What Not To Keep Near Tulsi Plant: हिंदू संस्कृतीत तुळशीला ‘पवित्र माता’, असं म्हटलं जातं. ज्या घरात तुळशी असते, त्या घरात लक्ष्मीचं वास असतो, असं शास्त्र सांगतं. तुळशीचं पूजन म्हणजे घरातील नकारात्मक शक्तींचा नाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार. पण वास्तुशास्त्रानुसार, जरी तुळशी अत्यंत शुभ मानली जात असली तरी तिच्याजवळ काही वस्तू ठेवल्यास अनर्थ होऊ शकतो, अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे २ नोव्हेंबरला तुळशी-शालिग्राम विवाह असल्यानं या काळात तुळशी पूजन करताना काही गोष्टी टाळणं अत्यावश्यक मानलं जातं. कारण- असं मानलं जातं की, तुळशीजवळ चुकीच्या वस्तू ठेवल्यास देवी लक्ष्मी रुष्ट होतात आणि घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया तुळशीजवळ ठेवणे टाळाव्यात अशा ‘चार वस्तू’ कोणत्या…
चुकूनही तुळशीजवळ ‘या’ वस्तू ठेवू नका
१. तुळशी आणि शिवलिंग कधीच एकत्र ठेवू नका
वास्तुशास्त्र सांगतं की, तुळशी आणि शिवलिंगाचं एकत्र पूजन अयोग्य मानलं जातं. कारण- पुराणानुसार, भगवान शिव यांनी तुळशीचे पती शंखचूड यांचा वध केला होता. त्यामुळे तुळशी आणि शिव यांच्यात एक प्रकारचं दैवी वैर असल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच तुळशीच्या कुंडीजवळ किंवा तिच्यासमोर शिवलिंग ठेवणं टाळावं. तसं केल्यास पूजेमध्ये दोष निर्माण होतो, अशी मान्यता आहे. अगदी शंखातून शिवलिंगावर जल चढवणंही निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे ही दोन पूजास्थाने नेहमी वेगवेगळी ठेवावीत.
२. तुळशीजवळ बूट-चप्पल ठेवणं अशुभ
तुळशी ही लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. जिथे तुळशी असते, तिथे पवित्रता आणि समृद्धी नांदते. पण जर आपण तिच्या आसपास बूट वा चप्पल ठेवली, तर ती पवित्रता भंगते, असं शास्त्र सांगतं. अशा वेळी लक्ष्मीदेवी अप्रसन्न होते आणि घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, अशी ज्योतिषीय धारणा आहे. त्यामुळे तुळशीला नेहमी स्वच्छ, निर्मळ आणि उंच ठिकाणी ठेवावं, तिच्या परिसरात पायांचे स्पर्श किंवा अस्वच्छ वस्तू ठेवू नयेत.
३. तुळशीजवळ झाडू ठेवणं टाळा
झाडूचा संबंध स्वच्छतेशी असला तरी वास्तुशास्त्रात तो ‘गृहस्थ जीवनातील गुप्त ऊर्जा’ म्हणून वर्णिला आहे. तुळशीजवळ झाडू ठेवल्यास तिच्या पवित्र ऊर्जेला धक्का पोहोचतो, असं मानलं जातं. त्यामुळे झाडू तुळशीच्या परिसरात ठेवू नये, विशेषत: तुळशी विवाह किंवा कार्तिक मासात तर अजिबात नाही. असं केल्यास घरातील आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता असते, अशी श्रद्धा आहे. तुळशीची जागा नेहमी दिवे, फुले आणि पवित्र वस्तूंनी सजवावी, झाडू किंवा साफसफाईची साधनं तिथून दूर ठेवावीत.
४. काटेरी झाडं तुळशीपासून दूर ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडं ठेवणं अत्यंत अशुभ असतं. कारण- काटे म्हणजे वाद, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा. तुळशीच्या शेजारी काटेरी रोपं ठेवल्यास घरात वादविवाद, तणाव किंवा आर्थिक अडचणी वाढू शकतात, अशी ज्योतिषीय धारणा आहे. गुलाबाचं झाड ठेवायचं असल्यास ते तुळशीपासून थोड्या अंतरावर ठेवावं. कारण- गुलाब जरी सुंदर असला तरी त्याला काटे असतात. तुळशीभोवती शक्य तितकं हरित, शांत आणि फुललेलं वातावरण असावं.
तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही, तर ते श्रद्धेचं प्रतीक आहे. म्हणून तुळशीचं पूजन करताना तिच्या आसपासच्या वस्तूंचा विचार काळजीपूर्वक करावा. वास्तुशास्त्रात सांगितलेले हे संकेत केवळ श्रद्धेवर आधारित आहेत; वैज्ञानिक दावे नाहीत. पण, जर आपण श्रद्धेनं आणि स्वच्छतेनं तुळशीचं पूजन केलं, तर घरातील वातावरण निश्चितच शांत आणि सकारात्मक होतं, अशी श्रद्धा आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
