21 September 2020

News Flash

भोपाळ रियासतीचा इतिहास

पुस्तकात डोकावण्यापूर्वी लेखक शहरयार खान यांची पूर्वपीठिका जाणून घेणे आवश्यक आहे.

‘भोपाळ कनेक्शन्स’

पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यात अधिकारी राहिलेले व तिथल्या क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद सांभाळलेले शहरयार खान हे भोपाळ रियासतीच्या वारसदारांपैकी एक. वयाच्या सोळाव्या वर्षी पाकिस्तानात कायमचे स्थायिक झालेल्या शहरयार यांनी भोपाळ संस्थानाची गाथाच या नव्या पुस्तकात मांडली आहे.. त्यातून भोपाळच्या गतेतिहासाची रंजक सफर घडते..

भोपाळ रियासतीच्या स्थापनेपासून नवाबांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करणे हा ‘भोपाल कनेक्शन्स’ या पुस्तकाच्या लेखनामागील लेखक शहरयार खान यांचा प्रमुख हेतू. हा हेतू साध्य करताना त्यांनी नवाबांशी संबंध आलेल्या काही सामान्य व्यक्तींचे असामान्यत्व वेधकतेने रंगवले आहे. एकूण पंधरा प्रकरणांमधून हे सर्व कथन सोप्या भाषेत आणि रंजकतेने केले आहे. मुख्य म्हणजे, इतिहासाचे एक रूक्ष पुस्तक असे त्याचे स्वरूप होऊ न देण्याची खबरदारीही शहरयार यांनी घेतली आहे.

पुस्तकात डोकावण्यापूर्वी लेखक शहरयार खान यांची पूर्वपीठिका जाणून घेणे आवश्यक आहे. भोपाळ रियासतीच्या अखेरचे नवाब हमिदुल्ला  खान यांची थोरली मुलगी- अबिदा सुलतान ऊर्फ सुरय्याजाह हिचे शहरयार हे पुत्र. त्यांचा जन्म १९३४ साली भोपाळमध्ये झाला. खरं तर शहरयार हे भोपाळ रियासतीचे वारस युवराज. परंतु त्यांना हे नवाबपद मिळण्यापूर्वीच त्यांची आई अबिदाने तिचे भोपाळचे बेगम नवाबपद नाकारले आणि ती १९५० सालापासून कराचीत स्थायिक झाली. आपल्या आईबरोबर शहरयार यांनीही भोपाळ सोडले. त्या वेळी त्यांचे वय होते अवघे १६ वर्षे. उच्चशिक्षणानंतर शहरयार यांनी १९५७ साली पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार खात्यात रुजू झाले. पुढे त्यांनी पाकिस्तानचे राजदूत म्हणून फ्रान्स, युके, जॉर्डन येथे काम केले. विशेष म्हणजे, शहरयार २०१४ पासून पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळा (पीसीबी) चे अध्यक्ष आहेत. त्यांची ‘द शॉलो ग्रेव्हज ऑफ रवांडा’, ‘बेगम्स ऑफ भोपाल’, ‘क्रिकेट- ए ब्रिज ऑफ पीस’ ही पुस्तके विख्यात आहेत. तर ‘भोपाल कनेक्शन्स’ हे त्यांचे नवे पुस्तक भोपाळच्या गतेतिहासावर प्रकाश टाकणारे आहे.

या पुस्तकाच्या सुरुवातीला दोस्त मोहम्मदची कहाणी वाचायला मिळते. हा एका अफगाणी पठाण टोळीवाल्याचा मुलगा. तोच पुढे भोपाळ रियासतीची स्थापना करतो. लेखकाने त्याचा उत्कंठावर्धक  इतिहास कथालेखनाच्या शैलीत दिला आहे. भोपाळच्या शेजारील राज्याचा गोंड राजा मारला गेल्यावर त्याची विधवा पत्नी दोस्तला राखी बांधून आपले आणि आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी त्याला विनवते. त्यावर रांगडा, युद्धकुशल दोस्त त्या राखीचा मान ठेवून तिचे रक्षण करतो. हा प्रसंग शहरयार यांनी अत्यंत भावस्पर्शी केलाय!

फतेहबीबी ही हिंदू राजपूत स्त्री दोस्तची सहचारिणी बनते. सुसंस्कृत फतेहबीबी दोस्तवर चांगले संस्कार करून एका रांगडय़ा शिपाईगडय़ाचे रूपांतर उत्तम राजकीय मुत्सद्दी आणि प्रशासकात करते. दोस्तनंतर त्याचा मुलगा यार मोहम्मद खान भोपाळचा नवाब होतो. ममोलाबाई ही एक हिंदू युद्धकैदी यारशी लग्न करून स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारते. पुढे भोपाळच्या इतिहासात घडणाऱ्या अनेक घटनांमध्ये ममोलाबाईची भूमिका महत्त्वाची आहे. ती यारची पत्नी, सखी, मार्गदर्शक आहे. यारच्या मृत्यूनंतर ममोलाबाईचा कर्तव्यशून्य सावत्र मुलगा- हयात हा नवाबपदी येतो. मात्र सर्व राज्य कारभार ममोलाबाईच सांभाळत असते.

अशा वेळी भोपाळमध्ये नोकरी शोधत आलेला फ्रेंच सॅल्व्हादोर डी बोरबॉन हा ममोलाबाईसाठी वरदान ठरतो. चोख लष्कर, प्रशासन आणि राजकीय मुत्सद्देगिरी या गुणांमुळे सॅल्व्हादोर भोपाळला एक समर्थ, संपन्न रियासत बनवतो. सॅल्व्हादोरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाल्थाझार आपल्या वडिलांप्रमाणे तत्कालीन नवाबाच्या राजकीय सल्लागाराचे काम करून अनेक वेळा पिंढारी आणि मराठय़ांच्या हल्ल्यांपासून राज्याचे रक्षण करतो.

याच काळात भोपाळच्या राजकारणाला अकस्मात कलाटणी मिळते. तत्कालीन नवाब नझर याचा अल्पवयीन पुतण्या पिस्तूल हाताळत असताना गोळी सुटते आणि नवाबाला लागून तो गतप्राण होतो. या धक्क्याने भोपाळ हादरते. नवाबाची बेगम कुदसिया आपल्या पंधरा महिन्यांच्या मुलीला – सिकंदरला गादीवर बसवते आणि स्वत: रिजंट (पालक कारभारी) बनते. येथून पुढे चार पिढय़ा भोपाळचा कारभार बेगम नवाबांकडेच येतो.

भोपाळ रियासतीचा कारभार अधिक काळ बेगम नवाबांनीच सांभाळल्यामुळे त्यांच्या छत्रछायेतच भोपाळ संस्कृती रुजली, वाढली. त्यामुळे भोपाळच्या नवाबशाहीच्या इतिहासात नवाबी ‘शौकिया मिजाज’ दिसत नाही, ‘शाने शौकत’ नाही की रंगमहाल आणि जनानखान्यांची वर्णने नाहीत!

आईचा कित्ता गिरवून बेगम सिकंदरही पुढे तिच्या अल्पवयीन मुलीला- शाहजेहानला गादीवर बसवून भोपाळ रियासतीची रिजंट बनते. १८५७ साली शिपायांच्या बंडाच्या काळात बेगम सिकंदर बंडखोरांविरुद्ध ब्रिटिशांना मदत करते. त्यातला तपशील लेखकाने चांगला दिला आहे. सिकंदर बेगमच्या ब्रिटिशधार्जिण्या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या झांशीच्या राणीचा तिला धमकीवजा संदेश आणि सिकंदरचे राणीला तितकेच चोख उत्तर पुस्तकात वाचायला मिळते.

पुढे सिद्दीक हसन हा एक साधारण अत्तर विक्रेता भोपाळला येतो अन् येथे त्याचे नशीबच फळफळते. नवाब बेगम शाहजेहानशी त्याचा निकाह होतो. त्यामागची कहाणी मोठी वेधक आहे.

लेखकाने नवाब बेगमांच्या जीवनातल्या काही प्रसंगांची गुंफण इतिहासकथन करता करता उत्तमरीतीने केली आहे. असाच एक प्रसंग बेगम सुलतान जहानच्या इस्तंबूल भेटीचा आहे. बेगमच्या इस्तंबूल भेटीत तुर्कीचा सुलतान तिला एक भेटवस्तू स्वीकारण्यास सांगतो. बेगम ती भेटवस्तू स्वीकारण्याची परवानगी ब्रिटिशांकडे मागते. मात्र ब्रिटिश परवानगी नाकारतात. तरीही सुलतान मोठय़ा समारंभपूर्वक ती भेटवस्तू बेगमला देतोच. ती वस्तू असते ‘मूव्ह-ए-मुबारक’ म्हणजे प्रेषित मोहम्मद पगंबरांचा पवित्र केस! आजही ही अमूल्य भेट भोपाळच्या शाही महालात चोख बंदोबस्तात आहे.

बेगम तिचा मुलगा हमिदुल्ला खान याच्यासाठी अफगाणी खानदानी वधूच्या शोधात असते. ममोना या अफगाणी खानदानी मुलीला आपली सून बनवण्यासाठी ती अनेक खटपटीही करते. ते प्रकरण तर मजेशीरच आहे. शिवाय भोपाळच्या जंगलातल्या शिकारींचे – त्यातही प्रिन्स ऑफ वेल्सच्या वाघांच्या शिकारींचे- रोमहर्षक किस्से लेखकाने मनोरंजक केले आहेत.

मैमोनाच्या लंडन भेटीत तिला चार्ल्स बेडकॉक हा ब्रिटिश खानसामा भेटतो. त्याच्या भटारखान्यातील कौशल्यावर खूश होऊन मैमोना त्याला आपल्याबरोबर भोपाळला आणून प्रमुख शाही खानसामा म्हणून नोकरी देते. हा ब्रिटिश तरुण मोठा गमत्या, मनमोकळ्या स्वभावाचा आणि हरहुन्नरी असल्यामुळे भोपाळकरांमध्ये लोकप्रिय होता. छायाचित्रण कलेतही तो निपुण होता. बडय़ा पाहुण्यांबरोबर शिकारींसाठी जाताना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आणि छायाचित्रकार म्हणूनही त्याला सोबत नेले जात असे. शिकारींची किंवा क्रिकेट-हॉकीच्या स्थानिक सामन्यांची छायाचित्रे लोकांना दाखवून तो खूश करत असे. अखेरीस विमनस्क स्थितीत त्याने आत्महत्या केली.

असाच एक किस्सा मुबारक मोहम्मद खान याचा. हा विवाहित तरुण भोपाळ नवाबांचा दूरचा नातेवाईक. महालाच्या आऊट हाऊसमध्ये राहणारा हरकाम्या. एके दिवशी बेगम त्याला एक अत्यंत खासगी महत्त्वाचे काम देते. तिच्याकडचा मौल्यवान हार लंडनला नेऊन तिथे विकून पैसे घेऊन यायची जबाबदारी मुबारकवर सोपवली जाते. बेगमला तत्पूर्वीची बेगम सुलतान जहानने हा हार केवळ एका कार्यक्रमासाठी वापरायला दिलेला असतो. मात्र मुबारक हा हार लंडनला नेतो आणि जिवाचे लंडन करतो! आपण स्वत: नवाबजादा असल्याची बतावणी करून रेस्तराँमध्ये नोकरी करणाऱ्या माजरेरी पार्किन्सन या तरुणीला भुलवून लंडनमध्येच तिच्याशी लग्न करतो. आपण अविवाहित असल्याची बतावणी करून मुबारक माजरेरीला भोपाळला आणतो. तिथे आल्यावर तिला सत्य कळते तेव्हा तिचा भ्रमनिरास होतो. मात्र तिच्याकडे लंडनला परत जाण्यासाठी पैसे नसतात. ती उर्दू भाषा शिकून भोपाळच्या बडय़ा धेंडांना नादी लावून, त्यांच्या बेगमांना मसाज करून पैसे जमवते आणि दुसऱ्या महायुद्धानंतर लंडनला परत जाते. माजरेरीची जीवनशैली, पुरुषांमध्ये मिसळणे याचे वर्णन लेखकाने मोठय़ा खुबीने केले आहे.

रणजी ट्रॉफीचे सामने सुरू होण्याआधी मुंबईत क्रिकेटचे पेंटाग्युलर सामने होत. यात हिंदू, मुस्लीम, पारशी, युरोपियन ख्रिश्चन आणि इतर धर्मीय असे पाच संघ होते. रशीद आणि सांदल हे दोघे क्रिकेटवेडे भोपाळ नवाबाच्या घराण्यातले. हे दोघे पेंटाग्युलर सामने पाहायला मुंबईत ताजमहाल हॉटेलमध्ये उतरतात. त्या क्रिकेट सामन्यांमधील मजेदार किस्से आणि प्रथमच मुंबईला आलेल्या, तिथला झगमगाट प्रथमच पाहणाऱ्या रशीदचा जल्लोष लेखकाने खुबीने वर्णिला आहे.

एकूणच लेखक शहरयार खान यांनी या पुस्तकाच्या पंधरा प्रकरणांमधून भोपाळ रियासतीचा इतिहास मांडला आहेच, शिवाय निरनिराळ्या व्यक्तींचे ‘भोपाळ कनेक्शन्स’ही अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने कथन केले आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.

‘भोपाळ कनेक्शन्स’

लेखक : शहरयार मुहम्मद खान

 प्रकाशक :  रोली बुक्स प्रा. लि., नवी दिल्ली

 पृष्ठे : २१२, किंमत : २९५ रुपये 

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 2:55 am

Web Title: book bhopal connections by shaharyar muhammed khan
Next Stories
1 आम्ही हे वाचतो : रुपेरी पडद्यामागचे स्त्री-संघर्ष..
2 रशियाच्या जाळ्यात ट्रम्प कसे अडकले?
3 ऑर्वेलची प्रकाशवाणी : शब्दांच्या शोधात..
Just Now!
X