News Flash

इस्रोची यशोगाथा!

‘इस्रो : अ पर्सनल हिस्टरी’ या पुस्तकातून उलगडणारा भारतीय अंतराळ विकास प्रवास रोमांचकारी आहे.

‘इस्रो : अ पर्सनल हिस्टरी’ या पुस्तक

डॉ. विक्रम साराभाई या द्रष्टय़ा शास्त्रज्ञाच्या प्रयत्नांतून १९६९ मध्ये ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ची (इस्रो) स्थापना झाली. सुरुवातीपासूनच डॉ. साराभाईंनी देशातील तरुण अभियंते व शास्त्रज्ञांना इस्रोशी जोडून घेतले. ‘इस्रो – अ पर्सनल हिस्टरी’ या पुस्तकाचे लेखक आर. अरवमुदन हे त्यांपैकीच एक.. स्थापनेपासून इस्रोशी जोडले गेलेल्या अरवमुदन यांनी इस्रोच्या गेल्या सुमारे पाच दशकांच्या वाटचालीचा साक्षेपी आढावाच या पुस्तकातून घेतला आहे. अनेक यशापयश पचवत स्वयंपूर्णतेकडे झालेला इस्रोचा प्रवास त्यातून उलगडत जातो..

गेल्या महिन्यात ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने (इस्रो) इतिहास रचला. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून तब्बल ६४० टन वजनाचा ‘जीएसएलव्ही मार्क-३’ प्रक्षेपक ‘जीसॅट-१९’ या ३,१३६ किलो वजनी उपग्रहासह अवकाशात झेपावला आणि इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. त्याआधी यंदाच्या फेब्रुवारीमध्येच पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे १०४ उपग्रह प्रक्षेपित करून इस्रोने आपले सामर्थ्य सिद्ध केले होते. या उपग्रहांपैकी तब्बल १०४ उपग्रह इतर देशांचे आहेत. या पाश्र्वभूमीवर जीएसएलव्ही मार्क-३ या इस्रोच्या आतापर्यंतच्या सर्वात वजनदार प्रक्षेपकाचे उड्डाण हे अनेक अर्थानी महत्त्वाचे ठरते. काही दशकांपूर्वी अंतराळ तंत्रज्ञानासाठी इस्रोला इतर देशांपुढे हात पसरावे लागत होते. आता मात्र अंतराळ तंत्रज्ञानात इस्रोची विश्वासार्हता वाढल्याने अनेक देश भारताच्या प्रक्षेपकाद्वारे उपग्रह प्रक्षेपणास इच्छुक आहेत. मात्र भारताच्या अंतराळ संशोधनाचा हा प्रवास सोपा नव्हता. अगदी शून्यातून त्याची सुरुवात करावी लागली. समर्पित भावनेने काम करण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी, जिज्ञासा यांच्या जोडीला दूरदृष्टी असेल तर अशक्य असे काहीच नाही, असे इस्रोची यशोगाथा सांगते. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच तब्बल ३५ वर्षे इस्रोमध्ये विविध पदांवर काम केलेल्या आर. अरवमुदन यांच्या ‘इस्रो : अ पर्सनल हिस्टरी’ या पुस्तकातून उलगडणारा भारतीय अंतराळ विकास प्रवास रोमांचकारी आहे.

भारतीय अंतराळ  संशोधन समितीची स्थापना १९६२ मध्ये झाली. पण त्याआधीच डॉ. विक्रम साराभाई या द्रष्टय़ा शास्त्रज्ञाने अंतराळ कार्यक्रमाच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली होती. उद्योजक कुटुंबात जन्मलेल्या साराभाई यांनी केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परतल्यानंतर भारतीय विज्ञान संस्थेत प्रवेश केला. सी. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वैश्विक किरणांचा अभ्यास केला. पुढे साराभाई यांनी अहमदाबादमध्ये भौतिक संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली. मात्र याच सुमारास त्यांना अंतराळ कार्यक्रम खुणावू लागला होता. त्यासाठी त्यांनी देशातील शास्त्रज्ञ आणि अभियंते हेरण्यास सुरुवात केली. साराभाई यांनी स्वत: मुलाखत घेऊन काही शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची निवड केली. त्यात अरवमुदन यांचा समावेश होता. त्यांनी या नव्या दमाच्या शास्त्रज्ञ, अभियंत्यांना प्रशिक्षणासाठी अमेरिकेच्या ‘नासा’मध्ये पाठविले. तिथे त्यांना वर्षभर प्रशिक्षण मिळाले. त्यात माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचाही समावेश होता. याच दरम्यान केरळच्या थुंबा येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र स्थापन करण्यात आले. विशेष म्हणजे, भारताच्या अणुविज्ञान कार्यक्रमाचे जनक होमी भाभा यांनी त्यासाठी मोलाचे सहकार्य केले होते. त्या वेळी थुंबा इथे सुविधांची वानवा होती. थुंबा येथील चर्चच्या इमारतीत अग्निबाणाची जुळवणी करण्यात आली. १९६३ मध्ये या केंद्रातून पहिला अग्णिबाण प्रक्षेपित केला गेला. अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी करण्यासाठी १९६५ मध्ये साराभाईंनी थुंबा येथेच अंतराळ व तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले. त्यानंतर त्यांनी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची भरती सुरूच ठेवली. देश-परदेशातील कल्पक, बुद्धिमान तरुण अभियंते -शास्त्रज्ञांना अंतराळ कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी नेटाने प्रयत्न केले. एखाद्याची क्षमता हेरण्यात त्यांची हातोटी होती. अगदी माळ्यापासून ते बडय़ा शास्त्रज्ञांपर्यंत सर्वाना नावानिशी ओळखण्यावर त्यांचा भर होता. या स्नेहजुळणीतून काम करून घेण्यात ते माहीर होते.

अशाप्रकारे १५ ऑगस्ट १९६९ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना झाली. पुढच्याच वर्षी, म्हणजे १९७० मध्ये चीनने पहिल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्याच वेळी सोव्हिएत युनियनने भारताचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी दर्शवली होती. चीनच्या यशस्वी उपग्रह प्रक्षेपणानंतर रशियाने मदतीचा हात देऊ केल्याने भारताच्या अंतराळ स्वप्नांना नव्याने धुमारे फुटले. परंतु पुढच्याच वर्षी १९७१ च्या डिसेंबरअखेरीस साराभाईंचे निधन झाले आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. १९६६ मध्ये होमी भाभा यांच्या विमान अपघातातील निधनानंतर भारतीय संशोधकांच्या वर्तुळाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का. साराभाई यांच्या निधनानंतर एम. जी. के. मेनन यांनी इस्रोच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. परंतु त्यांची कारकीर्द केवळ नऊ महिन्यांची. तरीही त्यांनी आपल्या पदाला न्याय दिला. साराभाईंच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इस्रोच्या नव्या अध्यक्षांसाठी शोध सुरू केला होताच. त्यात अंतराळ अभियंता सतीश धवन यांचे नाव पुढे आले. मात्र इस्रोचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी धवन यांनी काही अटी ठेवल्या होत्या. बंगळूरुच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या संचालकपदी कायम ठेवण्याची अट त्यात होती. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या, आणि धवन इस्रोच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.  धवन यांनी इस्रोची सूत्रे स्वीकारल्यानंतर अंतराळ संशोधनासाठीच्या संस्थांमध्ये मोठे फेरबदल केले.

दरम्यान, १९ एप्रिल १९७५ रोजी ‘आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात झेपावला आणि भारताचा अवकाश क्षेत्रात शिरकाव झाला. सोव्हिएत युनियनच्या प्रक्षेपकातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. आर्यभट्ट उपग्रह प्रक्षेपणात यू. आर. राव यांचे मोलाचे योगदान आहे. सोव्हिएतच्याच प्रक्षेपकाद्वारे १९७९ मध्ये ‘भास्कर-१’ आणि १९८१ मध्ये ‘भास्कर-२’ हे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. इस्रोने ‘एसएलव्ही-३’वर लक्ष केंद्रित केले. या प्रकल्पाच्या नेतृत्वाची जबाबदारी अब्दुल कलाम यांनी स्वीकारली. जवळपास पाच वर्षे लांबणीवर पडलेल्या एसएलव्ही-३ प्रक्षेपकाच्या चाचणीसाठी १० ऑगस्ट १९७९ ही तारीख निश्चित करण्यात आली. एसएलव्ही-३ प्रक्षेपक प्रक्षेपणस्थळी आणण्यात आला. प्रक्षेपकाची जुळणी करून ते प्रक्षेपणस्थळी आणणे हे ५० टक्के यश आहे, असे अब्दुल कलाम म्हणायचे. एसएलव्ही-३ प्रक्षेपक प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच बंगालच्या उपसागरात कोसळला. उपग्रह प्रक्षेपकाची पहिली चाचणी अपयशी ठरली. या अपयशामुळे कलाम यांच्या चेहऱ्यावर खिन्नता दिसून आली. मात्र त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सतीश धवन यांनी कलाम किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना दोष दिला नाही. प्रक्षेपणात नेमके काय चुकले, याचा शोध शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी घेतला. या अपयशातून धडा घेत कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू केले. दुसऱ्याच वर्षी, १८ जुलै १९८० रोजी एसएलव्ही-३ प्रक्षेपकाचे यशस्वी उड्डाण झाले. त्याद्वारे ‘रोहिणी’ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला. या यशामुळे कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षांव झाला. त्यानंतर कलाम यांचा पुढे ‘मिसाईल मॅन’ आणि नंतर राष्ट्रपतिपदापर्यंत झालेला प्रवास सर्वज्ञात आहे. ‘पीएसएलव्ही-३’च्या आणखी यशस्वी उड्डाणानंतर इस्रोचे पुढचे लक्ष्य होते ते प्रक्षेपकाची उपग्रहवहन क्षमता वाढविणे. त्यासाठी ‘एएसएलव्ही’ची तयारी सुरू करण्यात आली. तब्बल तेरा वर्षे इस्रोच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर सतीश धवन निवृत्त झाले. त्यांच्याकडून यू. आर. राव यांनी इस्रोची सूत्रे हाती घेतली. २४ मार्च १९८७ रोजी एएसएलव्हीचे प्रक्षेपण करण्यात आले. मात्र पहिल्या मिनिटातच काही तरी चुकल्याचे लक्षात आले आणि एएसएलव्हीचा प्रयत्नही अपयशी ठरला. एसएलव्हीच्या यशामुळे आत्मविश्वास दुणावलेले इस्रोचे शास्त्रज्ञ, अभियंते पुन्हा निराश झाले. जुलै, १९८८ मध्ये एएसएलव्ही प्रक्षेपकाची पुन्हा चाचणी घेण्यात आली. मात्र पुन्हा अपयश आले. त्यामुळे या प्रकल्पाबाबत शास्त्रज्ञांच्या मनात मूलभूत प्रश्न निर्माण झाले. प्रक्षेपकाची रचनाच चुकीची आहे का, असा विचारही अनेकांच्या मनात चमकून गेला. यू. आर. राव यांनी विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस. सी. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. तज्ज्ञांची आणखी एक समिती नेमण्यात आली. नेमके काय चुकले याची पडताळणी करून २० मे १९९२ रोजी ‘एएसएलव्ही डी-३’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

यश आणि अपयश यांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच राहिला. परंतु अनुभवातून शिकून इस्रोचा प्रवास स्वयंपूर्णतेकडे झाला. म्हणूनच गेल्या महिन्यातील ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या सर्वात वजनी प्रक्षेपकाचे यश महत्त्वाचे ठरते. मोठय़ा वजनाचे उपग्रह भूस्थिर कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनाची आवश्यकता होती. सत्तरच्या दशकापासूनच इस्रोने क्रायोजेनिक इंजिन बनवावे, अशी महत्त्वाकांक्षा अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. क्रायोजेनिक इंजिनासाठी द्रवरूप ऑक्सिजन आणि हायड्रोजन वापरतात. त्यांची हाताळणी आणि साठवणूक हे अवघड काम. इस्रोने क्रायोजेनिक इंजिन आणि त्यासाठीच्या तंत्रज्ञानाची चाचपणी केली. जगातील नामवंत कंपन्यांनी इस्रोला इंजिन आणि तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शवली. पहिला प्रतिसाद मिळाला तो अमेरिकेच्या जनरल डायनॅमिक्स या कंपनीकडून. इस्रोच्या प्रक्षेपकांसाठी सोयीची ठरतील अशी दोन क्रायोजेनिक इंजिन आणि तंत्रज्ञान विकण्यास ही कंपनी पुढे आली. मात्र दोन इंजिनांची किंमत तब्बल ८०० दशलक्ष डॉलर्स इतकी होती. शिवाय अमेरिकेने अचानक तंत्रज्ञान हस्तांतरणास परवानगी नाकारली तर मोठी पंचाईत होण्याची शक्यता होती. एरियनस्पेसनेही १९८९ मध्ये क्रायोजेनिक इंजिन आणि तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र ती आणखी महाग होती. त्यामुळे स्वत:च क्रायोजेनिक इंजिन बनविण्यास सुरुवात करण्याचा विचार सुरू झाला. तेव्हा रशिया मदतीला धावून आला. रशियाच्या ग्वावोकॉसमॉस कंपनीने अमेरिकी कंपनीने सांगितलेल्या किमतीपेक्षा खूप कमी किमतीत दोन क्रायोजेनिक इंजिन आणि तंत्रज्ञान पुरविण्याची तयारी दर्शवली. ग्वावोकॉसमॉससोबत १९९१ मध्ये करार करण्यात आला. त्या वेळी अमेरिकेने आडकाठी आणली. या करारामुळे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियमनाचा भंग होत असल्याचा आक्षेप अमेरिकेने घेतला. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि रशियाचे अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी त्यास विरोध केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अमेरिकेने क्रायो तंत्रज्ञान देण्यावर दोन वर्षांची बंदी घातली आणि या कालावधीत इस्रो आणि ग्लावोकॉसमॉस यांच्यात कोणताही नवा करार करण्यास मनाई केली. इस्रोचे अध्यक्ष यू. आर. राव यांनी ही बंदी पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करू नये, यासाठी प्रयत्न केले. पण त्यास यश आले नाही. भारताच्या अणू चाचणीमुळे घालण्यात आलेल्या र्निबधाचा हा परिणाम होता. अखेर, रशिया क्रायोजेनिक इंजिन देईल, मात्र तंत्रज्ञान हस्तांतरण करणार नाही, असे ठरले. अमेरिकेच्या आडमुठेपणामुळे जीसॅटचे प्रक्षेपण रखडले. अखेर जीएसएलव्ही प्रक्षेपकाचे श्रीहरिकोटा येथून २८ मार्च २००१ रोजी उड्डाण झाले. ते अपयशी ठरले. त्यानंतर १८ एप्रिल २००१ रोजी जीएसएलव्हीचे यशस्वी उड्डाण झाले आणि जीसॅट-१ उपग्रह प्रक्षेपित झाला. त्या वेळी क्रायोजेनिक इंजिन निर्मितीबाबत भारत चाचपडत होता. क्रायोजेनिक इंजिन तयार करण्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे या इंजिन विकास प्रक्रियेत चुका आणि चाचण्यांत फार वेळ गेला. मात्र कोणत्याही र्निबधामुळे इस्रोच्या अंतराळ संशोधन प्रकल्पांत खंड पडला नाही.

विक्रम साराभाई, एम. जी. के. मेनन, सतीश धवन, यू. आर. राव, कस्तुरीरंगन, माधवन नायर, राधाकृष्ण या सर्व इस्रो अध्यक्षांच्या कार्यकाळात अंतराळ संशोधन कार्यक्रम सुरूच राहिले. या सर्वच इस्रो अध्यक्षांनी भारताच्या अंतराळ विकासात मोलाचे योगदान दिले आहे. भारताने अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे, असा डॉ. विक्रम साराभाई यांचा नेहमीच आग्रह होता. मानवाला, समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याची क्षमता अंतराळ तंत्रज्ञानात आहे, यावर साराभाईंचा ठाम विश्वास होता. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे भारतासाठी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची दारे सताड उघडी झाली. इंदिरा गांधींसारख्या तत्कालीन नेतृत्वाने भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले. एखादा प्रकल्प अपयशी ठरला तरी कोटय़वधींचे नुकसान होते, मात्र देशाच्या नेतृत्वाने इस्रोवर कायम विश्वास दाखविला.

आर. अरवमुदन यांनी पुस्तकात भारताच्या अंतराळ विकास कार्यक्रमाची संघर्षगाथा मांडली आहे. त्यात अगदी थुंबा अग्निबाण प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीपासून आतापर्यंतचा भारतीय अंतराळ कार्यक्रमाचा प्रवास दिसतो. थुंबा येथील स्थानिक मच्छीमारांचे आंदोलन, इस्रोच्या कामगारांचे आंदोलन अशा अनेक संकटांवर मात करून इस्रो आज स्वयंपूर्ण बनल्याचे दाखले पुस्तकात पानोपानी आढळतात. प्रक्षेपकाने उड्डाण केले की प्रकल्प यशस्वी झाला, असे समजून प्रक्षेपणस्थळी टाळ्यांचा कडकडाट होतो. पण इस्रोचे अध्यक्ष, प्रकल्प संचालक, शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर चिंतातुर भाव दिसतात. प्रक्षेपकाने सर्व टप्पे यशस्वीपणे पार केल्यानंतरच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. हा सगळा जिवंत अनुभव या पुस्तकातून मिळतो. पुस्तकात तंत्रज्ञानविषयक शब्दांचा भरणा असला तरी प्रवाही भाषा ही पुस्तकाची जमेची बाजू आहे. अरवमुदन यांच्या पत्नी व पत्रकार गीता या सहलेखक असल्याचा कदाचित हा परिणाम असावा.

‘इस्रो : अ पर्सनल हिस्टरी’

लेखक : आर. अरवमुदन

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स

पृष्ठे : २४०, किंमत : ३९९ रुपये

सुनील कांबळी sunil.kambli@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:24 am

Web Title: isro a personal history book by r aravamudan
Next Stories
1 बुकबातमी : ‘मॅन बुकर’ची नामांकन यादी
2 अंतर्विरोधांचे ‘अपघात’
3 इथेही ‘तसं’ घडू शकतं!
Just Now!
X