अभिजीत रणदिवे

ब्रिटिश कादंबरीकार इयन मक्यूवन हे काही विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध नाहीत; पण आपली विनोदबुद्धी आणि कल्पकता पणाला लावत, ‘ब्रेग्झिट’चे संदर्भ त्यात खुबीनं पेरत त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे. त्यातला विनोद काहींना स्तिमित करेल, काहींच्या चेहऱ्यावर हसू आणेल, तर काहींना प्रश्न पडेल की, असंगततेचा असा अनुभव सद्य:काळात येत असूनही तो आपल्या साहित्यात उतरताना का दिसत नाही?

मोठी आर्थिक-सामाजिक उलथापालथ घडवू शकणाऱ्या आणि समाजाचं ध्रुवीकरण करणाऱ्या एखाद्या घटनेविषयी लोक कसे व्यक्त होतील? ध्रुवीकरण झाल्यामुळे अर्थातच दोन्ही बाजूंचे लोक हिरिरीनं आपापली बाजू मांडत राहतील. त्यातून वादविवाद होत राहतील. तज्ज्ञ लोकांना मोठमोठे लेख लिहायला किंवा व्याख्यानं द्यायला आयतं निमित्त मिळेल. सध्याच्या काळात तर त्याविषयी ‘फेक न्यूज’ पसरेल हेसुद्धा गृहीतच धरावं लागेल. ‘ब्रेग्झिट’बाबतही हे सगळं झालं आहे. जून २०१६ मध्ये ब्रिटनमध्ये सार्वमत होऊन ब्रेग्झिटच्या बाजूनं ५२ टक्के लोकांनी कौल दिला. त्यानंतर खूप काही घडत राहिलं : पंतप्रधान बदलले गेले, सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पुन्हा पंतप्रधान बदलले, पुन्हा निवडणुका, असे खेळ खेळून झाल्यानंतरही युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठीची सर्व प्रक्रिया अजून पार पडलेली नाही. ‘आता आटपा एकदाचं’ असं म्हणून म्हणून लोकांना कंटाळा आला आहे, तरीही हे दळण काही संपत नाही.

अशा वेळी सर्जनशील लोक कसे व्यक्त होतील? ब्रिटनमधला उदारमतवादी बुद्धिवादी वर्ग प्रामुख्यानं ब्रेग्झिटच्या विरोधात व्यक्त होताना दिसतो. तसाच सर्जनशील कलाकारांचा वर्गही मोठय़ा प्रमाणात ब्रेग्झिटच्या विरोधात आहे. त्यामुळे अर्थात ती बाजू मांडणाऱ्या अनेक कलाकृती निर्माण झालेल्या दिसतात. दृश्यकला, संगीत, नाटक, सिनेमा, व्हिडीओ गेम्स अशा अनेक प्रकारांतून लोक ब्रेग्झिटविषयी व्यक्त झाले आहेत. अगदी ‘ब्रेग्झिटोव्हका’ नावाची एक व्होडकाही बाजारात आली आहे!

ब्रिटिश संस्कृतीत कादंबरीला विशेष मानाचं स्थान आहे. त्यामुळे साहजिकच ब्रेग्झिटचे संदर्भ घेऊन काही कादंबऱ्या गेल्या काही वर्षांत प्रकाशित झाल्या. ‘कॉक्रोच’ ही त्यातली कदाचित सर्वात गाजलेली आणि निखळ मनोरंजक कादंबरिका काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाली. ती गाजण्यामागे एक कारण म्हणजे समकालीन ब्रिटिश साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव असलेला तिचा लेखक इयन मक्यूवन. सहा वेळा बुकर पुरस्कारासाठी नामांकन झालेला आणि एकदा तो मिळालेला मक्यूवन मुख्यत: कादंबरीकार म्हणून जगविख्यात असला, तरीही आपले उदारमतवादी सामाजिक-राजकीय विचार परखडपणे मांडण्यासाठीही प्रसिद्ध आहे. कधी त्याची मतं इस्लामविरोधी, तर कधी ज्यूविरोधी ठरली असल्यामुळे विखारी टीका झेलण्याची त्याला सवय आहे. ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरोधात तो अनेकदा व्यक्त झाला आहे. ब्रेग्झिटविरोधात त्याचा एक निबंध २०१६ मध्येच, म्हणजे सार्वमत होताच प्रकाशित झाला. त्यानंतर वेळोवेळी आणि विविध प्रसारमाध्यमांतून त्यानं ब्रेग्झिटविरोधात आपलं मनोगत व्यक्त केलं. तो स्वत:ला ‘ब्रेग्झिट जंकी’ म्हणतो. म्हणजे ड्रग्जच्या आहारी गेलेला एखादा माणूस ज्याप्रमाणे नियमित ड्रग्ज घेत राहतो, तसाच मक्यूवन ब्रेग्झिटविषयी मिळेल त्या साहित्याचं सेवन करत राहतो.

तरीही कथनात्म साहित्यात, म्हणजे फिक्शनमध्ये या विषयावर व्यक्त होण्याची त्याला का गरज भासली असावी? कदाचित त्याचं उत्तर मक्यूवनच्याच दहा वर्षांपूर्वीच्या ‘सोलार’ या कादंबरीत मिळेल. हवामान बदलामुळे येऊ घातलेल्या अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ती एक प्रहसनात्मक कादंबरी आहे. किंवा, कदाचित त्याचं उत्तर अगदी अलीकडे, म्हणजे फेब्रुवारीत प्रकाशित झालेल्या त्याच्या एका निबंधात मिळू शकेल. मुद्देसूद वादविवादाला ब्रिटनमध्ये जी प्रतिष्ठा पूर्वी होती, ती आता उरलेली नाही; त्याउलट तारस्वरात बोलणाऱ्या आणि शक्तिमान भासणाऱ्या नेतृत्वानं त्याची जागा आता घेतली आहे; आणि त्याला बळ इंग्लिश राष्ट्रवाद पुरवतो आहे, असा एक सूर त्यात आहे (हा राष्ट्रवाद ‘इंग्लिश’ आहे, ‘ब्रिटिश’ नव्हे; कारण स्कॉटलंडचा किंवा उत्तर आर्यलडचा विचार त्यात नाही.). याच निबंधात पुढे, पंतप्रधान बोरिस जॉन्सनप्रणीत सरकारचं वर्णन करताना – ‘मी खोटं बोलतोय; ते तुम्हाला माहितीये; तुम्हाला ते माहितीये हे मला माहितीये आणि मला त्याची पर्वा नाही,’ असं सांगणारं उद्धट हसू या मंत्रिमंडळाचा स्थायिभाव आहे असं मक्यूवन म्हणतो. त्यावरून आजच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांची तुलना तो सोव्हिएत राजवटीतल्या राज्यकर्त्यांशी करतो (सत्ताधारी उजवे असल्यामुळे त्यांना ती विशेष झोंबते!).

‘कॉक्रोच’ गाजण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण तिच्यामागच्या प्रेरणेत आहे. फ्रान्झ काफ्काची ‘मेटॅमॉफरेसिस’ ही जगविख्यात दीर्घकथा/ कादंबरिका ‘कॉक्रोच’चं प्रेरणास्थान आहे (मात्र, दोन्हींच्या प्रकृतीमध्ये मोठे फरक आहेत. त्यामुळे ‘कॉक्रोच’ला ‘मेटॅमॉफरेसिस’ची फॅन-फिक्शन म्हणता येईल.). १९१५ साली प्रकाशित झालेल्या ‘मेटॅमॉफरेसिस’मधला सेल्समन ग्रेगॉर साम्सा एक दिवस उठून पाहतो तो त्याचं रूपांतर एका भल्यामोठय़ा कीटकामध्ये झालेलं असतं. अभिजात मानल्या जाणाऱ्या या पुस्तकाची कित्येक भाषांत भाषांतरं झाली आहेत. त्यातून निघणारे अर्थ आणि त्यातली प्रतीकात्मता वगैरे गोष्टींवर खूप चर्वितचर्वणही झालं आहे. मक्यूवन ‘कॉक्रोच’मध्ये काफ्काची ही मध्यवर्ती कल्पना उलटीपालटी करून वापरतो. ‘कॉक्रोच’मधला ‘चलाख, पण खोली नसलेला’ जिम सॅम्ससुद्धा एक दिवस उठून पाहतो तो त्याचं रूपांतर एका भल्यामोठय़ा प्राण्यात झालेलं असतं. पण तो प्राणी कीटक नसतो आणि जिम सॅम्स सेल्समन नसतो. हळूहळू आपल्याला कळतं की, जिम सॅम्स आपल्या मूळ अवतारात ब्रिटिश संसदेतलं एक झुरळ असतं. आता त्याचं रूपांतर एका माणसात झालेलं असतं. हा माणूस कोण, याचा रहस्यभेदही लगेचच होतो- टेन, डाउनिंग स्ट्रीटच्या सध्याच्या रहिवाशाच्या, म्हणजेच ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या शरीरात आता हे झुरळ वसत असतं. पंतप्रधानाचं नाव जरी वेगळं असलं तरीही त्याचं हलकट, विनोदी वर्णन पाहता झुरळाला बोरिस जॉन्सन केलं आहे हे अगदी स्पष्ट आहे. आणि ही (ईश्वरी?) योजना एकाच हेतूनं झालेली आहे : एका महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पाच्या मार्गातले मानवी अडथळे दूर करून ती सुविहित पार पाडणं. आपण एकटे नाहीत, तर संपूर्ण मंत्रिमंडळच झुरळांनी बुजबुजलेलं आहे, हेसुद्धा पंतप्रधान जिमला पुढे कळतं. सार्वमताच्या वेळी ज्या नागरिकांनी प्रकल्पाच्या बाजूनं मत दिलं त्यांच्या मनातही आता आपल्या निर्णयाच्या योग्यायोग्यतेविषयी संदेह निर्माण झाला आहे, प्रकल्पाचं भवितव्यच धोक्यात आलं आहे आणि अशा कसोटीच्या वेळी देशातली निवडक सर्वोत्कृष्ट (म्हणजे संसदेतली) झुरळंच देशाला तारून नेऊ शकतील, हे कादंबरीचं सूत्र आहे.

मुळात ही कल्पनाच इतकी गमतीशीर आहे, की तेवढय़ासाठीही मक्यूवनला दाद द्यायला हवी! शिवाय छोटय़ा छोटय़ा तपशिलांद्वारे तो कादंबरीत रंग भरतो. उदा. एक गंभीर चर्चा चालू असताना पंतप्रधानाला टेबलावर कॉफीच्या बशीखाली एक छोटासा कीटक मरताना दिसतो. तो मेल्यावर दहा मिनिटांनी खाल्ला तर कडूजहर लागतो, पण त्याच्या आत खाल्ला तर स्टिल्टन नावाच्या विख्यात ब्रिटिश चीजसारखा चविष्ट लागतो, हे झुरळ-पंतप्रधानाला ठाऊक असतं. मात्र, समोर गंभीर चर्चा सुरू असल्यामुळे एखाद्या धीरोदात्त आणि कर्तव्यदक्ष नायकाप्रमाणे त्याला आपल्या वासनांवर ताबा ठेवावा लागतो.

केवळ कल्पक कथासूत्र आणि रंग भरलेले तपशील एवढय़ावर मक्यूवन थांबत नाही, तर कादंबरीतली त्याची खरी तुफान विनोदी कल्पना वेगळीच आहे. देशात मतमतांतराचं वादळ आणणारा, त्यावरून ध्रुवीकरण करणारा आणि मोठी आर्थिक-सामाजिक उलथापालथ करणारा हा प्रकल्प म्हणजे ब्रेग्झिटच आहे असं वाटावं, असे संदर्भ पेरल्यानंतर प्रत्यक्षात तो काय आहे हे मक्यूवन हळूहळू उघड करतो. ‘रिव्हर्सलिझम’ हे त्या प्रकल्पाचं नाव आहे आणि ती एक अर्थक्रांती आहे. पैशाचा प्रवाह उलटा करण्याची ही योजना आहे. म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पगार मिळणार नाही; उलट तुम्ही आपल्या मालकाला पगार द्याल. आणि हा पगार देणं परवडावं यासाठी तुम्हाला शॉपिंग करावं लागेल. जितक्या महागडय़ा वस्तू तुम्ही विकत घ्याल, तितके जास्त पैसे दुकानदार तुम्हाला देईल. वाहतुकीचे नियम मोडलेत तर शिक्षा म्हणून पोलीस तुम्हाला पैसे देतील! तसंच, मालाची आयात करणारा ब्रिटिश व्यापारी परदेशी निर्यातदाराकडून माल घेण्यासाठी त्याला पैसे आकारेल, तर ब्रिटिश निर्यातदार आपला माल घेणाऱ्या परदेशी आयातदाराला पैसे देईल (इतर देश या प्रकारच्या व्यापाराला मान्यता देतील का, असा प्रश्न सुज्ञांनी अर्थातच विचारू नये!). पैसे साठवणं बेकायदेशीर आहे, त्यामुळे तुम्हाला ते जिरवण्यासाठी काम करत राहावं लागेल. अशानं बेरोजगारी संपूर्णपणे नष्ट होईल आणि देश प्रगतीच्या लाटेवर स्वार होईल, असा क्रांतिकारी ‘विचार’ या प्रकल्पामागे आहे. रिव्हर्सलिझम संसदसंमत करण्याच्या ध्येयानं पेटून उठलेली संसदेतल्या झुरळांची ही टोळी सुपरहिरोंप्रमाणे अवतरली आहे. ती यशस्वी होते की अयशस्वी, आणि ती कशी, हा कादंबरीचा मुख्य कथाभाग आहे (गेल्या काही वर्षांत आपल्याकडच्या व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठामधून जे सिद्धांत प्रसवले जातात, त्याच श्रेष्ठ जातकुळीचा हा सिद्धांत आहे. त्यामुळे भारतानं यापासून धडा घ्यायला हवा असा विचार इथे मनात येणं अगदीच साहजिक आहे.).

हे काही ब्रिटनचं भवितव्य बदलायला निघालेलं पुस्तक नाही. लोकांचं प्रबोधन करण्याचाही लेखकाचा हेतू नाही. ‘राजकारण जेव्हा तुम्हाला एका अतीव निराशेच्या मन:स्थितीत घेऊन जातं, तेव्हा दुसऱ्या बाजूनं हसूही येऊ लागतं. त्या दोन गोष्टींची जिथे भेट घडते तिथे कदाचित साहित्य सापडू शकेल,’ असं लेखक म्हणतो. ब्रेग्झिटविषयी सखोल विवेचन करण्याची ही जागा नाही, पण सार्वमताआधीच्या वातावरणनिर्मितीपासून जे काही घडत गेलं आहे आणि बोरिस जॉन्सनच्या नेतृत्वाखाली पुढे जे घडणं सहज शक्य आहे ते पाहता, तर्कसंगत नियमांच्या आधारे जग चालत नाही असा निष्कर्ष सहज काढता येतो. कादंबरीतल्या एका प्रसंगात जर्मनीची चॅन्सलर (म्हणजे अर्थात अँगेला मर्केल) ब्रिटिश पंतप्रधानाला कळवळून विचारते, ‘का? तुम्ही हे का करताहात? का?’ आणि त्यावर काय उत्तर द्यावं तेच पंतप्रधानाला सुचत नाही. ‘जे हेतुशून्य असतं ते अ‍ॅब्सर्ड असतं,’ असं आयनेस्को हा विसाव्या शतकातला महत्त्वाचा अ‍ॅब्सर्ड नाटककार काफ्कावरच्या एका निबंधात म्हणतो. ‘मेटॅमॉफरेसिस’ विनोदी नाही, पण असंगतता (अ‍ॅब्सर्डिटी) त्यात आहे. मुळात ग्रेगॉर साम्साचा कीटक का होतो, याला कार्यकारणभाव नाही. काफ्काच्या इतर साहित्यातही तसा अनुभव व्यक्तिरेखांना येतो. आपल्या वास्तवामध्ये सुसूत्रता शोधण्याची मानवी प्रवृत्ती असते, त्यामुळेच असंगततेचा असा ‘काफ्काएस्क’ अनुभव त्रासदायक ठरतो. तरीही अशा जगात माणसाला आनंदानं जगण्याचा प्रयत्न करणं भाग असतं. परिस्थिती जेव्हा कमालीची असंगत होते तेव्हा त्यावर हसणं हा उपाय नसला, तरीही हसता आलं तर काही काळ बरं वाटू शकतं- आणि कधी कधी केवळ तेवढंच करणं शक्य असतं. मक्यूवन काही विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध नाही, पण आपली विनोदबुद्धी आणि कल्पकता पणाला लावून त्यानं कादंबरी लिहिली आहे. ब्रेग्झिटचे संदर्भ त्यात खुबीनं पेरलेले आहेत (उदा. ‘डू ऑर डाय’ हे बोरिस जॉन्सनचं एक गाजलेलं वक्तव्य इथे येऊन जातं.). ज्याला ते संदर्भ माहीत आहेत, तो वाचक अर्थातच कादंबरीची अधिक मजा घेऊ शकेल; पण सगळे संदर्भ कळले नाहीत तरीही कादंबरीतला प्रसंगनिष्ठ विनोद आणि त्यातली असंगतता वाचकाला स्तिमित करेल, त्याच्या चेहऱ्यावर हसू आणेल इतपत ताकदीची आहे. आपल्याकडे अनेक प्रकारच्या असंगततेचा अनुभव सद्य:काळात येत असूनही मराठी साहित्यात तो उतरताना का दिसत नाही, असा प्रश्नही यानिमित्तानं पडायला हरकत नाही!

rabhijeet@gmail.com