|| सिद्धार्थ ताराबाई

भोपाळच्या तुरुंगात त्या दिवशी एक तास १६ मिनिटे अंधार होता. मध्य प्रदेशातील मतदानानंतरच्या तिसऱ्याच दिवशीची ही गोष्ट. स्ट्राँग रूममध्ये काँग्रेस आणि भाजपचे भविष्य बंदिस्त होते. वीजपुरवठा खंडित झाला होता. सीसीटीव्ही यंत्रणा बंद. पण निमलष्करी दलाचे जवान मात्र नेम धरून तैनात होते. त्यांना संशयितास दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश होते. संशयास जागा नव्हती. तरीही काही स्थानिक काँग्रेस नेत्यांचा विश्वास नव्हता. ईव्हीएममध्ये फेरफार केले जाऊ  शकतात, अशी भीती त्यांना खाऊ  लागली होती. परंतु मतमोजणीच्या दिवशी काय झालं? भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई झाली. काँग्रेसने भाजपपेक्षा जास्त जागा जिंकल्या.. आणि संभाव्य आरोपातून ईव्हीएमची सुटका झाली!

पराभवानंतरचे नैराश्य इतरांवर, यंत्रावर किंवा यंत्रणेवर खापर फोडण्याच्या मानसिकतेला जन्म देते. निदान ते यावेळी टळले. पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडणारे पक्ष, काही नेते पाच राज्यांच्या निकालांनंतर ईव्हीएमच्या बाबतीत गप्प आहेत.

‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन: द ट्र स्टोरी’ हे पुस्तक या निवडणुकांचा हंगाम सुरू होण्याआधीच आले आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची अर्थात ईव्हीएमची रंजक आणि उद्बोधक गोष्ट त्यात सांगितली आहे. त्याचे लेखक आहेत- माजी उपनिवडणूक आयुक्त आलोक शुक्ला!

या गोष्टीचा नायक असलेल्या ईव्हीएमने आरोपांचे असंख्य अग्निबाण झेलले. त्यातून तो तावूनसुलाखून निघाला. अनेक आक्षेप घेतले गेले, युक्तिवाद केले गेले- ईव्हीएममध्ये फेरबदल करून आपल्याला हवा तसा निकाल लावता येतो.. त्याच्याशी हातमिळवणी करून आपण प्रतिस्पध्र्याला चितपट करू शकतो.. आपल्याला हवी तेवढी मते मिळवता येतात.. सगळी मते आपल्याकडे वळवता येतात.. त्यात दूरनियंत्रकाद्वारे किंवा बा इलेक्ट्रॉनिक यंत्रणा वा साधनांद्वारे फेरबदल करता येतात.. एक ना अनेक! या आणि अशा प्रकारच्या सर्व आरोप आणि आक्षेपांना शुक्ला यांनी या गोष्टीत सविस्तर शास्त्रीय उत्तरे दिली आहेत.

जगातल्या कोणत्याही सुरक्षित संगणक यंत्रणेत हस्तक्षेप, फेरफार केले जाऊ शकतात, तर ईव्हीएममध्ये का नाही, असा युक्तिवाद केला गेला. त्या संदर्भात स्पष्टीकरण देताना शुक्ला म्हणतात, ‘दूरवरून एखादी संगणक यंत्रणा हॅक करण्यासाठी नेटवर्कची आवश्यकता असते. ईव्हीएम हॅक करणे अशक्य असते. कारण ते कोणत्याही संगणक यंत्रणेशी किंवा अन्य नेटवर्कशी संलग्न नसते. पेन्टागॉनची संगणक यंत्रणा अनेक संगणक यंत्रणांशी संलग्न होती. त्यामुळेच ती हॅकर्सनी हॅक केली.’ दूरनियंत्रकाच्या मदतीने ईव्हीएममध्ये एखादी घातक संगणक प्रणाली बसवता येते, असा आरोपही काहींनी केला होता. परंतु तो कसा चुकीचा आहे हे स्पष्ट करताना शुक्ला लिहितात, ‘कोणत्याही प्रकारची प्रक्षेपक किंवा ग्राहक यंत्रणा ईव्हीएममध्ये नसल्याने भारतीय ईव्हीएम कुठल्याही नेटवर्कशी- अगदी जीएसएम, ब्ल्यू टूथ, वाय-फायशीही-  जोडता येत नाही.’

निर्मिती, तपासणी, चाचणी ते उपयोग हा ईव्हीएमचा प्रवास किती आणि कसा सुरक्षित व काटेकोर असतो, याची तपशीलवार माहिती देऊन लोकांच्या मनातील संशय दूर करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. सीतेप्रमाणे ईव्हीएमलाही अग्निपरीक्षा द्याव्या लागल्या. परंतु त्यातून ईव्हीएम उत्क्रांत, प्रगत आणि काटेकोर होत गेले, असे लेखक म्हणतो. केरळ उच्च न्यायालयातील खटला किंवा सर्वोच्च न्यायालयातील ए. सी. जोस यांच्या निकालामुळे ईव्हीएमचा वापर कसा लांबणीवर पडला, हे लेखक सांगतोच; शिवाय याचिका-फेरयाचिका आणि त्यांत उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचीही माहिती देतो.

ईव्हीएमची इथपर्यंतची वाटचाल खडतर होती. समर्थकांपेक्षा विरोधकच अधिक होते. वेळोवेळी त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले गेले. अगदी ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आल्याच्या आरोळ्याही काहींनी ठोकल्या, आंदोलनं केली. काहींनी विरोधात पुस्तकंही लिहिली. त्याविषयीची संकेतस्थळं निघाली. परंतु तरीही ईव्हीएमने आपले महत्त्व कसे सिद्ध केले, याची कहाणी लेखक विस्ताराने सांगतो.

ईव्हीएमच्या राजकीय विरोधकांनी काळाच्या ओघात आपल्या भूमिका कशा बदलल्या, हाही या गोष्टीतला आणखी एक मनोरंजक भाग! त्याविषयीही लेखकाने लिहिले आहे. के. हरिप्रसाद या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेशिवाय ही गोष्ट पूर्ण होणे अशक्य आहे. या उपद्व्यापी माणसाने ईव्हीएम हॅक करून दाखवले. त्याविषयी वृत्तवाहिन्यांनी रतीब घातला, वृत्तपत्रांचे रकाने भरले. हरिप्रसाद यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. अखेर ईव्हीएम हॅकिंगची करामत केल्याने त्यांना अटक झाली. या साऱ्या घटनाक्रमाविषयीही पुस्तकात वाचायला मिळते. एकुणात, ईव्हीएमची ही संघर्षकथा रंजक तर आहेच, पण उद्बोधकही आहे.

  • ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन: द ट्र स्टोरी’
  • लेखक : आलोक शुक्ला
  • प्रकाशक : प्लॅटिनम प्रेस
  • पृष्ठे : १९८, किंमत : १९९ रु.

siddharth.gangaram@expressindia.com