Offering Apta leaves as “sona”: भारतातील सण, परंपरा या विविध प्रदेशातल्या निसर्गाशी किंवा झाडा-फुलांशी संबंधित असल्याचे दिसून येते. गौरी-गणपती, गुढीपाडवा, नवरात्र तसंच दसऱ्याच्या सणाला अनेक झाडांची पानं, फुलं देवाला अर्पण केली जातात. कारण त्या दिवशी ती अर्पण करण्याला विशेष महत्त्व असते. नवरात्रीनंतर विजयादशमी साजरी केली जाते. विजया म्हणजे विजय आणि दशमी म्हणजे दहावा. दहाव्या दिवशी विजयाचा उत्सव साजरा करणे. रामायणात विजयादशमीचे महत्त्व आहे. राजा रामाने सीतेचे अपहरण केलेल्या राक्षस राजा रावणाचा या दिवशीच वध केला होता. त्यामुळेच भारतात सर्व ठिकाणी रावणाचे दहन केले जाते.
दसऱ्याला शस्त्रपूजा केली जाते, तसंच आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात. पण ही आपट्याची पानं का बरं लुटतात आणि सोनं म्हणून का वाटतात, ही प्रथा नेमकी काय आहे तसंच या पानांना एवढं महत्त्व का आहे ते आपण जाणून घेऊ…
हिंदू धर्मात आपट्याची पानं एकमेकांना देण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात या दिवशी अनेक गावांमधल्या मंदिरात आपट्याच्या फांद्यांचा ढीग लागतो. मग सगळे जण त्यांतून पानं, फांद्या घेतात आणि एकमेकांना हे सोनं म्हणून वाटतात. गेल्या काही वर्षांपासून आपट्याच्या पानाच्या आकाराची सोन्याची पानंही भेट म्हणून दिली जातात.
दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून लुटण्याची प्रथा का आहे?
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं लुटण्याविषयी काही कथा आहेत. रामायणाच्या पंचम सर्गात रघुवंशामध्ये दिलेली एक कथा अशी आहे.
पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राम्हणाला कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषींच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळानंतर कौत्स सर्व शास्त्रांमध्ये पारंगत झाला आणि गुरूला गुरूदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ हवा असल्यास सांगावे म्हणजे तो गुरूदक्षिणा म्हणून देता येईल असे कौत्स म्हणाला. मात्र दक्षिणेसाठी शिष्यांना विद्या देणे हे योग्य नाही आणि शिष्य विद्वान झाला हीच गुरूदक्षिणा असते असे ऋषी म्हणाले. कौत्साला काही हे पटत नव्हते आणि त्याने आग्रह धरला. त्यावेळी ऋषी म्हणाले की, मी शिकवलेल्या प्रत्येक विद्येसाठी एक कोटी अशा चौदा कोटी मुद्रा त्याही एकाच व्यक्तीकडून आणून दे. कौत्साने हे मान्य केले.
ऋषींनी सांगितलेली दक्षिणा कठीण आहे हे लवकरच कौत्साच्या लक्षात आलं. रघुराजा मोठा उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा आहे असे त्याला कळले. कौत्स रघुराजाकडे गेला, मात्र त्यावेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ करून ब्राम्हणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटण्यास दिले होते. परिणामी त्याच्याकडे आता काहीच शिल्लक नव्हते. रघुराजाने कौत्साला त्याच्याकडे येण्याचं कारण विचारलं. त्यावेळी कौत्साने त्याच्या आगमनामागचं कारण सांगून त्याची इच्छा पूर्ण होणार नाही असे रघुराजाला म्हटले. रघुराजाने मात्र कौत्साला चौदा कोटी मुद्रा तुला मी तीन दिवसांत देतो असे आश्वासन दिले. पुढे रघुराजाने कौत्साला त्याच्या घरी ठेवून घेतले. त्यानंतर रघुराजाने थकबाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी केली. ही गोष्ट इंद्राला समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्साला दिल्या. ठरल्याप्रमाणे कौत्साने वरतंतू ऋषींपुढे चौदा कोटी मुद्रांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. ऋषींनी १४ कोटी मुद्रा ठेवून बाकीच्या कौत्साला परत केल्या आणि कौत्साने त्या रघुराजाला आणून दिल्या. मात्र, रघुराजा काही त्याचा स्वीकार करत नव्हता. शेवटी त्याच आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकांना त्या नेण्यास सांगितले. लोकांनी ही संधी साधून नगराच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, यथेच्छ सोनं लुटलं आणि एकमेकांना देऊन आनंदही व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. तेव्हापासून आपट्याच्या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली.
आपट्याचं झाड का महत्त्वाचं आहे?
आपट्याचं पान म्हटलं की डोळ्यासमोर दोन भागांत विभागलेली पानं ह्रदयाच्या आकाराची पानं. हे झाड मध्यम उंचीचं असून ते भारतीय उपखंडात आढळतं. आयुर्वेदातही आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांसाठी वापरला जातो. मुतखड्यासाठी, कफ आणि पित्त दोषांवर आपटा गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.
आपट्याची पानं भेट कशी द्यावीत?
दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नान करून, नवीन कपडे घालून आपट्याची पाने तोडावीत. शहरात हे शक्य होत नसल्याने ती विकत घेतली जातात. ही पाने मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना सोनं म्हणून भेट म्हणून द्यावीत. देताना सोनं घ्या आणि सोन्यासारखे रहा अशा शुभेच्छाही दिल्या जातात.