05 August 2020

News Flash

दक्षिण आशियाचा मित्र!

कोलंबो येथे १९९३ साली ‘रिजनल सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज्’ स्थापन करण्यात कोहेन यांचा मोठा वाटा होता.

संकल्प गुर्जर sankalp.gurjar@gmail.com

शीतयुद्धाच्या काळात बहुतांश अमेरिकी अभ्यासक सोव्हिएत रशिया व युरोपीय संरक्षण याविषयीच्या अभ्यासात गुंतलेले होते, तेव्हा जाणीवपूर्वक भारत आणि दक्षिण आशियाविषयक अभ्यासाकडे वळलेले स्टीफन कोहेन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अभ्यासकीय कारकीर्दीची ओळख करून देणारे हे टिपण..

कोणत्याही चांगल्या अभ्यासकाकडून समाजाच्या चार अपेक्षा असतात : एक, त्याचा अभ्यासविषय समाजाच्या-देशाच्या दृष्टीने ‘रेलेव्हंट’ असावा. सामाजिकशास्त्रांत काम करणाऱ्या अभ्यासकांकडून याची अपेक्षा जरा अधिक असते. दोन, निवडलेल्या विषयात त्याने सातत्याने काम करावे. त्याच्या लेखनातून-भाषणांतून तो विषय अधिकाधिक वाचकांपर्यंत, व्यापक समूहापर्यंत पोहोचावा. तीन, त्याने विद्यापीठे-संशोधन संस्था यांच्या उभारणीत योगदान द्यावे. नवनवे प्रकल्प हाती घ्यावेत आणि ते पूर्ण करावेत. चौथे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व त्यांना त्यांच्या अभ्यासविषयाचे-लेखनाचे उत्तम ‘ट्रेनिंग’ द्यावे. २७ ऑक्टोबरला निधन झालेले अमेरिकी प्राध्यापक स्टीफन कोहेन यांनी त्यांच्या ८३ वर्षांच्या आयुष्यात या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या होत्या. त्यांनी कदाचित एखाद्या अभ्यासकाकडून अपेक्षित असते त्याहून अधिक काम केले. त्यामुळेच कोहेन यांच्या निधनाची अमेरिका ते पाकिस्तान, भारत ते सिंगापूर अशी सर्वत्र दखल घेतली गेली.

कोहेन १९६४ ते २०१९ अशी ५५ वर्षे कार्यरत होते. जेव्हा कोहेन यांनी १९६०च्या दशकात दक्षिण आशियावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली, तेव्हा बहुतांश अमेरिकी अभ्यासक सोव्हिएत रशिया व युरोपीय संरक्षण याच्या अभ्यासात गुंतलेले होते. ते शीतयुद्धाचे दिवस असल्याने हे साहजिकही होते. मात्र, अशा वेळी जे काही निवडक अमेरिकी अभ्यासक भारत व दक्षिण आशियाकडे लक्ष देत होते, त्यात कोहेन यांचा समावेश करता येईल. त्यामुळेच मायरॉन विनर, स्टॅनली वोल्पर्ट, लॉइड व सुझान रुडॉल्फ, रिचर्ड पार्क अशा निवडक अभ्यासकांच्या रांगेत कोहेन यांचा समावेश होतो.

कोहेन यांनी त्यांच्या आयुष्यात ३४ वर्षे युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय (अर्बाना-श्ॉम्पेन) इथे काम केले. तिथे असतानाच कोहेन यांचा दक्षिण आशियाचे तज्ज्ञ असा नावलौकिक झाला होता. त्यांनी त्या विद्यापीठात असतानाच ‘प्रोग्राम ऑन आम्र्स कन्ट्रोल, डिसआर्मामेंट अ‍ॅण्ड इंटरनॅशनल सिक्युरिटी’साठी फण्डिंग एजन्सीज्कडून निधी उभारला होता आणि हे केंद्र सुरू केले होते. (इथे हे सांगायलाच हवे की, नव्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यात कोहेन माहीर होते.) दक्षिण आशियाच्या संरक्षणासंबंधीच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर या केंद्रामध्ये काम केले जात असे. विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर पुढील २१ वर्षे ते ‘ब्रूकिंग्स इन्स्टिटय़ूशन’ या प्रतिष्ठित थिंकटँकमध्ये कार्यरत होते. या संस्थांमध्ये कार्यरत असताना कोहेन यांनी कान्ती वाजपेयी, अमित गुप्ता, सुनील दासगुप्ता, सुमित गांगुली, स्वर्णा राजगोपालन, शोनाली सरदेसाई, कविता खोरी, दिनशॉ मिस्त्री, ध्रुव जयशंकर, तन्वी मदन, कॉन्स्टन्टिनो झेवियर असे एकापेक्षा एक सरस विद्यार्थी तयार केले. हे सर्व जण आता कोहेन यांची परंपरा पुढे चालवत आहेत. दक्षिण आशियावर काम करणाऱ्या कोणत्याही अभ्यासकाला कोहेन यांच्या या विद्यार्थ्यांचे लेखन लक्षात घ्यावेच लागते.

कोहेन यांचे लिखाण दक्षिण आशियाच्या अभ्यासकांनी आजही का वाचावे? कोहेन यांनी भारतीय लष्करावर जे पुस्तक १९६०च्या दशकात लिहिले होते, ते अजूनही या विषयावरचे ‘क्लासिक’ मानले जाते. या पुस्तकात कोहेन यांनी एकाच वेळी भारताचा लष्करी इतिहास, जात आणि भारतीय लष्कर, स्वातंत्र्योत्तर भारतातील मुलकी-लष्करी संबंध अशा विषयांना स्पर्श केला होता. या विषयावर आजही इतका कमी अभ्यास झाला आहे, की कोहेन यांच्यानंतर या विषयावरचे दुसरे महत्त्वाचे पुस्तक थेट २०१५ मध्ये- म्हणजे तब्बल ५० वर्षांनी लिहिले गेले. समान परंपरा व प्रशिक्षण असूनही स्वातंत्र्यानंतर भारतात लष्कराने कधीच सत्ता हाती का घेतली नाही आणि पाकिस्तानात नेमके याच्या उलट का झाले, या प्रश्नाचा वेध कोहेन यांनी घेतला होता. कोहेन यांच्या मते, भारताने कार्यक्षमता कमी झाली तरी चालेल मात्र लष्करावर राजकीय वर्चस्व टिकून राहायला हवे, या पर्यायाची निवड केली. पाकिस्तानात नेमके उलट झाले.

या पुस्तकाचे महत्त्व हे की, १९६० च्या दशकात अभ्यासकांमध्ये विकसनशील देशांमधील लष्कर व राजकारण यांचा अभ्यास करताना दोन मुख्य मतप्रवाह प्रचलित होते : एक, देशाच्या विकासात लष्कराचा महत्त्वाचा वाटा आहे. दोन, राजकीय यंत्रणांच्या अपयशामुळे लष्कर सत्ता हाती घेते. कोहेन यांच्या पुस्तकाने हे दाखवून दिले की, भारत हा विकसनशील देश असूनही अराजकीय, व्यावसायिक लष्कर उभारण्यात भारताला यश आले आहे. तसेच भारतीय लष्कर राजकारणामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असाही कोहेन यांचा निष्कर्ष होता. तो आतापर्यंत तरी खरा ठरत आलेला आहे. मात्र असे असले तरीही, नागरी नेतृत्व लष्कराचा वापर आपल्या मतलबी उद्दिष्टांसाठी करू शकते, याविषयीसुद्धा कोहेन यांनी धोक्याचा इशारा देऊन ठेवलेला होता. सध्याच्या भारताकडे पाहता तो इशारा किती खरा होता, हे लक्षात येते.

पुढे कोहेन यांनी पाकिस्तानी लष्करावरही पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाच्या कामाच्या निमित्ताने त्यांची तेव्हाचे पाकिस्तानी लष्करशहा जनरल झिया यांच्याशी मैत्री झाली होती. मात्र त्या पुस्तकावर पाकिस्तानातच बंदी आली. जेव्हा लोकसंख्यावाढ, राजकीय अस्थिरता आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे भारताच्या भविष्याविषयी आशावाद दिसत नव्हता, तेव्हा १९७९ साली, त्यांनी भारत एक उगवती सत्ता (इमर्जिग पॉवर) होऊ  शकतो काय, या विषयावर पुस्तक लिहिले होते. १९८० च्या दशकात काश्मीर प्रश्न तीव्र होण्यापूर्वीच त्यांनी अशी सूचना केली होती की, भारत व पाकिस्तान यांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडवायला हवा. मात्र तेव्हा कोहेन यांना दोन्ही बाजूंनी गांभीर्याने घेतले नाही. पुढे १९९० च्या दशकापासून काश्मीर प्रश्न कसा चिघळला व अजूनही तो सुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, हे आपल्यासमोर आहेच. तसेच काश्मीर प्रश्न व एकूणच भारत-पाक संबंध पुढील ३५ वर्षे असेच चिघळत राहतील, असे ‘निराशावादी/ वास्तववादी’ मत व्यक्त करणारे पुस्तक- ‘शूटिंग फॉर अ सेंच्युरी’ त्यांनी २०१३ मध्ये लिहिले होते. तेव्हा त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र, गेल्या सहा वर्षांत जे काही चालले आहे, ते पाहता कोहेन यांच्याशी असहमत होता येत नाही.

कोहेन यांची काही मते भारत व पाकिस्तानात, दोन्हीकडे अमान्य होती. काश्मीर प्रश्नावर भारतानेही खूप चुका केल्या आहेत, हे त्यांचे मत भारतीयांना पटणारे नव्हते. तर पाकिस्तानी लष्कर देश चालवू शकत नाही, हे त्यांचे मत पाकिस्तानमध्ये अप्रिय होते. भारत व पाकिस्तानने १९९८ च्या अणुचाचण्या करण्यापूर्वीच, १९८० च्या दशकातच कोहेन अण्वस्त्र व दक्षिण आशियाचे राजकारण याविषयी विचार करू लागले होते. अण्वस्त्रांमुळे दक्षिण आशिया अधिक सुरक्षित झालेला नाही, असेही त्यांना वाटत होते. भारत-पाकिस्तान संबंधांत अण्वस्त्रे हा नवा घटक आलेला असून द्विपक्षीय आण्विक संबंध स्थिर होण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करायला हवेत, असे त्यांचे मत होते. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि इराण, भारत व पाकिस्तान यांनी एकत्र काम करावे, हे त्यांचे मत आजही वादग्रस्त वाटू शकते. १९९० च्या दशकात जेव्हा अमेरिकेने पाकिस्तानकडे पाठ फिरवली होती, तेव्हा- अमेरिकेने तसे करू नये व पाकिस्तानशी संबंध जपावेत, असे कोहेन यांचे मत होते.

तसेच दक्षिण आशियातील अभ्यासकांना एकत्र येऊन विचारविनिमयासाठी संधी मिळावी म्हणून श्रीलंकेतील कोलंबो येथे १९९३ साली ‘रिजनल सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज्’ स्थापन करण्यात कोहेन यांचा मोठा वाटा होता. १९९० च्या दशकात जेव्हा भारताचे महत्त्व क्रमाने वाढत गेले, तसे अमेरिकी सत्ताधारी व अभ्यासकीय वर्तुळाला दक्षिण आशिया समजावून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. कोहेन जेव्हा ब्रूकिंग्सशी जोडले गेले, तेव्हा त्या संस्थेत दक्षिण आशियावर काम करणारे ते एकटेच संशोधक होते. तिथे त्यांनी दक्षिण आशियावर अभ्यास करणारा गट तयार केला. नव्या सहस्रकात भारताचे लष्करी व राजकीय महत्त्व जसजसे वाढू लागले, तसे त्यांनी भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाचा अभ्यास केला होता. लष्करी आधुनिकीकरणाची गरज असली तरीही नेमक्या कोणत्या धोक्याला समोर ठेवून भारत आधुनिकीकरण करत आहे हे स्पष्ट नाही, असा त्यांचा निष्कर्ष होता. पाकिस्तान की चीन- यापैकी कोणता धोका अधिक महत्त्वाचा आहे याविषयी भारतात एकमत नाही, हे त्यांना लक्षात आले होते. त्यामुळेच त्याबद्दल विवेचन करणाऱ्या पुस्तकाला त्यांनी ‘आर्मिग विदाऊट एिमग’ असे नाव दिले होते.

कोहेन यांच्यावर आलेल्या मृत्युलेखांकडे नजर टाकली तर असे लक्षात येते की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील रुजुतेकडे सर्वानी लक्ष वेधले आहे. ज्याच्याशी मतभेद आहेत, त्याच्याशीही ते न कंटाळता चर्चा करायचे, प्रेमाने वागायचे. तरुण विद्यार्थी ते ज्येष्ठ संशोधक असा त्यांचा व्यापक मित्रपरिवार होता. विद्यापीठात राहूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व अजिबात निरस व कंटाळवाणे झाले नव्हते. पीएच.डी.चा प्रवास किती एकाकी आणि कठीण असतो, याची जाणीव ठेवून आपल्या विद्यार्थ्यांना ते सांभाळायचे. त्यांना घरी बोलावयाचे. त्यांच्या कार्यालयाचे दरवाजेही विद्यार्थ्यांना कायम खुले असायचे. त्यांना फिल्ड वर्कसाठी उत्तेजन द्यायचे. त्यासाठी निधीची सोय करायचे. त्यामुळेच साध्याच वाटणाऱ्या या गोष्टींची संशोधनासाठी किती गरज असते, याची कल्पना पीएच.डी. करणाऱ्यांनाच येऊ  शकेल. कोहेन यांच्या मृत्यूमुळे आपण दक्षिण आशियाचा केवळ एक अभ्यासक नव्हे, तर एक मित्र गमावला आहे. त्यांचे लेखन पुढील पिढय़ांना प्रेरणा देत राहील यात शंका नाही. पुढील काळातील अभ्यासकांना दक्षिण आशियाच्या संरक्षणविषयक प्रश्नांविषयी सोप्या भाषेत लिहिलेली त्यांची पुस्तके व संशोधनपर लेखन टाळून पुढे जाता येणार नाही. आपल्या कामामुळे कोहेन यांना भारत व पाकिस्तान या दोन्ही बाजूंनी शिव्याशाप मिळाले होते. ते आपले काम नीट करत होते याचा याहून अधिक मोठा पुरावा कोणता असू शकेल?

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 2:32 am

Web Title: article about academic career information of author stephen cohen zws 70
Next Stories
1 फेसबुकच्या मुखवटय़ामागे..
2 आरसीटी प्रणाली : प्रभाव आणि मर्यादा
3 स्वप्न आणि स्वातंत्र्य
Just Now!
X