19 September 2018

News Flash

जुगाडांच्या देशा..

‘जुगाड यात्रा: एक्सप्लोरिंग द इंडियन आर्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’

|| विनायक पाचलग

प्राप्त साधनांद्वारे तात्पुरती, कामचलाऊ उत्तरे शोधण्याची वृत्ती म्हणजे – ‘जुगाड’! याच जुगाडू वृत्तीचा भारतभर फिरून घेतलेला वेध म्हणजे हे पुस्तक.. वास्तवाचा आरसा दाखवत ते काही प्रश्नही उपस्थित करते..

‘जुगाड’ हा शब्द आता निदान आमच्यासारख्या तरुण, उद्योगधंद्यांत धडपड करणाऱ्या लोकांसाठी अगदी परवलीचा शब्द बनलेला आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांत वेगवेगळे छोटे-मोठे कामचलाऊ बदल करून ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ पद्धतीने नव्या वस्तू तयार करून वा आहे त्या वस्तूची किंमत कित्येक पटींनी कमी करून आणि मग तिची विक्री करून भरभराटीला आलेले विविध उद्योगपती आम्ही आमच्या आजूबाजूला पाहत आहोत. त्यातल्या काही जणांवर तर बॉलीवूडपटही बनले आहेत. या सर्व अस्सल देशी ‘इनोव्हेशन्स’ना आता ‘जुगाड’ हा शब्द प्रचलित झाला आहे. इतकेच नव्हे, तर या नव्या उद्यमींबद्दल माहिती देणारी पुस्तकेही सध्या गाजत आहेत. ‘जुगाड’च्या सकारात्मक वापराबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. अरविंद गुप्ता यांना तर नुकताच ‘पद्मश्री’ सन्मान मिळाला आहे. त्यांच्या ‘हनी बी नेटवर्क’ने शंभरेक पेटंट या ‘जुगाड’ पद्धतीच्या जिवावर मिळवली आहेत. ही झाली ‘जुगाड’ या शब्दाची आजची ओळख. परंतु बाकी बहुतांश जनतेसाठी आजपर्यंत जगण्यासाठी करावी लागणारी सर्व ठिकाणची तडजोड, रोजचा दिवस ढकलण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व नैतिक-अनैतिक गोष्टी, टेबलाखालून द्यायला लागणारी चिरीमिरी यास समानार्थी म्हणून ‘जुगाड’ हा शब्द रूढ झाला आहे. शिवाय जुगाड करूनच भारतात प्रश्न सोडवता येतात, सरळमार्गी राहून इथे काही होतच नाही असे सांगू पाहणारी व्यवस्थाच आकाराला आली आहे.

HOT DEALS
 • Sony Xperia XZs G8232 64 GB (Warm Silver)
  ₹ 34999 MRP ₹ 51990 -33%
  ₹3500 Cashback
 • Lenovo Phab 2 Plus 32GB Gunmetal Grey
  ₹ 17999 MRP ₹ 17999 -0%

या सर्व पार्श्वभूमी वर ‘जुगाड यात्रा : एक्सप्लोरिंग द इंडियन आर्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ हे डीन नेल्सन यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक नक्की वेगळे काय सांगणार आणि वरील दोन बाजूंपैकी कोणती बाजू घेणार, याची उत्सुकता होती. परंतु या पुस्तकाने कोणतीही बाजू न घेता जे दिसतेय त्याच्याशी प्रामाणिक राहून कथन केले आहे. हेच या पुस्तकाचे बलस्थान आहे. नेल्सन हे प्रथितयश जागतिक संस्थांसाठी काम करणारे शोध पत्रकार आहेत आणि सुमारे दशकभराच्या भारतातल्या वास्तव्यात आलेले अनुभव, अनेक लोकांशी केलेल्या भेटीगाठी यांतून ते ‘जुगाड’ म्हणजे नक्की काय, याचा शोध घेऊ पाहतायत. त्यामुळे या पुस्तकात जवळपास पन्नासेक जणांशी केलेल्या भेटीगाठी आहेत, छोटे-छोटे अभ्यास दौरे आहेत आणि त्या सगळ्यातून निर्माण होत जाणारी प्रश्नांची मालिका आहे. पुस्तकाच्या दोनशे पृष्ठांत आपल्याला अगदी कट्टर उजवे समजले जाणाऱ्या गोविंदाचार्याबरोबरच डावे व मानवतावादी कार्यकर्तेही भेटतात, डॉ. अरविंद गुप्तांप्रमाणेच इथे उद्योजक आनंद महिंद्रही आहेत, तसेच ‘आयपीएल’वाले ललित मोदीही त्यांचा जुगाड सांगतात आणि लेखकाच्या घराशेजारी गुप्तपणे एक अवैध मजला आणि लोखंडी शिडी बांधणारा शेजारीही भेटतो! या सर्व गाठीभेटींचे वैशिष्टय़ असे की, हे सर्व लोक कितीही विरुद्ध टोकांवर उभे असले तरी या सर्वामध्ये एक समान धागा आहे; तो म्हणजे- ‘जुगाड’! या प्रत्येकाच्या आयुष्यात जुगाडचा काही ना काही संबंध आहे आणि या प्रत्येकाचे त्याबद्दल बरे-वाईट, पण ठाम असे मत आहे. असे असले तरी ‘केवळ मुलाखतींची जंत्री’ असे या पुस्तकाचे स्वरूप नाही. पुस्तकाचा विशेष असा की, ते मूलभूत व धोरणात्मक प्रश्नांना आणि विषयांना हात घालते. त्यात पिण्याचे पाणी आणि नद्यांची शुद्धता, रस्ते वाहतूक आणि दळणवळण, अस्ताव्यस्त वाढलेली शहरे, आरोग्य सेवा.. असे अनेक मुद्दे येतात. या प्रत्येक विषयातील जुगाडूपणाचा लेखकाने स्वतंत्र लेखांतून सविस्तर आढावा घेतला आहे.

आपल्याला जुगाड म्हणजे दोन रुपयांत थंड पाणी देणारा ‘मिट्टी कुल’ वा मग ज्यामुळे सर्व गोष्टी बिघडतात असा ‘जुगाडू भ्रष्टाचार’ असेच काहीसे वाटते. आपली दृष्टी ही अशी दोन टोकांत विभागलेली असते. परंतु या दोन टोकांदरम्यान असंख्य करडय़ा छटा असतात याची बहुतेकांना जाणीव नसते. लेखक या दोन टोकांमधल्या असंख्य छटा आपल्याला दाखवतो. त्यासाठी लेखक स्वत: कुंभमेळ्याला जातो आणि तिथल्या गर्दीचा, व्यवस्थापनाचा, जलशुद्धतेचा व स्वच्छतेचा आढावा घेतो. ग्रांट रोडवरून दरवर्षी प्रवास करतो आणि अब्जाधीश उद्योगपती ‘इनोव्हेशन’कडे कसे पाहतात, हे जाणून घेण्यासाठी महिंद्राच्या संशोधन केंद्राला भेटही देतो. शिवाय राष्ट्रकुल घोटाळा आणि आधी शहर नियोजनाचा आदर्श ठरलेल्या व नंतर गचाळ झालेल्या गुडगाव शहराचाही तो अभ्यास करतो. लेखकाच्या कुतूहलयुक्त नजरेतून आपल्याला या सर्व गोष्टींची सखोल सहल होते. यातील काही गोष्टींतील अनुभव आहे की, या ‘क्विक फिक्स’ दृष्टिकोनामुळे कामे पटकन झाली आहेत, वेळ आणि पैसा वाचला आहे वा खूप लोकांच्या आयुष्यात चांगला बदल झाला आहे. मात्र, याबरोबरच अनेक वेळा या जुगाडू वृत्तीमुळे आपण हवी तितकी प्रगती करू शकलेलो नाही. दीर्घकालीन उत्तरे शोधण्याऐवजी तात्पुरता प्रश्न मिटवण्यावर भर दिल्याने भविष्यात तोच प्रश्न अत्यंत उग्र रूप घेऊन निर्माण झाल्याचे दाखलेही आहेत. नको त्या ठिकाणी जुगाड केल्याने काही वेळा अनेकांच्या जिवावरही बेतले आहे. असे बरे- वाईट अनुभव लेखक तटस्थपणे मांडत राहतो आणि वाचकाला काही मूलभूत प्रश्नही विचारतो.

हे मूलभूत प्रश्न अर्थातच ‘जुगाड’ या तत्त्वाचा सामाजिक, राजकीय आणि शासकीय अंगाने वेध घेणारे असतात. जुगाड ही एक मनोवृत्ती आहे- जी व्यक्ती, समाज, संस्था.. सर्वत्र रुळलेली आहे. भारतीयांमध्ये हा प्राप्त साधनांमधून प्रत्येक प्रश्नाला कामचलाऊ  उत्तर शोधण्याचा गुण आला कोठून? भली मोठी लोकसंख्या, १५० वर्षांचे पारतंत्र्य की नैसर्गिक कारणांमुळे असणाऱ्या मूलभूत संसाधनांच्या कमतरतेमुळे? की इथले नैसर्गिक वातावरणच तसे आहे? विकास म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ असे मानले जाते. मात्र, आपण संख्यात्मक वाढीसाठी थोडीशी पण परवडणारी गुणात्मक वाढ अशा विचाराचा बेंगरूळ जुगाडकेंद्रित विकास जाणूनबुजून केला का? आपल्याकडे ‘अ‍ॅपल’सारखे- ज्यांचा संपूर्ण गुणवत्ता व संशोधन हा पाया आहे असे ब्रॅण्ड उभे राहू शकत नाहीत, याचे कारण काय? कोणत्याही प्रश्नाचे उत्तर भल्यामोठय़ा लोकसंख्येसाठी शोधण्याचे दडपण तर जुगाडमागे नाही ना? अशीच मनोवृत्ती घडत गेल्याने आपल्याकडे मूलभूत संशोधनाला कायमच दुयम स्थान दिले गेले का? परदेशी संस्कृतीत असणारे उच्च गुणवत्तेचे आकर्षण आपल्याकडे का नाही? अगदी महाराष्ट्रात विविध संतमहंतांनी कार्यसंस्कृतीवर भर दिला आहे, मात्र तरीही आज ती का लोप पावत आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भारताने एक देश म्हणून नक्की कोणती पद्धत अवलंबावी? जुगाडावर आधारित ‘इन्क्रीमेंटल इनोव्हेशन’ करत देशाला पुढे न्यावे, की शास्त्रशुद्ध व एकात्म पद्धतीने सर्व प्रश्नांना भिडावे? की या यातला मध्यममार्ग शोधावा? सकारात्मक जुगाड आणि नकारात्मक जुगाड यांतला फरक कोण ठरवणार आणि त्यातली लक्ष्मणरेषा कशी आखणार? हे व असे अनेक प्रश्न पुस्तकात विचारले गेले आहेत.

मात्र, हे पुस्तक कोणताही उपाय आपल्याला सांगत नाही. काही किरकोळ अपवाद वगळता कोणत्याही मुद्दय़ावर लेखकाचे भाष्य नाही. हा एक प्रदीर्घ असा रिपोर्ताज आहे. जो केवळ वस्तुस्थितीचा आरसा सतत वाचकाला दाखवत राहतो आणि प्रश्न विचारत राहतो. उद्याच्या भारताबद्दल काळजी असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे. कारण आपल्याकडे सध्या ठोस आणि थेट प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्याचा आपण योग्य तो सन्मान केला पाहिजे आणि उत्तरे शोधण्याचा आपला प्रवास चालू ठेवला पाहिजे.

 • ‘जुगाड यात्रा: एक्सप्लोरिंग द इंडियन आर्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’
 • लेखक : डीन नेल्सन
 • प्रकाशक : अलेफ बुक कंपनी
 • पृष्ठे : २००, किंमत : सुमारे ५९९ रुपये

info@pvinayak.com

First Published on September 8, 2018 1:51 am

Web Title: jugaad yatra exploring the indian art of problem solving