|| राहुल सरवटे

  • ‘क्रिएटिव्ह पास्ट्स : हिस्टोरिकल मेमरी अ‍ॅण्ड आयडेन्टिटी इन वेस्टर्न इंडिया १७००-१९६०’
  • लेखिका : प्राची देशपांडे
  • प्रकाशक : पर्मनंट ब्लॅक
  • पृष्ठे : ३२०, किंमत : ६५० रुपये

आधुनिक इतिहास- विशेषत: मराठय़ांचा इतिहास- हा महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर गोंदलेला आहे. रस्ते, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, चौक, सार्वजनिक उद्याने, ग्रंथालये अशा अनेक सार्वजनिक जागा आजही महाराष्ट्रीय इतिहासातल्या विविध व्यक्तिरेखांचं स्मरण करून देतात. खेरीज, ‘शरीरानं विसाव्या शतकात वावरत असणारा मराठी भाषक हा मनाने मात्र मराठा कालखंडात रमतो!’ – ही महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहासकार य. दि. फडके यांनी नोंदवून ठेवलेली मराठी माणसाची मनोवृत्तीसुद्धा आपल्याला अपरिचित नाही. आपल्या ललित साहित्यांतून डोकावणारं पुलंच्या ‘हरितात्यां’सारखं एखादं पात्रसुद्धा ही साक्ष देऊ  शकेल. मात्र, ‘मराठी भाषिकांना इतिहासाचं वेड असलं तरी ते शिवछत्रपतींच्या उदयापासून पेशवाईच्या अस्तापर्यंतच्या ‘मराठय़ां’च्या इतिहासापर्यंतच मर्यादित आहे हे विसरून चालणार नाही,’ असंही फडके नोंदवतात.

या ‘मराठय़ां’च्या इतिहासानं अवघ्या महाराष्ट्राला कसं आणि का झपाटलं? या इतिहासाच्या अंधूक प्रकाशात आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक जाणिवांचा विकास कसा झाला? या अनेकवचनी भूतकाळानं आधुनिक महाराष्ट्रीय समाजातल्या – जात, लिंगभाव, देश, भाषा अशा सगळ्याच अस्मितांच्या जडणघडणीवर मूलभूत प्रभाव कसा पाडला? आणि या इतिहासाच्या चौकटीत अखिल भारतीय संदर्भात महाराष्ट्राने स्वत:ची विशिष्ट ओळख कशी रचली? कोलकात्यातल्या ‘सेंटर फॉर स्टडीज् इन सोशल सायन्सेस्’ या ख्यातनाम संस्थेत प्राध्यापक असणाऱ्या प्राची देशपांडे यांचं ‘क्रिएटिव्ह पास्ट्स’ हे पुस्तक अशा प्रश्नांचा अतिशय मर्मग्राही वेध घेतं.

‘मराठा कालखंडा’विषयीच्या अनेकविध कथनांद्वारे- तत्कालीन ऐतिहासिक बखरी, काव्य, ऐतिहासिक कादंबऱ्या, नाटकं, सिनेमे, ऐतिहासिक निबंध, विश्लेषणात्मक गद्य – आधुनिक ‘मराठा’ आणि ‘मराठी’ असण्याविषयीच्या धारणा कशा आकाराला आल्या, याचा शोध देशपांडे घेतात. आधुनिक महाराष्ट्राच्या रचनेत या ऐतिहासिकतेनं (किंवा नेमकं म्हणायचं तर तिच्या विशिष्ट स्मृतींनी) फार कळीची भूमिका बजावलेली आहे. देशपांडे यांचं पुस्तक ‘इतिहास’ आणि ‘स्मृती’ यांच्यातला फरक लक्षात घेऊनही, सामूहिक स्मृतींना कमअस्सल न मानता- कुठल्या (आणि कुणाच्या) स्मृती इतिहासात समाविष्ट होतात आणि कुठल्या स्मृती वगळल्या जातात, या इतिहासाच्या राजकारणाचा धांडोळा घेतं.

अकादमिक इतिहास लेखनाच्या प्रेरणा आणि स्वरूप या व्यापक समाजात रूढ असणाऱ्या किंवा लोकप्रिय अशा इतिहासविषयक कल्पनांपेक्षा काहीशा निराळ्या असणं हे साहजिकच आहे. मात्र त्यांतला विसंवाद समकालीन परिस्थितीत फारच ताणला गेलेला दिसतो. ‘अकादमिक इतिहास लेखन’ आणि समाजात प्रचलित व लोकप्रिय असणारं ‘इतिहासविषयक कथ्य’ यांच्यातल्या तफावतीबद्दल अनेकच इतिहासकारांनी काळजी व्यक्त केलेली आहे. विख्यात अकादमिक इतिहासकार सुमित सरकार यांनी आपल्याला इतिहास लेखनाच्या सामाजिक इतिहासाची आवश्यकता आहे, असं म्हटलं होतं. तसा ‘इतिहास लेखनाचा सामाजिक इतिहास’ प्राची देशपांडे मराठय़ांच्या इतिहासासंदर्भात अतिशय चिकित्सक आणि तितक्याच रसाळ शैलीत सादर करतात. ‘अकादमिक’ आणि ‘लोकप्रिय’ अशा दोन्ही ऐतिहासिक कथनांचं अतिशय सूक्ष्म आणि तरीही विस्तृत असं परिशीलन त्यांनी केलं आहे.

एकूण सात प्रकरणांत देशपांडे यांनी मराठय़ांच्या इतिहासावरील बहुविध मराठी लिखाणाची चर्चा केली आहे. पहिली दोन प्रकरणं- ‘बखरींच्या इतिहास लेखनाची पद्धती’ आणि ‘मराठय़ांच्या सत्तेचे स्वरूप’- ही ऐन मराठय़ांच्या राजवटीत लिहिल्या गेलेल्या बखरी आणि लावणी किंवा पोवाडय़ासारख्या शाहिरी कवनांचं सूक्ष्म वाचन प्रस्तुत करतात. या बखरी मराठय़ांच्या इतिहासाची मूळ साधनं असली तरी त्यांच्या काहीशा अतिरंजित शैलीमुळे आणि त्यांतल्या अद्भुताच्या वापरामुळे, त्या वस्तुनिष्ठ आणि तटस्थ इतिहासाच्या दृष्टीनं कमअस्सल मानल्या गेल्या. ‘मराठी दफ्तरातल्या पत्रव्यवहाराचा एक अस्सल चिटोरासुद्धा ढीगभर बखरींपेक्षा पुरावा म्हणून अधिक मौल्यवान आहे’ – या अर्थाचं इतिहासकार वि. का. राजवाडेंचं विधान या संदर्भात प्रख्यात आहे. देशपांडे चार प्रमुख बखरींच्या- ‘सभासद बखर’, ‘चिटणीस बखर’, ‘पेशव्यांची बखर’ आणि ‘भाऊसाहेबांची बखर’- अभ्यासातून तीन अतिशय महत्त्वाची निरीक्षणं नोंदवतात : १) या बखरी तेलुगू करणम, फारसी अखबार अशा एका भारतव्यापी इतिहास लिखाणाच्या पद्धतींचा एक भाग आहेत आणि त्या महाराष्ट्राचं उत्तर-दक्षिणेला जोडणारं स्थान अधोरेखित करतात; २) बखरी मूलत: राजकीय संहिता असून मराठा दरबारांतल्या सत्तासंघर्षांचं वाचन करण्यासाठी त्या अतिशय महत्त्वाचं साधन आहेत. मराठय़ांच्या इतिहासातल्या विविध कर्त्यांच्या कृतींचं समर्थन करणं किंवा त्यांना अधिमान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न बखरींतून सातत्यानं झाला. त्यातून मराठी राज्यसत्तेचं विकेंद्रित तरीही जोडलेलं असं गुंतागुंतीचं स्वरूप समोर येतं; ३) पोवाडा आणि लावण्यांच्या माध्यमातून मराठमोळेपणाची धार्मिक आणि नैतिक चौकट आकाराला आली.

तिसऱ्या आणि चौथ्या प्रकरणांत वासाहतिक काळातल्या इतिहास लिखाणाची आणि त्यातल्या संघर्षांची चर्चा आहे. वासाहतिक काळात आधुनिक इंग्रजी शिक्षण आणि मुद्रणाच्या सोयींमुळे समूहाचा इतिहास हा व्यापक सार्वजनिक चर्चेचा विषय होत असतानाच, भारतात लिखित इतिहासाची वानवा असून भारतीयांमध्ये इतिहासभान नाही असा समज प्रसूत झाला. दरम्यान, १८२६ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रांट डफकृत मराठय़ांच्या इतिहासापासून ‘मराठा कालखंड’ या इतिहासाच्या अभ्यासाच्या शाखेची सुरुवात झाली. त्यात वासाहतिक पूर्वग्रहांतून मराठय़ांची लुटारू आणि दरोडेखोर अशी संभावना झाल्यामुळे, मराठी नवमध्यमवर्गीय इंग्रजी शिक्षित मंडळींनी त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता इतिहासाच्या साधनांची जमवाजमव सुरू केली. मग मराठय़ांच्या इतिहासाची विविध साधनं सापडत गेली आणि त्यांच्या वाचनातून एकीकडे ऐतिहासिक सत्य म्हणजे काय, पुराव्याची छाननी कशी केली जाते, इतिहास आणि ललित साहित्य यांचा परस्परसंबंध कोणता, असे अनेक प्रश्न चर्चेला आले आणि इतिहासाचं व्यापक अभ्यासक्षेत्र उभं राहिलं. तर दुसरीकडे, एक अंतर्गत सलगता असणारा आणि पराक्रमाची गाथा सांगणारा (हिंदू) मराठा कालखंड रचला गेला; ज्याचा उपयोग राष्ट्रवादी, वसाहतवादविरोधी तसंच मुस्लीमविरोधी मांडणीसाठी चपखलपणे केला गेला.

देशपांडे यांनी या संदर्भात विष्णुशास्त्री चिपळूणकर, वि. का. राजवाडे, राजारामशास्त्री भागवत व महात्मा फुले यांच्या इतिहासविषयक विचारांची केलेली सखोल चर्चा मुळातूनच वाचण्यासारखी आहे. या नव्या इतिहासभानातून मराठी गद्याचं आधुनिक रूप आकारलं. ब्राह्मणी मध्यमवर्गीय दृष्टीचा मराठी विचार-व्यवहारावरचा पगडा दृढ झाला आणि वसाहतवादाचा वैचारिक आणि सांस्कृतिक परिणाम स्पष्ट झाला.

पाचव्या प्रकरणात या नव्या इतिहासभानाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ‘देश’ या संकल्पनेची चर्चा करताना, ‘भारत’ आणि ‘महाराष्ट्र’ या संकल्पनांच्या वापरातली संदिग्धता देशपांडे दाखवून देतात. मराठे लुटारू वगैरे नसून उलट अठराव्या शतकातल्या मराठा साम्राज्याने एकंदर भारताच्या व्यापक हिताचाच विचार केला, हे सूत्र मराठी इतिहास लिखाणात प्राधान्यानं दिसतं. ‘राष्ट्र’, ‘देश’ आणि ‘लोक’ या संज्ञांचा अर्थ इ.स. १८७० पूर्वीपर्यंत तरी अतिशय लवचीक होता आणि नंतरही त्यातली संदिग्धता काही प्रमाणात टिकून राहिली. या संज्ञांच्या अनेकविध उपयोजनांच्या अभ्यासातून, भारतापासून स्वायत्त असणारी आणि तरीही भारतीय संदर्भात स्वत:च्या अनन्यतेचं दृढ भान असणारी ‘महाराष्ट्रीय जाणीव’ या चर्चामधून कशी विकसित झाली, हे देशपांडे दाखवून देतात. या संदर्भात ‘महाराष्ट्र-धर्मा’च्या संकल्पनेविषयीच्या चर्चाची त्यांनी चिकित्सा केली आहे. या संकल्पनेच्या वापरातून ‘महाराष्ट्रीय’, ‘हिंदू’ आणि ‘भारतीय’ अशा तिन्ही सामूहिक अस्मितांमधला खोलवरचा संबंध कसा अधोरेखित होत गेला, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. शिवाय ऐतिहासिक घटनांचा कलाविष्कार कसा प्रभावी ठरत होता, याचीही चर्चा त्या करतात.

सहावं प्रकरण मराठी ऐतिहासिक कादंबऱ्या आणि नाटकांचा विचार करतं. मराठी ऐतिहासिक कादंबऱ्या व नाटकांची अफाट लोकप्रियता आणि अमाप खप नोंदवून देशपांडे त्यातल्या दोन प्रमुख सूत्रांचं विश्लेषण करतात. एक म्हणजे, ‘हिंदू विरुद्ध मुस्लीम’ असं निश्चित द्वंद्व या कथानकांमधून कल्पून- ‘कामांध’ आणि ‘हिंसक’ असे मुसलमान आणि त्यांच्यापासून हिंदू ‘स्त्री’चं आणि ‘धर्मा’चं रक्षण करणारे ते मराठे अशा प्रतिमा रंगवल्या गेल्या. या संदर्भात, ‘मुसलमानांना क्रूर आणि रानटी म्हणून चित्रित करून, मराठय़ांची मनं त्यांच्याविषयी कलुषित करण्याचे सामाजिक परिणाम भयावह होतील,’ असा गो. स. भाटे यांनी ह. ना. आपटेंच्या ‘उष:काल’ या कादंबरीचं परीक्षण करताना दिलेला इशारा देशपांडे यांनी नोंदवलेला आहे. दुसरं सूत्र स्त्रीविषयक आहे. स्त्री इथं भारतमातेचं आणि हिंदू नैतिकतेचं प्रतीक बनून मराठय़ांना प्रेरणा देते. देशपांडेंचं विश्लेषण असं आहे की, ज्याप्रमाणे तमिळनाडू किंवा बंगालमध्ये तमिळ प्रदेश किंवा बंगालदेश ‘माता’रूपात पाहिला जातो, तसं महाराष्ट्रात होत नाही. महाराष्ट्राची संकल्पना स्त्री-रूपात व्यक्त होत नाही; भारतमातेचं रक्षण करणाऱ्या पुरुषी योद्धय़ाच्या रूपात ती व्यक्त होते. स्त्री व मुस्लीमविरोधी हिंदुत्व या दोन्ही सूत्रांचा संबंध २० व्या शतकात उतरंडीला लागलेल्या ब्राह्मणांच्या सामाजिक वर्चस्वाशी त्या जोडतात.

सातव्या प्रकरणात, जातीय अस्मितांची जडणघडण ही इतिहासाच्या प्रभावामुळे कशी होत गेली, याची देशपांडेंनी चर्चा केली आहे. इथे रामदासांविषयीची मतमतांतरं, इतिहासकार राजवाडेंवर जातीय दृष्टिकोनातून लेखन केल्याची प्रबोधनकार ठाकरेंनी केलेली टीका, नवे ‘मराठा’ जात-केंद्री इतिहास लेखन व संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन काळात मांडलेला महाराष्ट्राचा इतिहास.. अशा अनेक इतिहासांचा त्या विचार करतात. मराठा इतिहासाच्या आत्मभानातून एकीकडे विविध जात-केंद्री इतिहासांच्या लिखाणातून जातीय अस्मितांचं पोषण झालं. दुसरीकडे, विदर्भ किंवा मराठवाडा ही महानुभावी अथवा प्राचीन महाराष्ट्राच्या अभ्यासाची केंद्रं बनली आणि मराठय़ांच्या ‘तेजस्वी’ भूतकाळाचं श्रेय पश्चिम महाराष्ट्राच्या पदरात पडलं, हे देशपांडे दाखवतात.

अतिशय विपुल आणि बहुविध स्वरूपाची मराठी साधनं वापरून देशपांडे यांनी महाराष्ट्रीय समाजाचं वासाहतिक आधुनिकतेशी असणारं गुंतागुंतीचं नातं दाखवून दिलं आहे. त्या ‘आधुनिक महाराष्ट्रा’च्या संकल्पनेचा वैचारिक इतिहास स्पष्ट करून भारतीय-राष्ट्रीय चौकटीत प्रदेशांच्या अस्मितांचा विचार कसा करायला हवा, याचंही प्रारूप मांडतात. ‘महाराष्ट्राला एक जबरदस्त भूत- फार मोठा समंध- बाधत आहे, त्याचे नाव इतिहास’ या इतिहासकार शेजवलकरांच्या प्रसिद्ध विधानाची प्रचीती येण्यासाठी देशपांडे यांचं विश्लेषण वाचायला हवं.

मराठी समाजाचे विविध धागे या ऐतिहासिक स्मृतींच्या साहाय्याने विणले गेलेले पुस्तकात दिसतात. मात्र त्यातल्या अनेकानेक छटा आणि रंग एकमेकांत मिसळूनही महाराष्ट्राचा बृहद् एकजिनसी प्रकल्प त्यातून साकारू शकला नाही. या इतिहासाच्याच धाग्यातून भाषिक राजकारण व जातीय अस्मितांच्या निरगाठी बांधल्या गेल्या आणि अखेरीस पुरोगामित्वाची लक्तरं वेशीला टांगली गेली. तरीही महाराष्ट्राच्या समकालीन रचनेचं हे बहुआयामी सांस्कृतिक खोदकाम आपल्या आजच्या एकंदर सामूहिक अस्तित्वाच्या आकलनासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.

rahul.sarwate@gmail.com