इकडे महाराष्ट्रात एका कवितेतील ओळीवरून काहींच्या भावना दुखावल्या आणि ती कविता अभ्यासक्रमातूनच मागे घ्यावी लागल्याचे प्रकरण ताजे आहे. तर तिकडे दिल्लीत एका चरित्रपर पुस्तकाच्या वितरण आणि विक्रीवरच उच्च न्यायालयाने सशर्त निर्बंध आणले आहेत. रामदेव बाबा यांचे ते चरित्र! ‘गॉडमॅन टू टायकून: द अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव’ हे त्याचे शीर्षक! पेशाने पत्रकार असलेल्या प्रियांका पाठक-नरेन यांनी लिहिलेले हे पुस्तक ‘जगरनॉट’ या प्रकाशनसंस्थेने गतवर्षी जुलैमध्ये प्रकाशित केले. मात्र, महिनाभरातच त्यावर चरित्रनायकाने आक्षेप घेत सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पुस्तकाच्या छपाई आणि विक्रीवर तेव्हा तात्पुरते निर्बंध आणले.  त्याविरोधात प्रकाशनसंस्था उच्च न्यायालयात गेली खरी, पण गेल्या शनिवारी उच्च न्यायालयानेही चरित्रनायकाविषयीचा आक्षेपार्ह भाग काढून टाकल्याशिवाय पुस्तक बाजारात आणता येणार नाही, असा निर्णय दिला आहे.

हरयाणाच्या महेंद्रगडमध्ये जन्मलेले रामकृष्ण यादव यांचा ‘बाबा रामदेव’ होण्यापर्यंतचा प्रवास हे पुस्तक मांडते. नव्वदच्या दशकात दिव्य योग मंदिर ट्रस्ट, पुढे दोनहजारोत्तर काळात टीव्हीवरील योगप्रात्यक्षिके यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेल्या बाबा रामदेव यांची गेल्या दशकभरात पतंजली योगपीठ, पतंजली आयुर्वेद, भारत स्वाभिमान ट्रस्ट यांच्या माध्यमातून झालेल्या झटपट प्रगतीचा आढावा हे पुस्तक घेते. त्यासाठी बाबा रामदेव यांच्यासह त्यांचे सहकारी-कुटुंबीयांच्या पन्नासएक मुलाखती, विविध लेख आणि माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीचा आधार घेतला गेला आहे. त्याची २५ पानांची संदर्भयादीच या २४८ पानी पुस्तकात आहे. असो. मात्र, उच्च न्यायालयात पराभव पत्करावा लागला असला तरी ‘जगरनॉट’ आता याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे!