02 December 2020

News Flash

विस्मृतीचे उंबरठे आणि ‘बघण्या’च्या वाटा

गिरणगावच्या कामगार संपाचा इतिहास असा विस्मृतीच्या उंबरठय़ावरून पलीकडे अडगळीत चालला आहे.

आदूबाळ aadubaal@gmail.com

पारंपरिक इतिहासलेखनाचा आधार न सोडताही, सुमारे चार दशकांपूर्वीच्या मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपाकडे आज कसे ‘पाहावे’?

इतिहासाला सध्या एकाएकी चांगले दिवस आले आहेत. पण तो इतिहास शक्यतो काही शे वर्षांपूर्वीचा असावा; त्यात समाजाच्या किमान एखाद्या गटाचा अहं कुरवाळला जावा असा एक संकेत आहे. याव्यतिरिक्त जे काही असेल ते स्मृतीच्या अडगळीत फेकायला काहीच हरकत कोणाचीच दिसत नाही. गिरणगावच्या कामगार संपाचा इतिहास असा विस्मृतीच्या उंबरठय़ावरून पलीकडे अडगळीत चालला आहे. त्याचे दृश्य परिणाम थोडके बाहेर दिसतात- परळच्या काही मॉल्समध्ये उंच धुराडी मिरवणाऱ्या काही इमारती दिसतात, बंद गिरण्यांची कम्पाऊंड्स लोकलमधून बघता येतात आणि रस्त्यांना अजूनही ना. म. जोशींसारख्या कामगार पुढाऱ्यांची नावं आहेत. हे जाणवून गूगल करणाऱ्याला काही तरी माहिती आज मिळू शकेल.

या गिरणगावाचा मृत्यू घडवणाऱ्या आणि या आजच्या कायापालटाला जबाबदार असणाऱ्या १९८२-८३च्या प्रदीर्घ अशा कामगार संपाचं प्रतिबिंब वेगवेगळ्या कलाकृतींत पडलं आहे. सुर्वे-ढसाळ यांच्यानंतर ललित साहित्यात जयंत पवारांसारख्या लेखकाच्या कथा, नाटकं गिरणगावच्या सद्य:स्थितीच्या पार्श्वभूमीवर असतात. हुसेन झैदीसारखा लेखक मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वाच्या उगमावर टिप्पणी करताना संपाकडे बोट दाखवतो; ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘वास्तव’सारख्या सिनेमांत गिरणगावी पार्श्वभूमीची पात्रं असतात.

पण कामगार संपाचा तपशीलवार, पारंपरिक इतिहासलेखनाचे संकेत पाळून लिहिलेला दस्तावेज अनेक वर्ष उपलब्ध नव्हता. म्हणजे तो लिहिला गेला नव्हता असं नव्हे. हुब व्हॅन व्हर्श या डच सामाजिक मानववंशशास्त्रज्ञानं पीएच.डी.च्या अभ्यासासाठी हा विषय निवडला. या प्रबंधाचं ग्रंथस्वरूप १९९२ साली ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’नं प्रकाशित केलं. त्यानंतर अनेक वर्ष हा ग्रंथ ‘आऊट ऑफ पिंट्र’ होता. गतवर्षी दिल्लीच्या ‘स्पीकिंग टायगर बुक्स’ या प्रकाशन संस्थेनं या पुस्तकाचं पुनर्मुद्रण केलं आहे.

हा लेख व्हॅन व्हर्श यांच्या पुस्तकाचं समीक्षण/ परीक्षण एवढय़ापुरता मर्यादित नाही. प्रदीर्घ काळ चाललेला कामगार संप ही नजीकच्या भूतकाळातली एक महत्त्वाची सामाजिक-आर्थिक घटना आहे. त्याकडे ‘बघण्या’च्या विविध वाटा असतात आणि पारंपरिक इतिहासलेखन ही त्यातली एक महत्त्वाची वाट. त्याचा आधार न सोडता अन्य वाटांकडे वाचकांचं लक्ष वेधणं हा या लेखाचा उद्देश आहे.

ताजेपणा धारण केलेलं इतिहासलेखन

व्हॅन व्हर्श भारतात प्रथम आले ते १९७२ साली आणि संशोधन कार्यासाठी मुंबईत राहिले. गिरणगावचा संप सुरू होण्याच्या काळात (१९८२) ते मुंबई-ठाणे परिसरातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अभ्यास करत होते. संप सुरू झाल्यावर त्या घटनेचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी याचा तपशीलवार अभ्यास करायला सुरुवात केली. व्हॅन व्हर्श यांनी १९८५ मध्ये गिरणगावातल्या चाळीत प्रत्यक्ष राहून ‘फील्डवर्क’ केलं. यामुळे व्हॅन व्हर्श यांच्या लेखनाला एक समकालीनत्व प्राप्त झालं आहे. ‘फील्डवर्क’मध्ये गिरणी कामगारांशी केलेला संवाद, त्यांच्या मुलाखती, सर्वेक्षण या गोष्टी अंतर्भूत होत्या. घटनेनंतर जितक्या लगेच तो संवाद साधला जाईल तितकी त्यावर विस्मृतीची किंवा अन्य धारणांची पुटं बसण्याची शक्यता कमी. मानसशास्त्रामध्ये ज्याला ‘हाइण्डसाइट बायस’ म्हणतात, तो घटनेनंतर लगेच घेतल्या गेलेल्या मुलाखतींत टाळला जातो.

समकालीनत्वाचा एक तोटा म्हणजे मूळ अभ्यासाच्या काळापासून पुढे घडलेल्या घटना अभ्यासाच्या कवेबाहेर राहतात. हे पुनर्मुद्रण असल्याने १९८८ ते २०१९ या काळात पुलाखालून वाहून गेलेल्या पाण्याचा विचार यात नाही. ही उणीव प्रा. सुमीत म्हसकर यांच्या प्रस्तावनेनं अंशत: भरून काढली आहे. या प्रस्तावनेत अन्य महत्त्वाचे मुद्देही येतात, त्याचा संदर्भ पुढे येईलच.

पुस्तकाची मांडणी ही मानव्यशास्त्रातल्या अकादमीय लेखनासारखी आहे. पहिल्या प्रकरणात विषयाची ओळख, उपोद्घात वगैरे झाल्यानंतर व्हॅन व्हर्श दुसऱ्या प्रकरणात घटनाक्रमाकडे वळतात. तिसऱ्या प्रकरणात ते संपात वापरल्या गेलेल्या डावपेचांबद्दल विस्तारानं लिहितात आणि चौथ्या प्रकरणात आपली निरीक्षणं, निष्कर्ष मांडतात. त्याला बळकटी देणारी आकडेवारी, अभ्यास, आदी पुढच्या काही प्रकरणांत दिलेला आहे. या निरीक्षण-निष्कर्षांचा थोडक्यात आढावा घेऊ..

व्हॅन व्हर्श म्हणतात की, संपाची कारणं ही तात्कालिक नसून अधिक मूलगामी होती. पगारवाढीबद्दल असंतोष हे जरी त्याचं मूळ असलं, तरी गिरण्यांमध्ये कामगारांना ज्या स्थितीत काम करावं लागत असे ती स्थिती आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघ या अधिकृत युनियनविषयीच्या तक्रारी हीदेखील महत्त्वाची कारणं होती. व्हॅन व्हर्श पुढे म्हणतात, दत्ता सामंतांना नेतृत्व द्यायचा निर्णय कामगारांनी स्वयंस्फूर्तीने घेतला, कारण सामंत हे त्यांच्या आक्रमक मागण्यांसाठी प्रसिद्ध होते (उदा. पगारवाढीचा आधार म्हणून नफातोटय़ाच्या पत्रकाला/ ताळेबंदाला नाकारणे). कामगार-मालक वाद न्यायालयात न नेता गिरणगावी पद्धतीनं, चिवट आक्रमक लढय़ाच्या मार्गानं गेल्यास लवकर फलप्राप्ती होईल, अशी अपेक्षा कामगारांना होती. कामगारांचा दत्ता सामंतांवर विश्वास होता आणि त्यांना ‘कल्ट फिगर’ बनवलं गेलं.

कामगार संप शेवटपर्यंत जातीय, धर्मीय, आदी अस्मितांपासून दूर राहिला, हे महत्त्वाचं निरीक्षण व्हॅन व्हर्श नोंदवतात. अगदी बदली कामगार आणि कायम कामगार यांच्यातही फूट पडली नाही. परंतु व्हॅन व्हर्श याला शहरीकरणाच्या रेटय़ात आपोआप होणाऱ्या जातिअंताचं रूप मानतात. लेखनानंतरच्या तीस वर्षांनी या आशावादी निष्कर्षांला अस्मान दाखवलं आहे. प्रा. म्हसकर आपल्या प्रस्तावनेत असे काही अभ्यास १९८७ नंतर झाल्याचं नोंदवतात आणि या दिशेनं अभ्यासाच्या वाटा पुढे असल्याचंही निर्देशित करतात.

अशीच एक अभ्यासवाट नोंदवावीशी वाटते. व्हॅन व्हर्श यांच्या लेखनाचा बराच मोठा भाग युनियन्स- कामगार- मालक- सरकार या चतुष्टय़ाभोवती फिरतो (नव्वदच्या दशकानंतर त्यात ‘बिल्डर’ या पाचव्या स्तंभाची भर पडली.). या चार/पाच गटांचे आपापसांतले परस्परसंबंध, ताणेबाणे, एकमेकांविरुद्ध वापरलेले डावपेच या सगळ्या गोष्टींचा ‘गेम थिअरी’च्या अंगाने अभ्यास करता येईल आणि काही मोलाचे निष्कर्ष त्यातून निघू शकतील.

व्हॅन व्हर्श पुढे संपातल्या िहसेकडे वळतात. या विषयावर अन्यत्रही बरंच लिहिलं गेलं आहे. नीरा आडारकर व मीना मेनन यांनी संपादन केलेल्या गिरणगावाच्या मौखिक इतिहासाचा उल्लेख विशेषत्वानं करावा लागेल. व्हॅन व्हर्श ‘िहसेमुळे संप टिकला’ या धारणेला बळकटी मिळेल असे पुरावे मांडतात; पण त्याच वेळी गिरणीमालकांनी रंगवलेलं िहसेचं चित्र अतिरंजित असल्याचं ठामपणे सांगतात.

आधी लिहिल्याप्रमाणे, व्हॅन व्हर्श यांनी आपला प्रत्यक्ष अभ्यास गिरणगावात- प्रभादेवीच्या एका चाळीत राहून केला. यासाठी त्यांनी दीडशे कामगारांच्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या. यांपैकी पाच प्रातिनिधिक कामगारांच्या ‘केस स्टडीज्’ पाचव्या प्रकरणात दिल्या आहेत. हे पुस्तकही याच पाच कामगारांना अर्पण केलं आहे. त्यावरून व्हॅन व्हर्श यांचं आतडं या अभ्यासाशी किती जुळलं होतं, याची प्रचीती यावी.

शेवटी व्हॅन व्हर्श म्हणतात, गिरणगावच्या संपामुळे भारतातल्या वस्त्रोद्योगाचं चित्र कायमचं बदललं. आधुनिकीकरणाच्या रेटय़ामुळे यंत्रसामग्रीत बदल होऊन ती अधिक स्वयंचलित झाली होती आणि त्यामुळे कामगारकेंद्री कापडगिरण्यांचा अस्त अटळ होता. संपामुळे ती प्रक्रिया काही थोडक्या वर्षांच्या काळात घडून आली. संपानंतर कामगारांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी सप्टेंबर १९८६ मध्ये मनोहर कोतवाल कमिटी बसवण्यात आली. या मनोहर कोतवालांचं एक वाक्य व्हॅन व्हर्श उद्धृत करतात : ‘‘मला वाटतं, एक दिवस गिरणीमालक डॉ. सामंतांचा पुतळा उभारून त्यांचा वस्त्रोद्योग वाचवण्याबद्दल सन्मान करतील!’’

अभ्यासाची वानवा

आपल्या पुस्तकात आणि नंतर ‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत व्हॅन व्हर्श गिरणगावी कामगारांच्या संपावर अकादमीय अभ्यास- तोही भारतीय अभ्यासकांकडून- न झाल्याची खंत नोंदवतात. तुलना म्हणून, इंग्लंडमधील १९६९ सालच्या खाण कामगारांच्या संपावर झालेल्या बहुआयामी अभ्यासाकडे ते लक्ष वेधतात. ‘‘कदाचित भारतीय अभ्यासकांना कामगारांच्या संपाचा पुरेशा तटस्थपणे अभ्यास करण्याचं ‘स्वातंत्र्य’ लाभलं नसावं,’’ असं ते या मुलाखतीत म्हणतात. हा इशारा अर्थातच एकमेकांत गुंतलेल्या राजकीय-आर्थिक-औद्योगिक हितसंबंधांकडे आहे, हे वेगळं सांगायला नकोच!

मला वाटतं, हा अभ्यास न होण्याची कारणं त्याहून खोलवर जाणारी आहेत. आधुनिक महाराष्ट्रीय इतिहासाचे अभ्यासक राहुल सरवटे यांनी नुकत्याच लिहिलेल्या एका लेखात समाजशास्त्राच्या अभ्यासात/ शिकवण्याच्या दर्जात झालेली घसरण, चिकित्सेचा अभाव आणि समाजकारणातली-राजकारणातली घसरण यावर मार्मिक टिप्पणी केली होती. ‘समाजशास्त्राच्या संस्कारांचं बोट सुटणे’ आणि व्हॅन व्हर्श यांनी केलेलं हे चिंतावजा निरीक्षण याचा संबंध आहे का, या प्रश्नाचं उत्तर व्हॅन व्हर्श यांच्या पुस्तकातून मिळतं. गिरणगावी कामगारांच्या संपाचा धागा मराठा मोर्चाशी आणि आरक्षणाच्या मागणीशी कसा जुळतो, याबद्दल प्रा. म्हसकरांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिलं आहे. संप आणि मुंबईचं अधोविश्व यातले संबंध, आधी लिहिल्याप्रमाणे, हुसेन झैदींसारख्या पत्रकाराच्या नजरेतूनही निसटले नाहीत.

समाजशास्त्राच्या अभ्यासाप्रति असलेलं औदासीन्य हे संशोधनाला मिळणाऱ्या आर्थिक पाठबळातही प्रतिबिंबित होतं. व्हॅन व्हर्श यांचा अभ्यास नेदरलँड्समधल्या एका संस्थेनं पुरस्कृत केला होता.

माध्यमांतरांच्या वाटा

सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे, ‘बघण्या’च्या विविध वाटा असतात. जयंत पवारांच्या लेखनाविषयी वर उल्लेख आला आहे, विशेषत: ‘अधांतर’ हे नाटक त्यात महत्त्वाचं. आडारकर-मेनन यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून सुधीर पटवर्धन यांच्या ‘लोअर परळ’ या चित्राचा सूचक भाग आहे. चित्रपटांविषयीही वर उल्लेख आला आहे. या लेखाबरोबर दिलेली छायाचित्रे मयूरेश भडसावळे यांच्या ‘#्रे’’्िर२३१्रू३’ या गिरणगावाची सद्य:स्थिती दाखवणाऱ्या छायाचित्रमालिकेतील आहेत.

व्हॅन व्हर्श यांच्या लेखनात अभावितपणे, पण अपरिहार्यपणे आलेली गोष्ट म्हणजे दत्ता सामंतांचं गडद रंगांनी रंगवलेलं व्यक्तिचित्र. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याने आणि कामगारकेंद्री तीव्र भूमिका घेतल्यानं कामगारांच्या विश्वासाला पात्र झालेले सामंत; ते एकचालकानुवर्ती पद्धतीनं युनियन चालवणारे सामंत; ते दमवून-थकवून-पिचवून टाकणाऱ्या १८ महिन्यांनंतरही तडजोडीला तयार नसलेले, कामगारांना गावी पाठवणारे सामंत.. असा मोठा पल्ला दिसतो. एका आदर्श ‘अ‍ॅण्टीहीरो’चं चित्र डोळ्यांपुढे उभं राहात जातं. सध्या आलेल्या बायोपिकच्या पिकात दत्ता सामंतांचं आयुष्य (आणि १९९७ साली त्यांचा खून होणे) हा उत्तम विषय ठरू शकतो.

व्हॅन व्हर्श आपल्या संशोधनानंतरच्या ३० वर्षांत वेगळ्या वाटेनं गेले. गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांनी कादंबरीलेखनाच्या क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. पण गिरणगावातला अनुभव त्यांच्या विचारविश्वातून अजून गेलेला नाही. त्यांची नुकतीच आलेली कादंबरी ‘ग्रेएपन नार लच’ (थेट भाषांतर : दम लागल्यावर श्वास घ्यायला धडपडणे) ही डच अकादमीय क्षेत्रातल्या स्पर्धेविषयी आणि त्यातल्या भल्याबुऱ्या प्रवृत्तींविषयी आहे. कादंबरीतल्या नायकाला व्हॅन व्हर्श यांनी त्यांचा स्वत:चा गिरणगावी अनुभव दिला आहे. कादंबरीचा बराच भाग संपकालीन गिरणगावात घडतो. माध्यमांतराच्या वाटा संशोधकाला आकर्षित करतात त्या या अशा!

दखल

‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत व्हॅन व्हर्श म्हणतात की, ‘‘(या संपाचा) भूतकाळ नाकारणं हे वर्तमानकाळ घडवणाऱ्या एका महत्त्वाच्या घटकाला नाकारल्यासारखं होईल.’’ व्हॅन व्हर्श यांच्या या पुस्तकाबद्दल चर्चा होणं हा कदाचित तो भूतकाळ न डावलण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल असेल. ही मुलाखत वगळता, गिरणी कामगार संपाच्या इतिहासावरच्या पुस्तकाचं स्वागत आणि परीक्षण करणारी माध्यमं होती ‘द कॅराव्हॅन’ आणि ‘द वायर’. माध्यमांच्या ध्रुवीकरणावर इतकं भाष्य पुरेसं आहे!

‘द १९८२-८३ बॉम्बे टेक्स्टाइल स्ट्राइक अ‍ॅण्ड द अनमेकिंग ऑफ ए लेबर्स सिटी’

लेखक : हुब व्हॅन व्हर्श

प्रकाशक : स्पीकिंग टायगर बुक्स

पृष्ठे: ६१६, किंमत : ९९५ रुपये

लेखक आर्थिक इतिहास आणि कथात्म वाङ्मयाचे अभ्यासक असून ‘आदूबाळ’ याच नावाने कथालेखनही करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2020 1:48 am

Web Title: the 1982 83 bombay textile strike bombay textile strike mill workers strike in mumbai zws 70
Next Stories
1 गाणारी सतार..
2 बुकबातमी : पुस्तक मूठभर, प्रसिद्धी हातभर! 
3 सावरकर समजून घेण्यासाठी..
Just Now!
X