Sarva Pitru Amavasya 2025: हिंदू धर्मामध्ये सर्वपित्री अमावस्येला खूप महत्वपूर्ण मानले जाते. अनंत चतुर्दशनंतर पितृपक्षाची सुरूवात होते. असे मानले जाते की, या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण, असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो.
पंचांगानुसार, पितृ पक्ष ७ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू झाला असून, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपणार आहे. २१ सप्टेंबर रोजी पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावस्या असेल. तसेच याच दिवशी सूर्यग्रहणदेखील असणार आहे.
सर्वपित्री अमावस्येची तिथी
हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असेही म्हटले जाते. सर्वपित्री अमावस्येची तिथी २१ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून १७ मिनिटांनी सुरू होईल. तर २२ सप्टेंबर २०१५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून २३ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार , २१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केले जाईल.
सर्वपित्री अमावस्येचा शुभ मुहूर्त
- कुतुप मुहूर्त: सकाळी ११ वाजून ५० मिनिट ते दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत
- रौहिण मुहूर्त: दुपारी १२ वाजून ३८ मिनिट ते दुपारी १ वाजून २७ मिनिटांपर्यंत
- अपराह्य काळ: दुपारी १ वाजून २७ मिनिट ते दुपारी ३ वाजू ५३ मिनिटांपर्यंत असेल. या शुभ मुहूर्तांवर पितरांचे श्राद्ध, तर्पण करणे शुभ मानले जाते.
सर्वपित्री अमावस्येला लागणार सूर्यग्रहण
सर्वपित्री अमावस्येला या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहणदेखील असणार आहे. या दिवशी रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी हे सूर्यग्रहण ग्रहण सुरू होणार असून ते रात्री ३ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होणार. या ग्रहणाचा कालावधी ४ तास २४ मिनिटांचा असणार. हे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी असल्यामुळे ते भारतात दिसणार नाही. तसेच ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे या ग्रहणादरम्यान सुतक कालावधी वैध राहणार नाही आणि सुतक कालावधीचे नियमदेखील पाळणे बंधनकारक असणार नाही. तसेच शास्त्रानुसार, या सूर्य ग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे या दिवशी श्राद्ध, पिंडदान अशा कोणत्याच कार्याचा दोष लागणार नाही.
या देशात दिसणार सूर्यग्रहण
दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसून येणार नाही पण ते दक्षिण न्यूझीलंड, अंटार्कटिका, ऑकलाँड न्यूझीलंड, दक्षिण प्रशांत, ऑस्ट्रेलिया (होबार्ट) या ठिकाणी आंशिक सूर्य ग्रहण दिसून येईल.
२०२६ मध्ये पहिले सूर्यग्रहण कधी लागणार?
या ग्रहणानंतर २०२६ मध्ये पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी लागेल. हे एक वलयाकार सूर्यग्रहण असेल. हे केवळ दोन मिनिट २० सेकंद पाहाता येईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)