News Flash

बुकबातमी : ‘एलआरबी’ची सजग चाळिशी..

‘लंडन रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’ हे याच ‘न्यू यॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’च्या पावलावर पाऊल ठेवून निघालेलं पाक्षिक

चाळिशी आणि वाचन यांचा संबंध खास आहे. आयुष्यक्रमानुसार प्रौढपणी, संसारी झाल्यावर मुलांसाठी पुन्हा बालवाङ्मय हाताळण्याचा काळ अनेकांसाठी चाळिशीतच संपतो. तर चाळिशीनंतरही गांभीर्यानं काही वाचण्याची सवय टिकून राहणं, हे बऱ्याच जणांना साहित्याच्या चौकस वाचनाकडे नेणारं असतं. चाळिशीनंतरही टिकणारं हे वाचन बहुतेकदा स्वान्तसुखाय असतं.. त्यामुळे ते विद्यापीठीय वा अन्य उपयोगाचं न राहता, ‘सुसंस्कृतपणा टिकवण्या’कडे नेणारं ठरतं. आजच्या बातमीतलं ‘लंडन रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’ किंवा ‘एलआरबी’ हे पाक्षिक या आठवडय़ात स्वत:च चाळिशीचं झालं! अर्थात, इंग्रजीत निघणाऱ्या अन्य अनेक वाङ्मयीन नियतकालिकांपेक्षा ‘एलआरबी’ वयानं लहानच. पण इतक्या अल्पावधीत दबदबा वाढला, म्हणूनच तर त्याचं कौतुक.

२५ ऑक्टोबर १९७९ रोजी ‘एलआरबी’चा पहिला अंक प्रकाशित झाला, त्याआधी ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’ ऊर्फ ‘टीएलएस’ ही लंडनमधून निघणारी आणि ग्रंथविषयक उत्तम मजकुराला जागा देणारी साप्ताहिक पुरवणी होतीच. शिवाय १९१२ पासून ‘पोएट्री रिव्ह्य़ू’ची अदबशीर वाटचाल सुरू झाली होती आणि या पोएट्री रिव्ह्य़ूत एखाद्याच्या कवितेची चर्चा होणं हे तर, इंग्रजी कवितेच्या इतिहासात जागा मिळाल्याचं लक्षण. ‘पॅरिस रिव्ह्य़ू’ हे कादंबरीकारांवर सुरुवातीला भर देणारं नियतकालिक १९५३ साली पॅरिसहून सुरू झालं आणि १९७३ मध्ये अमेरिकेतून ‘पॅरिस रिव्ह्य़ू’ प्रकाशित होऊ लागलं. इंग्रजी साहित्यविषयक नियतकालिकांचं पुढलं दमदार पाऊल म्हणजे १९६३ पासून अमेरिकेत सुरू झालेलं ‘न्यू यॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’. या ‘एनवाय आरबी’नं साहित्यजगतात नवं वळण आणलं. तोवर ‘टीएलएस’ मधली ग्रंथपरीक्षणं म्हणजे काहीसा साचेबंद, आटोपशीर मजकूर असायचा. ‘पोएट्री रिव्ह्य़ू’वाले कवितेला, कवींच्या समग्र आकलनावर आधारित दीर्घलेखांना स्थान देत; ‘पॅरिस रिव्ह्य़ू’मधलं ‘रायटर अ‍ॅट वर्क’ हे मुलाखतींचं सदर एकमेवाद्वितीय ठरे.. पण ‘साहित्य’ म्हणजे ‘ललितवाङ्मय’ ही खूणगाठ या बहुतेक नियतकालिकांनी कायम ठेवली होती, ती ‘न्यू यॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’ या पाक्षिकानं सोडली!

‘लंडन रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’ हे याच ‘न्यू यॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’च्या पावलावर पाऊल ठेवून निघालेलं पाक्षिक. त्यामुळे दोघांची वैशिष्टय़ं समान. ती कोणती?

पुस्तकाच्या प्रकरणांची सफर घडवून आणणारी परीक्षणं टाळून, त्या पुस्तकाचं मर्म ओळखणारे- या मर्माविषयी चर्चा करणारे दीर्घ लेख, हे एक महत्त्वाचं वैशिष्टय़. पण त्याहीपेक्षा दुसरं वैशिष्टय़ म्हणजे तत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ (अर्थशास्त्र वा राज्यशास्त्राचेही जाणकार) यांचे स्वतंत्र, दीर्घ लेख. हे लेख वरवर पाहता- म्हणजे फक्त शीर्षक आणि लेखाबद्दलच्या परिचयओळी वाचल्या तर-  ताज्या विषयांवर मतप्रदर्शन करणारे वाटू शकतात.. पण हे झालं संपादकीय कसब! प्रत्यक्षात लेख केवळ ‘करंट टॉपिक’ हाताळणारा नसून, एखाद्या ताज्या घडामोडीच्या निमित्तानं सखोल चिंतनाकडे घेऊन जाणारे असतात, बहुतेकदा. कार्ल मिलर यांनी मेरी के विल्मर्स आणि सुसाना क्लॅप या दोघींना नोकरीस ठेवून ‘एलआरबी’ सुरू केलं, तेव्हा ते बीबीसीच्या ‘द लिसनर’ या अतिगाजलेल्या नियतकालिकातली पुरवणी म्हणून देण्यात येई. लवकरच ‘एलआरबी’नं निराळी चूल थाटली. ही चूल आता मेरी के विल्मर्स यांच्याकडे आली आहे. ‘एलआरबी’ची चाळिशी साजरी करणारा कार्यक्रम गेल्या शनिवारी लंडनमध्ये झाला, तेव्हा पहिल्या अंकाच्या प्रतीचं पुन्हा प्रकाशन वगैरे सोपस्कार झाल्यावर संपादक या नात्यानं मेरी के यांनी आठवणी सांगितल्या. ‘मजकूरच नाही आपल्याकडे.. अंक नाही निघणार बहुतेक’ असं कार्ल मिलर म्हणायचे, मग आम्ही दोघी कामास लागायचो.. हेही त्यांनी सांगितलं. मात्र याच ‘एलआरबी’त लिहायला हल्ली ज्युडिथ बटलर, स्लावोय झिझेक असे तत्त्वज्ञ उत्सुक असतात, हेही मेरी वा कुणीही न सांगता वाचकाला दिसतं!

मराठीतही अलीकडेच ‘सजग’ नावाचं एक नियतकालिक सुरू झालंय. ‘एलआरबी’च्या तोडीचं ठरू शकेल, असं. त्याही निमित्तानं ‘एलआरबी’च्या वाटचालीकडे प्रसन्न कौतुकानं पाहायला हवं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:06 am

Web Title: london review of books editor mary kay wilmers zws 70
Next Stories
1 गाथा भारतातल्या वलंदेजांची..
2 मिठाईचा संस्कृती-संगम
3 बुकबातमी : नोबेलपाठोपाठ नवे पुस्तक!
Just Now!
X