सिनेसृष्टीतील अंगभूत अनिश्चितता अनेक कलाकारांच्या वाटय़ाला येते. त्यातून येणारे अपयश, मग नैराश्य आणि एकाकीपणाने अनेकांची कारकीर्दच नव्हे, तर आयुष्येही संपवली आहेत. प्रतिभावान, यशस्वी कलावंतांच्या आयुष्यात येणारा हा एकाकीपणा इतका जीवघेणा असतो का, हा प्रश्न अभिनेता-दिग्दर्शक गुरुदत्त यांच्यानिमित्ताने गेल्या अनेक दशकांपासून अनेकांना पडला. गुरुदत्त यांचे चित्रपट, त्यांची सर्जनशीलता या सगळ्याचा विविधांगी वेध घेण्याचा प्रयत्न मराठीत भाऊ पाध्ये, इसाक मुजावर ते अरुण खोपकर अशांनी केलाच, अन् हिंदूी-इंग्रजीतही गुरुदत्त यांच्यावर बरीच पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली. परंतु गुरुदत्त यांच्याभोवतीचे गूढवलय काही पूर्णत: उलगडले असे खात्रीने म्हणता येत नाही. म्हणूनच ते उलगडून पाहण्याची इच्छा अनेकांना आजही होतेच. यासर उस्मान हे त्यांपैकीच एक. ‘गुरुदत्त : अ‍ॅन अनफिनिश्ड् स्टोरी’ हे त्यांचे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले.

न उलगडलेल्या गोष्टींचा माग काढत, अभ्यास-संशोधनातून त्यांचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न लेखक यासर उस्मान यांनी याआधीही केला आहे. मात्र, ज्या गुरुदत्त यांच्याबद्दल इतके  लिहिले गेले आहे, बोलले गेले आहे, त्यांची आणखी कोणती गोष्ट ते उलगडणार, हा प्रश्न साहजिकच डोकावू शकतो. परंतु गुरुदत्त यांच्यासारख्या अलौकिक प्रतिभेच्या काहीच व्यक्ती अशा असतात की त्यांच्याविषयी जेवढे जाणून घ्यावे तेवढे त्यांच्याविषयीचे कुतूहल वाढत जाते. त्यांच्या गोष्टीतील पूर्णत्वापेक्षाही त्यांच्यातील अपूर्णत्व नेमके  काय होते, याचा शोधमोह निर्माण होतो. पन्नास-साठच्या दशकांत ‘प्यासा’, ‘कागज के  फूल’ यांसारखे अजरामर सिनेमे देणाऱ्या या प्रतिभावान दिग्दर्शकाला केवळ सर्जनशील आशयाची आस होती असे नाही, तर दर्जेदार आशयाबरोबरच व्यावसायिक चित्रपटनिर्मितीचा आग्रह धरणारा दिग्दर्शक-कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. पैशाच्या पाठी धावणाऱ्या दिग्दर्शकांपैकी ते नव्हते, मात्र एकटय़ाने फिल्म स्टुडिओ यशस्वीपणे चालवण्याची धमक त्यांच्यात होती. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, व्यावसायिक अशा नानाविध भूमिका लीलया पेलणाऱ्या या प्रतिभावंताच्या आयुष्यात वैयक्तिक दु:खाची एक किनार होती. प्रसिद्ध गायिका गीता दत्त यांच्याबरोबरचे त्यांचे वैवाहिक जीवन हे वादळी होते, अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्याबरोबरच्या त्यांच्या प्रेमसंबंधांचीही चर्चा होत राहिली. मात्र त्यांच्या आत्महत्येमागे खरेच हे कारण होते का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न उस्मान यांनी या पुस्तकात केला आहे.

गुरुदत्त यांच्या भगिनी प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून उस्मान यांनी गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्या नात्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय देव आनंद, वहिदा रेहमान, जॉनी वॉकर यांसारख्या त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलेल्या आठवणी, त्यांच्याविषयीचे संदर्भ या साऱ्याचा आधार घेत यशस्वी तरीही एकाकी राहिलेल्या या कलाकाराचा जीवनप्रवास नव्याने उलगडून सांगितला आहे.