News Flash

सरत्या वर्षांतील ग्रंथखुणा..

पुस्तकांच्या त्या-त्या साहित्यप्रकारानुसार स्वतंत्र याद्या यंदाही ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केल्या आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

वार्षिक ग्रंथयाद्यांकडे कसे पाहायचे, हे ज्याचे-त्याने ठरवावे; पण त्यासाठी आधी या ग्रंथयाद्यांवर एक कटाक्ष तरी टाकायलाच हवा!

सरत्या वर्षांतील वाचकप्रियता लाभलेल्या, खपात अग्रेसर ठरलेल्या, पुरस्कार पटकाविलेल्या.. अशा काही निकषांच्या आधारे वार्षिक ग्रंथयाद्या जगभरची नियतकालिके, वर्तमानपत्रे प्रसिद्ध करत असतात. सर्वोत्तम १०, सर्वोत्तम पन्नास, सर्वोत्तम शंभर इथपासून साहित्यप्रकारानुसार वा विषयनिहायही प्रसिद्ध होणाऱ्या या ग्रंथयाद्या वाचकांना त्यांच्या वाचनपाठाबद्दल निराशा आणू शकतात, तसेच त्यांच्या वाचनयादीत भरही घालू शकतात. अशी कुठलीही यादी करायची, तर त्यात सापेक्षता येणार हे स्वाभाविक. त्यात ग्रंथव्यवहारातील ठोकताळे येणेही तितकेच स्वाभाविक. त्यामुळे कोणी या याद्यांकडे तुच्छतेने पाहील; ज्यांना या अपरिहार्य दोषांचे सोयरसुतक नाही ते याकडे निव्वळ औत्सुक्याने पाहतील; तर शिस्तशीर वाचकवृत्तीचे काही याकडे उपयुक्ततावादी नजरेने पाहून आपला वाचनसंकल्प विस्तारतील. मुद्दा हा की, या वार्षिक ग्रंथयाद्यांकडे कसे पाहायचे, हे ज्याचे-त्याने ठरवावे. पण त्यासाठी आधी या ग्रंथयाद्यांवर एक कटाक्ष तरी टाकायलाच हवा!

आता डिसेंबरच्या शेवटाकडे आपण आलो असलो, तरी या महिन्याच्या सुरुवातीपासूनच २०१९ च्या वार्षिक ग्रंथयाद्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. दर वर्षीप्रमाणे यंदाही पहिली लक्षणीय यादी आली ती ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ची! तब्बल शंभर पुस्तकांची बृहद्यादी हे ‘द न्यू यॉर्क टाइम्स’चे वैशिष्टय़. ते त्यांनी यंदाही जपले आहेच. ललित-ललितेतर अशा दोन टोकांमधील यंदाच्या सर्वोत्तम पुस्तकांचा समावेश असलेल्या या यादीबरोबरच ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या तीन ग्रंथसमीक्षकांच्या स्वतंत्र यादीकडेही विचक्षण वाचक लक्ष ठेवून असतात. ड्वाइट गार्नर, पारुल सेहगल आणि जेनिफर सालाइ हे ते तीन ग्रंथसमीक्षक. त्यांनी वर्षभरात ज्या पुस्तकांचे परीक्षण केले, त्यातून निवडलेल्या प्रत्येकी १० पुस्तकांची स्वतंत्र यादी ५ डिसेंबरलाच प्रसिद्ध झाली. विशेषत: कथात्म साहित्याकडे ओढा असलेल्या ड्वाइट गार्नर यांच्या १० पुस्तकी यादीत या वर्षांतील सर्वोत्तम कथात्म पुस्तके आहेत. दोन वर्षांपूर्वी ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ फ्रेण्ड्स’ या पहिल्याच कादंबरीमुळे आश्वासक लेखिका म्हणून गणली जाणारी आयरिश युवाकादंबरीकार सॅली रूनी हिची यंदा प्रकाशित झालेली ‘नॉर्मल पीपल’ ही कादंबरी गार्नर यांच्या यादीत स्थान पटकावून आहे. याशिवाय आयरिश लेखक केव्हिन बॅरीची ‘नाइट बोट टु टँजिएर’ आणि सुसॅन चोइ या अमेरिकी लेखिकेची ‘ट्रस्ट एक्सरसाइज’ या आणखी दोन कादंबऱ्या या यादीत आहेत. तर भारतीय वंशाच्या ग्रंथसमीक्षक पारुल सेहगल यांच्या यादीतील पुस्तके संमिश्र आहेत. त्यात यंदा बुकरच्या अंतिम यादीपर्यंत धडक मारलेली कादंबरीकार ल्युसी एलमन यांची तब्बल सव्वाचार लाख शब्दांचे एकच लांबलचक वाक्यात सांगितलेली हजारभर पृष्ठांची ‘डक्स, न्यूबरीपोर्ट’ ही कादंबरी जशी आहे, तसेच पेक्का हेमॅलेनेन या अमेरिकी इतिहासकाराने लिहिलेले ‘लाकोटा अमेरिका’ हे तेथील लाकोटा या जमातीचा इतिहास सांगणारे पुस्तकही आहे.

तर ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये ललितेतर पुस्तकांशी वाचकभेट घडवणाऱ्या जेनिफर सालाइ यांची यादी त्यांच्या एरवीच्या गंभीर वृत्तीप्रमाणे १० वैचारिक पुस्तकांना सामावून घेणारी आहे. त्यातली ‘द इम्पिचर्स’, ‘अ‍ॅण्टिसोशल’, ‘मिडनाइट इन चेर्नोबिल’ ही पुस्तके लक्ष वेधून घेतात. या याद्यांच्या अनुषंगाने त्यांच्यात झालेली ग्रंथचर्चाही रोचक आहे. त्यातही अनेकांना नवे लेखक, पुस्तके गवसू शकतात. (या तिघांमधील चर्चा https://www.nytimes.com/2019/12/05/ books/critics-roundtable-year-in-books.html या दुव्यावर वाचायला मिळेल.)

पुस्तकसमीक्षा, ग्रंथचर्चा, लेखक-मुलाखत यांनी ओसंडून वाहणारा ‘द गार्डियन’चा साहित्यविषयक विभागही वार्षिक ग्रंथयादी प्रसिद्ध करीत असतो. पुस्तकांच्या त्या-त्या साहित्यप्रकारानुसार स्वतंत्र याद्या यंदाही ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केल्या आहेत. कादंबरी, साहसकथा-गुन्हेकथा, विज्ञानकथा, चित्रकादंबरी, कविता, आठवणीपर पुस्तके, चरित्र-आत्मचरित्रे, राजकीय, क्रीडा, आहार, बालसाहित्य अशा विविध प्रकारांतील पुस्तकांच्या या याद्या युरोप- विशेषत: इंग्लंडकेंद्री असल्या, तरी त्यातून वर्षभरातील ग्रंथघुसळणीचा अंदाज येऊ शकतो. तो घ्यायलाच हवा, पण ‘द गार्डियन’ची आणखी एक यादी खासच आहे. त्यात वर्षभरात निरनिराळ्या पुरस्कारांच्या नामांकन यादीत स्थान मिळालेल्या, पुरस्कार पटकावलेल्या लेखक-लेखिकांनी त्यांना यंदा भावलेली पुस्तके कोणती, हे सांगितले आहे. तुर्की लेखिका एलिफ शफाक, ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हरिस्टो, लोकप्रिय स्कॉटिश लेखिका अ‍ॅली स्मिथ, ‘सेपियन्स’ या पुस्तकामुळे जगभर चर्चेत असलेला युवाह नोहा हरारी, ‘जॅक रिचर’चा हे पात्र घडवणारे साहसकथालेखक ली चाइल्ड अशा तीसएक लेखकांनी त्यांच्या आवडीची तीन पुस्तके इथे नोंदवली आहेत. ‘द सोर्स ऑफ सेल्फ-रिगार्ड’ हे टोनी मॉरिसन यांचे त्यांच्या मृत्यूपूर्वी यंदाच्या फेब्रुवारीत प्रसिद्ध झालेले पुस्तक ली चाइल्ड यांच्या वाचनयादीत आहे, तर ‘असद ऑर वी बर्न द कण्ट्री’ या सीरियाच्या यादवी युद्धाची कहाणी सांगणाऱ्या पुस्तकाची शिफारस हरारी यांनी केली आहे. एकुणात, ही यादी लिहित्या लेखकांचे वाचन सांगणारी आहे!

‘द गार्डियन’प्रमाणेच ‘फायनॅन्शियल टाइम्स’नेही इतिहास, आरोग्य, साहसकथा, प्रवास अशा विषयांच्या स्वतंत्र ग्रंथयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत. तर ‘द न्यू यॉर्कर’ने कॅटी वॉल्डमनकृत निवडक १० पुस्तकांची यादी दिली आहे. कादंबऱ्यांचाच समावेश असलेल्या या यादीत मार्गारेट अ‍ॅटवूडच्या ‘द टेस्टामेण्ट्स’बरोबर यंदाच्या बुकर पारितोषिकाची संयुक्त मानकरी ठरलेली बर्नार्डिन एव्हरिस्टोच्या ‘गर्ल, वुमन, अदर’ ही आणि ल्युसी एलमनची ‘डक्स, न्यूबरीपोर्ट’ या इतर याद्यांत स्थान पटकावून असणाऱ्या कादंबऱ्यांचाही समावेश आहे. मात्र, ‘पब्लिशर्स वीकली’च्या यादीत वैचारिक पुस्तकांची पखरण अधिक आहे. ‘ग्रंथव्यवहाराविषयी सर्व काही’ अशी या अमेरिकी साप्ताहिकाची ख्याती १८७२ सालापासूनच आहे. साप्ताहिकाच्या यंदाच्या यादीतील ‘ऑडियन्स ऑफ वन : डोनाल्ड ट्रम्प, टेलिव्हिजन अ‍ॅण्ड द फ्रॅक्चिरग ऑफ अमेरिका’ (जेम्स पोनीवोझिक), ‘गेस्ट हाऊस फॉर यंग विडोज् : अमंग द विमेन ऑफ आयसिस’ (अझादेह मोवेनि), ‘द मॅन व्हू सॉ एव्हरीथिंग’ (डेबोरा लेव्ही) ही पुस्तके अनेकांच्या वाचनयादीत शिरकाव करू शकतात.

याव्यतिरिक्तही अनेक नियतकालिकांनी वार्षिक ग्रंथयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत; पुढील आठवडाभरात त्यात आणखी याद्यांची भर पडेल. त्या वाचून नवे वाचनप्रदेश धुंडाळण्यास हरकत नसावी. तेच तर ग्रंथयाद्यांचे प्रयोजन असते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:26 am

Web Title: notable books of 2019 book lists annual book lists best of book lists zws 70
Next Stories
1 कठीण समयाचे शुभ अर्थशास्त्र!
2 बहुसंख्याकवादी राजकारणाचा लक्ष्यभेद
3 बुकबातमी : ट्रम्पिस्तानातलीअमेरिकी सेना
Just Now!
X