News Flash

अव-काळाचे आर्त : नव्या युगाची पूर्वसूचना…

कादंबरीच्या सुरुवातीला अ‍ॅलेक्सच्या चौकडीनं केलेल्या हिंसेची रसभरित वर्णनं आहेत.

‘अ क्लॉकवर्क ऑरेंज’ लेखक : अँथनी बर्जेस प्रकाशक : डब्ल्यू. डब्ल्यू. नॉर्टन अ‍ॅण्ड कंपनी पृष्ठे : २७२, किंमत : १,८३९ रुपये

|| अभिजीत रणदिवे

संकल्पस्वातंत्र्य सगळ्यांना असताना काहींनी हिंसेची ‘निवड’ करणं आणि सगळ्यांनीच संकल्पस्वातंत्र्य गमावून बसणं, यांतला कोणता पर्याय योग्य?

कल्पना करा, दररोज संध्याकाळी अंधार पडल्यानंतर तरुणांच्या टोळ्या रस्त्यांवर फिरू लागतात आणि दिसेल त्या माणसावर हल्ला चढवतात. पैशाची गरज असली तर लोकांना लुटतातही, किंवा लैंगिक भूक भागवण्यासाठी एखाद्या स्त्रीवर बलात्कारही करतात; पण हिंसा आणि अत्याचार करण्यासाठी तसं काही कारण असायलाच हवं असंही नाही. पोलिसांचा या तरुणांवर वचक नाही. कुणी सापडलाच, तर पोलीस त्याला पकडतात, बुकलतात किंवा तुरुंगातही पाठवतात; पण संख्याबळ तरुणांच्या बाजूनं आहे. थोडक्यात, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आहे आणि सरळमार्गी पापभीरू माणसाला शांतपणे जगणं अशक्य झालं आहे. ब्रिटिश लेखक अँथनी बर्जेसच्या ‘अ क्लॉकवर्क ऑरेंज’ (१९६२) या कादंबरीची सुरुवात अशा डिस्टोपियन वातावरणात होते.

मात्र, कादंबरीतला डिस्टोपिया हाच आहे की वेगळा, याविषयी सुरुवातीपासूनच वाचकाच्या मनात संदेह निर्माण होतो. त्याची कारणं अनेक आहेत. कादंबरीचा निवेदक-नायक अ‍ॅलेक्स स्वत:च एका टोळीचा म्होरक्या आहे. म्हणजे, कादंबरी ‘कायदा आणि सुव्यवस्थे’च्या नव्हे, तर हिंसेचा आनंद लुटणाऱ्या एका तरुणाच्या नजरेतून उलगडते. असे तरुण-तरुणी संध्याकाळी ज्या अड्ड्यावर जमतात तो एक दुधाचा ‘बार’ असतो. म्हणजे हा दूधपित्या दंगेखोरांचा डिस्टोपिया आहे (दुधात मादक द्रव्यं घालून मिळतात, पण तरीही ते दूधच). याशिवाय, अ‍ॅलेक्स आणखी एका बाबतीत इतर हिंसक तरुणांहून वेगळा असतो : तो अभिजात संगीताचा प्रेमी असतो. बीथोव्हन ऐकून त्याला उत्कट आनंद लाभतो. याउलट, अ‍ॅलेक्सच्या परिसरात अभिजात संगीताला विशेष स्थान नसतं. लोक फारसे वाचतही नाहीत, आणि त्यामुळे जुनं काही, इतिहासबितिहास त्यांच्या फारसा लक्षातही नसतो. सक्षम प्रौढांसाठी कामावर जाणं अनिवार्य आहे. समाजातले मध्यमवयीन, मध्यमवर्गीय लोक संध्याकाळी कामावरून घरी आले की टीव्हीसमोर बसतात. जगभरातल्या सगळ्यांना टीव्हीवर एकच एक गोष्ट दिसते. म्हणजे ‘काम-मठ्ठ मनोरंजन-झोप’ एवढाच त्यांचा जीवनक्रम आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणारे लोक भ्रष्ट आहेत. राजकारणी तापल्या तव्यावर पोळी भाजण्यात निष्णात तर आहेतच, शिवाय स्वातंत्र्य, जगण्याचा हक्क वगैरे मानवी मूल्यांशी त्यांना काही देणंघेणं नाही.

कादंबरीच्या सुरुवातीला अ‍ॅलेक्सच्या चौकडीनं केलेल्या हिंसेची रसभरित वर्णनं आहेत. वाचकाची सहानुभूती मिळावी असं काही त्यात दिसत नाही. पुढे एका घरी दरोडा घालताना अ‍ॅलेक्स पकडला जातो. त्यानं केलेल्या मारहाणीमुळे घराच्या मालकिणीचा मृत्यू होतो. अ‍ॅलेक्सला १४ वर्षांचा तुरुंगवास होतो. मात्र, दोन वर्षांनंतर त्याला एक पर्याय दिला जातो. कैद्यांना ‘सद्वर्तनी’ करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एक उपचार उपलब्ध असतो. तो घेऊन अ‍ॅलेक्स जर ‘बरा’ झाला तर त्याची मुक्तता केली जाईल, असं आश्वासन त्याला मिळतं. अ‍ॅलेक्स हा पर्याय निवडतो. इथून पुढे त्याचं जे काही होतं त्यातून मात्र वाचकाची सहानुभूती अ‍ॅलेक्सकडे वळते. या उपचारामुळे पावलॉव्हच्या कुत्र्यासारखा परिणाम अ‍ॅलेक्सच्या मेंदूवर होतो. पावलॉव्ह या रशियन डॉक्टरनं केलेल्या प्रयोगांत त्याला आढळलं की, कुर्त्यांना दररोज जेवण देण्याआधी जर एखादी अन्नाशी संबंध नसलेली कृती केली (उदा. घंटा वाजवली) तर हळूहळू कुर्त्यांना त्याची सवय होते. मग घंटेचा आवाज येताच (अन्नाचा विचार मनात येऊन) कुत्र्यांची लाळ गळू लागते. एखाद्या गोष्टीची अशी सवय लावून प्राण्याच्या नैसर्गिक वर्तनात बदल कसा घडवता येतो, याचा अभ्यास पावलॉव्हनं केला. अशाच प्रकारे अ‍ॅलेक्सच्या मेंदूमध्ये एक स्थित्यंतर घडवून आणलं जातं. आता हिंसेचा किंवा शरीरसंबंधांचा विचार येताच त्याचा मेंदू बंड करून उठतो. अ‍ॅलेक्सची हिंसकता आणि लैंगिकता निष्प्रभ होते. अशा अ‍ॅलेक्सला मग मुक्त केलं जातं. मात्र, इथून पुढे त्याचे खरे हाल चालू होतात. तो आधीच्याच हिंसक जगात परत फेकला जातो. या जगाचा नियम ‘जगा आणि जगू द्या’ नसतो, तर ‘मारा किंवा मरा’ हा असतो. पण ‘नव्या’ अ‍ॅलेक्सला स्वसंरक्षण करणंही शक्य नसतं. स्वत:चा जीव वाचवण्यासाठीही तो कुणावर हात उगारू शकत नाही; आणि बलात्कार सोडा, शरीरसुख परस्परसंमतीनं घेणंही आता त्याला शक्य नाही. शिवाय, एकेकाळी प्रिय असलेलं संगीतही आता त्याला सहन होत नाही.

अ‍ॅलेक्सच्या या अवस्थेतून कादंबरी अनेक तत्त्वचिंतनात्मक प्रश्न उभे करते. त्यांचा संबंध कादंबरीच्या शीर्षकाशी लागतो. संत्रं रंगीत, मऊ आणि रसाळ असतं; ते गोड असू शकतं किंवा आंबटही. याउलट (अ‍ॅनालॉग) घड्याळांची अंतर्रचना करडी, करकरीत आणि यांत्रिक असते. त्या यंत्रणेला जबरदस्त शिस्त असते. तिचं काम अचूक आणि बिनबोभाट चालतं. घड्याळानं योग्य वेळ दाखवावी यासाठीच तिची रचना तशी असते. मग संत्र्यालाही तसंच शिस्तबद्ध, यांत्रिक आणि अचूक करायचा प्रयत्न केला तर?

अ‍ॅलेक्सच्या मेंदूमध्ये फेरफार करण्याचा प्रयोग तशा प्रकारचा असतो. पाश्चात्त्य धर्मविचारानुसार माणसाला देव किंवा सैतान असा पर्याय उपलब्ध असतो. त्यानं देवाची (नैतिक) शिकवण मानली, तर तो सत्प्रवृत्तीकडे (आणि अखेर स्वर्गप्राप्तीच्या दिशेनं) जातो, तर सैतानाची (अनैतिक) शिकवण त्याला दुष्प्रवृत्तीकडे (आणि अखेर नरकाच्या दिशेनं) नेते. आधुनिकतावादी, मानवकेंद्री विचारसरणींनुसार माणसाकडे संकल्पस्वातंत्र्य असतं (फ्री विल). आपण कसं जगावं याचा निर्णय तो स्वत:च्या मर्जीनं घेतो, पर्यायानं आपली नैतिकता तो निवडतो, आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी त्याला घ्यावी लागते.

इथं मात्र कैद्यांवर प्रयोग करणारी यंत्रणा शासकीय असते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला अ‍ॅलेक्स बदलून हवा असतो, कारण अ‍ॅलेक्ससारखे गुंड जर अहिंसक झाले तर पोलिसांवरचा, न्यायव्यवस्थेवरचा आणि तुरुंगांवरचा ताण कमी होणार असतो. त्याचप्रमाणे त्यांच्या सरासरी (मध्यमवयीन, मध्यमवर्गीय) मतदाराला आपलं मठ्ठ, एकसुरी जीवन मग शांततेनं जगता येणार असतं. त्यामुळे त्यांची मतं सत्ताधारी पक्षाला मिळणार असतात. थोडक्यात, नैतिक-अनैतिकतेचे निर्णय इथं शासकीय यंत्रणा घेते आणि तिच्या सोयीनुसार माणसाला वळवलं जातं. देव-सैतान द्वैत किंवा संकल्पस्वातंत्र्यातून माणसासमोर उभे ठाकणारे नैतिकतेचे पर्याय, आणि त्यातून करायची चांगल्या-वाइटाची निवड इथं नसतेच. इथं व्यवस्थेची चौकट सर्वंकष ठरते आणि माणसासमोरचे जगण्याचे पर्यायच ती नष्ट करते.

संकल्पस्वातंत्र्य सगळ्यांना असताना काहींनी हिंसेची ‘निवड’ करणं आणि सगळ्यांनीच संकल्पस्वातंत्र्य गमावून बसणं, यांतला कोणता पर्याय योग्य? माणूस निवडीचे पर्यायच हरवून बसला तर त्याला माणूस म्हणता येईल का? आणि अशा प्रकारे जगातून दुष्प्रवृत्तींचा समूळ नायनाट करता आला, तर ते जग खरंच युटोपियन होईल का?

याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कादंबरी प्रकाशित झाली तो काळ आणि अँथनी बर्जेसचा भूतकाळ तपासावा लागेल. बर्जेसचा जन्म १९१७ साली झाला. १९१८ च्या फ्लूच्या महासाथीत त्याची आई वारली. युद्धोत्तर काळातलं आणि नंतरच्या जागतिक महामंदीतलं कनिष्ठ मध्यमवर्गीय बालपण, मग दुसऱ्या महायुद्धादरम्यान सैन्याच्या वैद्यकीय विभागात नोकरी आणि नंतर ब्रिटनच्या विविध वसाहतींत शिक्षक म्हणून नोकरी अशा प्रकारचं आयुष्य गेल्यानंतर साठच्या दशकात तो ब्रिटनला परतला. तिथं एक नवी तरुण संस्कृती बहरत होती. मंदी, महायुद्ध, हलाखी त्या तरुणांनी अनुभवलेली नव्हती. बीटल्सचा उदय होऊ घातला होता (त्यांची पहिली तबकडी १९६३ साली आली). १९६१ साली ब्रिटनमध्ये विवाहित स्त्रियांना गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध झाल्या होत्या. वेश्या आणि समलैंगिक लोकांविषयी निर्णय घेण्यासाठी १९५४ साली सरकारनं वूल्फन्डन समिती स्थापन केली होती. तिच्या (१९५७ साली आलेल्या) अहवालात समलैंगिकता कायदेशीर करावी अशी शिफारस होती. प्रत्यक्षात तसा कायदा पुढे १९६७ साली आला. स्त्रियांना गर्भपाताचा हक्कही त्याच साली मिळाला.

थोडक्यात, एक नवी नैतिकता घेऊन स्वातंत्र्याचं एक नवं युग अवतरत होतं, ते तरुणांचं असणार होतं आणि १९६२ साली त्याची चाहूल लागत होती. मात्र, याच वेळी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मध्यमवर्ग आणि त्याचं धुरीणत्व करणारा सत्ताधारी वर्ग अजूनही एका जुन्या ब्रिटनमध्ये अडकला होता. तत्कालीन पंतप्रधान मॅकमिलन लवकरच व्हिक्टोरियन काळात जन्मलेले अखेरचे पंतप्रधान ठरणार होते. साठच्या दशकात त्यांचं वागणं-बोलणं, त्यांची मतं कालबाह््य होऊ लागली होती. त्यामुळे ते टवाळीचा विषय ठरले होते. वसाहतवाद, शीतयुद्ध, अणुबॉम्ब हा जुन्या व्यवस्थेचा वारसा होता. त्याविरुद्ध आता तरुण वर्ग उभा ठाकणार होता. त्याची चिन्हं बर्जेसला दिसत होती.

‘व्यवस्थे’चं प्रतिनिधित्व करणारी कादंबरीतली पात्रं भ्रष्ट, असंवेदनशील आणि अनैतिक आहेत- मग ते डावे/उजवे राजकारणी असोत, पोलीस असोत की अ‍ॅलेक्सचे आईवडील. याउलट, अ‍ॅलेक्स संवेदनशील असल्यामुळे मठ्ठपणे जगणाऱ्या आपल्या आईवडिलांपासून ते कायदा-सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसापर्यंत सगळ्यांचीच त्याला चीड येते. ज्याप्रमाणे पुढे सत्तरच्या दशकात आपल्याकडे अमिताभ बच्चनचा ‘अँग्री यंग मॅन’ अवतरला तशीच इथल्या अ‍ॅलेक्सची हिंसा या व्यवस्थेविरुद्धच्या त्याच्या संतापातून आलेली आहे. व्यवस्थेच्या नजरेत अ‍ॅलेक्स सैतानाला शरण गेलेला आणि म्हणून चिरडून टाकण्याच्याच लायकीचा आहे; तर अ‍ॅलेक्सच्या दृष्टीतून व्यवस्था म्हणजे स्वातंत्र्याची, सौंदर्याची आणि जगात टिकवून ठेवण्यासारखं जे जे काही आहे त्या सगळ्याची मान पिरगाळून टाकणारी एक अजस्रा आणि क्रूर यंत्रणा आहे. लोकांना कह््यात ठेवण्यासाठी ही व्यवस्था त्यांच्यासमोर जी प्रलोभनं ठेवते ती अ‍ॅलेक्सच्या शब्दांत- ‘अधिकाधिक मोठ्या पडद्यांचे स्टीरिओ टीव्ही संच आणि सूप कॅन्सवरची लेबलं गोळा केलीत तर त्या बदल्यात साबणचुरा (केवळ एका आठवड्यापुरतीच ऑफर सीमित!).’ ज्या जगात अशा व्यवस्थेला सत्प्रवृत्तीची प्रतिनिधी मानलं जातं ते जगच अ‍ॅलेक्ससाठी डिस्टोपिया आहे आणि त्याची दुष्प्रवृत्ती ठामपणे त्याविरोधात आहे. मागच्या पिढीशी विद्रोह म्हणून अ‍ॅलेक्स आणि त्याच्या वयाच्या इतर तरुणांची बोलीही (ठं२िं३) वेगळी आहे. या विद्रोही अ‍ॅलेक्समध्ये बर्जेसनं एक पाचर मात्र मारून ठेवली आहे : जर अ‍ॅलेक्सला कुणी प्रेमाचं माणूस भेटलं, तर त्याचा विद्रोह कमी होईल का? (पण याचं स्पष्ट उत्तर कादंबरी देत नाही.)

कादंबरी प्रकाशित झाली आणि तिनं हिंसेचं उदात्तीकरण केलं असा समज झाल्यामुळे ती धक्कादायक ठरली. पण ती लोकप्रियही झाली. १९७१ साली तिच्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला आणि तोही गाजला. पुढे बर्जेसनं बरंच काही लिहिलं (त्यात ऑर्वेलच्या ‘१९८४’वर आधारित ‘१९८५’ ही डिस्टोपियन कादंबरीही आहे); इतर क्षेत्रांतही त्यानं लक्षणीय काम केलं, पण आजही ‘अ क्लॉकवर्क ऑरेंज’चा लेखक म्हणूनच तो ओळखला जातो. बऱ्याचशा डिस्टोपियन कादंबऱ्या भयप्रद भविष्यकाळ दाखवतात. ‘क्लॉकवर्क ऑरेंज’ मात्र वेगळी ठरते, कारण ती जुनं, सडलेलं युग एक डिस्टोपिया म्हणून प्रभावीपणे दाखवते आणि येऊ घातलेल्या एका नव्या युगाची पूर्वसूचना देते.

rabhijeet@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 12:16 am

Web Title: freedom resolution appetite foreshadowing new age akp 94
Next Stories
1 परिचय : जगाचे नैतिक भान…
2 महाराष्ट्रीय प्रबोधनाची कुळकथा…
3 बुकबातमी : अवघड प्रश्नाला सोपे उत्तर!
Just Now!
X