Shani Jayanti 2025 Date Shubh Muhurat Puja Vidhi: शनिदेवाला न्याय आणि कर्माची देवता मानले जाते. ज्याच्यावर शनिदेवाचा आशीर्वाद असतो, त्याचे जीवन आनंद आणि समृद्धीने भरलेले असते. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ प्रदान करते. ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला शनिदेवाची जयंती असते. हिंदू पंचागानुसार, शनी जयंतीला विशेष असे महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील अमावास्या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला होता, असे पौराणिक ग्रंथात सांगितले आहे. त्यामुळे हा दिवस शनी जयंती म्हणून ओळखला जातो. वैदिक पंचांगानुसार, यंदा ही शनी जयंती आज मंगळवारी २७ मे २०२५ रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता. विशेष म्हणजे यावेळी शनी जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. धार्मिक मान्येतनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच शुभ परिणामही मिळतात.
शनी जयंती महत्त्व आणि शनी जयंती पूजेचा शुभ मुहूर्त (Shani Jayanti 2025 Shubh Muhurat)
शनी देव हे सूर्यपुत्र आहेत. न्याय आणि शिस्तप्रिय देवता अशी ओळख असणारे शनिदेव यांची जर एखाद्या व्यक्तीला कृपा लाभली, तर ती व्यक्ती आयुष्यात सर्व प्रकारची सुखे उपभोगते, असे मानले जाते. शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी शनी जयंती हा सर्वांत शुभ दिवस मानला जातो. शनी जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाची तुमच्यावर कृपा कायम राहते, असे मानले जाते. शनी जयंतीची अमावास्या तिथी २६ मे म्हणजेच काल दुपारी १२:११ वाजता सुरू झाली आहे आणि ही तिथी २७ मे म्हणजेच आज सकाळी ८:३१ वाजेपर्यंत वैध आहे. ही तिथी शनी जयंती म्हणून ओळखली जाते. या कारणास्तव शनी जयंती आज मंगळवारी (२७ मे) साजरी केली जात आहे.
वैदिक दिनदर्शिकेनुसार, शनी जयंतीचा ब्राह्म मुहूर्त २७ मे रोजी पहाटे ०४:०३ ते ०४:४४ पर्यंत होता. अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५१ ते दुपारी १२:४६ पर्यंत आणि विजय मुहूर्त दुपारी ०२:३६ ते ०३:३१ पर्यंत असेल. गोधुली मुहूर्त संध्याकाळी ०७:११ ते ०७:३१ पर्यंत असेल.
शनी जयंती २०२५ शुभ संयोग (Shani Jayanti 2025 Shubh Sanyog)
ज्योतिष गणनेनुसार, आज शनी जयंतीला अनेक शुभ योग आणि संयोग निर्माण होत आहेत, ज्यामुळे ते अधिक फलदायी आणि शुभ होत आहे. खरे तर, सर्वार्थ सिद्धी योगाव्यतिरिक्त आज शनी जयंतीला सुकर्मा आणि धृती योग तयार होत आहेत. हा अतिशय शुभ योग मानला जातो. या दिवशी सुकर्मा योग सकाळी १०:५४ वाजेपर्यंत असतो. ज्येष्ठ अमावास्या तिथीतील द्विपुष्कर योग २८ मे रोजी सकाळी ५:०२ ते ५:२५ वाजेपर्यंत राहील. या योगात केलेल्या कामामुळे शनिदेवाची विशेष कृपा होऊन, दुप्पट फळ मिळते, असे मानले जाते. तसेच, कृतिका नक्षत्र, रोहिणी नक्षत्र यांचा संयोग होणार आहे. सूर्य आणि बुध एकत्रितपणे बुधादित्य योग निर्माण करत आहेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)