News Flash

परिचय : जगाचे नैतिक भान…

ब्रिटनचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राउन हे २००८ चा आर्थिक फटका हाताळण्यासाठी विशेषत्वाने ओळखले जातात.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राउन हे २००८ चा आर्थिक फटका हाताळण्यासाठी विशेषत्वाने ओळखले जातात. ‘जागतिक नेतृत्व देऊ शकणारे अखेरचे ब्रिटिश पंतप्रधान’ ही त्यांची ओळख, त्यांच्यानंतर त्या खुर्चीत बसणाऱ्यांच्या संदर्भात फारच खरी ठरावी. २००७ ते २०१० हा त्यांच्या पंतप्रधानपदाचा काळ, पण त्याआधीची दहा वर्षे ते ब्रिटनचे अर्थमंत्री होते. २०१७ मध्ये आलेले ‘माय लाइफ : अवर टाइम्स’ हे त्यांचे पुस्तक आत्मचरित्रपर असले तरी स्वत:तच गुरफटणारे नव्हते. त्यानंतरचे ताजे पुस्तक- ‘सेव्हन वेज टु चेंज द वर्ल्ड’ – अधिकृतपणे १० जूनला प्रकाशित (प्रकाशक : सायमन अ‍ॅण्ड शूस्टर लि.) झाले. हे पुस्तक त्यांच्या भाषणांवर आधारित असावे, परंतु एखाद्या विषयावरील अनेक भाषणांतून एक सुघटित प्रकरण कसे करावे, याचा ते वस्तुपाठ ठरेल. जागतिक आरोग्य, हवामान-बदल आणि पर्यावरणाचे प्रश्न, आण्विक सामग्रीचा प्रसार, जगाचे वित्तीय स्थैर्य, भूक-शिक्षण यांसारखे मानवी प्रश्न आणि जागतिक दारिद्र्य अशा सातच प्रकरणांत विभागलेले हे ५१२ पानांचे पुस्तक एकेका प्रश्नाची भरपूर माहिती (प्रामुख्याने मॅकिन्से, जागतिक नाणेनिधी व जागतिक बँक यांच्या अहवालांआधारे) देते व त्याहून महत्त्वाचे म्हणजे, या प्रश्नांबाबत जागतिक नेत्यांची नैतिक जबाबदारी काय आहे/असायला हवी याचे नैतिक भानही देते.

हे नैतिक भान कुणाला ‘तद्दन समाजवादी’ वाटेल, पण ब्रिटिश मजूरपक्षीय नेते म्हणून गॉर्डन ब्राउन ज्या नीतीशी-ज्या धोरणांशी प्रामाणिक राहिले (परंतु जी धोरणे त्यांना जगाच्या गळी उतरवता आली नाहीत) त्यांचाच भविष्यवेधी पाठपुरावा त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. काही वेळा, पंतप्रधानपदी असताना त्या-त्या प्रश्नांच्या संदर्भात काय करायचे राहून गेले याचाही ओझरता उल्लेख येतो. पण पुस्तकाचा एकंदर सूर अजिबातच आत्मपर नाही. एका वाक्यात सांगायचे तर ‘आर्थिक आणि राजकीय प्रश्नांची नैतिक चर्चा’ हे या पुस्तकाचे गमक. नैतिक जबाबदारीची चर्चा अनेकपरींनी येते. मुख्य भाग बड्या-श्रीमंत राष्ट्रांनी गरीब राष्ट्रांना मदत केलीच पाहिजे आणि ती आतापेक्षा कितीतरी अधिक केली पाहिजे, हा आहे. पण देशांमधले नेते किंवा सरकारप्रमुख काय करू शकतात, बिगर-सरकारी क्षेत्रांमधील नेतृत्वावर (नैतिकतेची किंवा नैतिक टोचणी लावण्याची) भिस्त ठेवण्यापेक्षा व्यवस्थात्मक बदल का केले पाहिजेत, याचाही ऊहापोह ब्राउन करतात. ही संघटित व्यवस्थात्मक बदलाची पातळी गाठण्याआड ‘राष्ट्रवाद’ येऊ शकतो, याची पुरेपूर कल्पना त्यांना आहे. राष्ट्रवादाचा राजकीय मुद्दा पुढे आणून ‘खऱ्या’ प्रश्नांकडे दुर्लक्ष कसे होते, याचा हिशेबही ब्राउन यांनी या पुस्तकात काही ठिकाणी मांडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 12:15 am

Web Title: introduction moral consciousness of the world akp 94
Next Stories
1 महाराष्ट्रीय प्रबोधनाची कुळकथा…
2 बुकबातमी : अवघड प्रश्नाला सोपे उत्तर!
3 हुकूमशाहीच्या पडद्याआड…
Just Now!
X