दंगलखोरांनाही काही बाजू असणारच अशा सैद्धांतिक समजापोटी गुजरातमधील नरोडा पटिया येथे २००२ मध्ये झालेल्या दंगलीतील एक गुन्हेगार (कैदेतून सध्या पॅरोलवर मुक्त) सुरेश छारा याची मुलाखत घेण्यासाठी जाणे म्हणजे तसे साहस व धोकाही.. पण पत्रकार रेवती लौल यांनी हे धाडस केले होते. त्यांना आता पुस्तक लिहायचे आहे, म्हणून ही भेट होती.
छारा जुलै २०१५ मध्ये जामिनावरून सुटला तो थेट घरी आला व त्याने पत्नीवर बलात्कार केला. तिने वैतागून त्याचवेळी रेवती यांची मदत घेणे सुरू केले होते. रेवती यांनीही तिला घटस्फोटाचा सल्ला मिळवून दिला होता. गेले काही महिने त्या छाराच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होत्या. मुलाखतीसाठी छाराची भेट अखेर गुरुवारी- २१ जानेवारी रोजी झाली, तेव्हा माझ्या बायकोने तुला काय सांगितलंय असे त्यानेच विचारले, रेवती काही सांगू लागल्या तोच ‘छाराने थोबाडीत ठेवून दिली, केसाने ओढत फरपटवले, मी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी छाराचा १५वर्षांचा मुलगा धावून आला, म्हणूनच मी कशीबशी सुटका करून घेऊ शकले’ असे रेवती यांनी पोलिसांकडील तक्रारीतही नोंदविले आहे.
माणसांचा पुन्हा शोध घेणारे त्यांचे पुस्तक हे जमावाच्या हिंसेचा ठाव शोधणारेही ठरेल. त्यांनी २००२ च्या दंगलीतील किमान १५ आरोपींशी चर्चा केली आहे, पण त्यांच्याकडून त्यांना अशी वागणूक कधीच मिळाली नाही. यापूर्वीही मी जमावाच्या हिंसाचाराचा अभ्यास केला आहे पण त्यापैकी कोणी माझ्यावर कधीच राग काढला नाही असेही त्या आवर्जून सांगतात.