Vaishakh Purnima 2025: हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी-नारायण यांची पूजा-आराधना केल्यास कुटुंबात सुख-समाधान, शांती, संपत्ती नांदते असे म्हटले जाते. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमादेखील म्हटले जाते. यंदा १२ मे रोजी ही पौर्णिमा साजरी केली जाईल. चला तर मग या पौर्णिमेचा शुभ मुहूर्त, तिथी काय हे आपण जाणून घेऊ..
वैशाख पौर्णिमा तिथी
पंचांगानुसार वैशाख पौर्णिमेची तिथी ११ मे रोजी रात्री ८ वाजून २ मिनिटांनी सुरू होणार असून १२ मे रोजी रात्री १० वाजून २४ मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार १२ मे रोजी पौर्णिमेचे व्रत, पूजा, उपासना केली जाईल.
वैशाख पौर्णिमा शुभ मुहूर्त
वैशाख पौर्णिमेला नदीमध्ये स्नान, गरजू व्यक्तीला दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी स्नानासह दानधर्म करण्याचेही महत्त्व आहे. तसेच या दिवशी अभिजात मुहूर्त ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल. या काळात जप, पूजा-आराधना करणे लाभदायी मानले जाईल. या दिवशी अनेक घरांमध्ये श्री सत्यनारायणांची पूजा, कथेचे वाचनही केले जाते.
वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा का म्हटले जाते?
वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला श्री विष्णूंचा नववा अवतार मानले जाणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. तसेच याच पौर्णिमेला गौतम बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती, त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा नावानेही ओळखले जाते.