुखी आणि समाधानी असेल.
तूळ रास : नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. कामाचं क्षेत्र बदलण्याचा योग जुळून येत आहे. व्यापारामध्ये नफा होईल. कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी चालून येईल. नोकरीच्या ठिकाणी या राशीच्या व्यक्तींच्या कामाची दखल घेऊन कौतुक होण्याची शक्यता आहे. पती आणि पत्नीमध्ये योग्य ताळमेळ या कालावधीमध्ये असल्याने कौटुंबिक कलह होणार नाही.
वृश्चिक रास : नोकरी आणि व्यापारासाठी उत्तम काळ आहे. वैवाहिक आयुष्य सुखी आणि समाधानी असेल. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. धार्मिक विधी आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची अधिक संधी मिळेल. स्पर्धात्मक आव्हानं या राशीचे विद्यार्थी सहज पेलू शकतील. वरिष्ठ अधिकारी या राशीच्या लोकांच्या कामाने समाधानी असतील.