अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी २००५ पासून दर दोन वर्षांनी दिला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१६ पासून वार्षिक झाला. ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरी अथवा कथासंग्रहास हा पुरस्कार दिला जातो. मूळ लेखकाइतकेच अनुवादकालाही महत्त्व देणाऱ्या या पुरस्काराची पन्नास हजार पौंड इतकी घसघशीत रक्कम लेखक-अनुवादकांमध्ये समसमान विभागून दिली जाते. जगभरच्या सर्व देशांतील, सर्व भाषांतील लेखकांसाठी खुल्या असणाऱ्या या पुरस्काराबद्दलची उत्सुकता आता साहित्यिक-अनुवादकांइतकीच वाचकांमध्येही दिसून येते. त्यामुळेच या पुरस्काराच्या प्राथमिक तसेच अंतिम यादीकडे विचक्षण वाचकांचे लक्ष लागून राहिलेले असते. तर, अशा या ‘मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइझ’ची यंदाची अंतिम नामांकन यादी गुरुवारी- १२ एप्रिलला लंडन येथील सॉमरसेट हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे सहा पुस्तकी असलेल्या या यादीत पुढील पुस्तकांनी स्थान पटकावले आहे- (१) ‘व्हेरनॉन सुबुटेक्स’- व्हर्जिनिए डीस्पेन्टेस  (२) ‘द व्हाइट बुक’- हान कँग (३) ‘द वर्ल्ड गोज् ऑन’- लास्लो कारझ्नाहोरकाइ (४) ‘लाइक अ फेडिंग श्ॉडो’- अ‍ॅन्टोनिओ म्युनोझ् मोलिना (५) ‘फ्रॅन्केन्स्टाइन इन बगदाद’- अहमद सादावी आणि (६) ‘फ्लाइटस्’- ओल्गा टोकरचक

यंदाच्या या यादीचं वैशिष्टय़ म्हणजे, जागतिक कल्पित साहित्यातील योगदानासाठी २०१५ साली ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ने गौरविण्यात आलेले हंगेरीचे ज्येष्ठ कादंबरीकार लास्लो कारझ्नाहोरकाइ आणि पुढच्याच वर्षी, २०१६ मध्ये ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार पटकाविणारी दक्षिण कोरियाची लेखिका हान कँग- या दोघांची नवी पुस्तके यंदाच्या यादीत निवडली गेली आहेत. ‘सटॅनटँगो’ आणि ‘मेलॅन्कली ऑफ रेझिस्टन्स’ या १९८० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या कादंबऱ्यांपासून सतत लिहिते राहिलेले कारझ्नाहोरकाइ उत्तराधुनिक आशयासाठी प्रसिद्ध आहेत. गतवर्षी त्यांचा ‘द मॅनहॅटन प्रोजेक्ट’ हा ललितप्राय निबंधांचा संग्रह प्रकाशित झाला. हा संग्रह इंग्रजीत अनुवादित करणारे अनुवादक जॉन बॅटकी यांच्यासह ऑत्तिली मुझलेट आणि जॉर्ज शिर्टेस अशा तिघांनी मिळून अनुवादित केलेला कारझ्नाहोरकाइ यांचा २०१३ साली प्रकाशित ‘द वर्ल्ड गोज् ऑन’ हा तब्बल २१ कथांचा संग्रह यंदाच्या यादीत एक प्रबळ स्पर्धकआहे. तर हान कँगची या यादीत स्थान मिळवलेली कादंबरी आहे- ‘द व्हाइट बुक’,अनुवादक – डेबोरा स्मिथ!  कँगच्या ‘द व्हेजिटेरियन’चा  अनुवादही डेबोरा स्मिथनेच केला होता. या गतविजेत्यांबरोबरच पोलंडच्या ओल्गा टोकरचकची ‘फ्लाइट्स’ ही इंग्रजीत अनुवादित झालेली पहिलीच कादंबरीही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच आतापर्यंत डझनाहून अधिक कादंबऱ्या नावावर असलेल्या स्पेनच्या अ‍ॅन्टोनिओ म्युनोझ् मोलिनाची ‘लाइक अ फेडिंग शॅडो’ ही मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांचा मारेकरी जेम्स अर्ल रे यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी कादंबरी, फ्रान्सची पत्रकार-लेखिका व्हर्जिनिए डीस्पेन्टेस हिची शहरी वळणाची ‘व्हेरनॉन सुबुटेक्स’ ही कादंबरी आणि २०१४ साली अरेबिक बुकर पटकावणारी इराकी लेखक अहमद सादावीची ‘फ्रॅन्केन्स्टाइन इन बगदाद’ ही बहुचर्चित कादंबरीही या यादीत आहे. खंत एकच, की २०१६ पासून वार्षिक झालेल्या या पुरस्काराच्या अंतिम यादीत एकही भारतीय लेखक नाही.